7
रोमी शताधिपतीचा विश्वास
1जे लोकांनी ऐकावे ते सांगून पूर्ण केल्यावर, येशूंनी कफर्णहूममध्ये प्रवेश केला. 2तिथे एका शताधिपतीचा सेवक, जो त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता, तो आजारी असून मरावयास टेकला होता. 3त्या शताधिपतीने#7:3 शताधिपतीने अर्थात् शंभर सैनिकांवर अधिकारी येशूंविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडिलांना येशूंकडे पाठवून, त्यांना आपण येऊन सेवकाला बरे करावे अशी विनंती केली. 4ते येशूंकडे आले आणि त्यांना आग्रहाने विनंती करून म्हणाले, “तुम्ही हे करावे यासाठी हा मनुष्य पात्र आहे, 5कारण तो आमच्या राष्ट्रावर प्रेम करतो, एवढेच नाही, तर त्याने आमच्यासाठी सभागृह ही बांधून दिले आहे.” 6म्हणून येशू त्यांच्याबरोबर निघाले.
पण घरापासून फार दूर नव्हते तेव्हा शताधिपतीने आपल्या मित्रांच्या हाती निरोप पाठविला: “प्रभू, माझ्या छप्पराखाली येण्याचा आपण त्रास घेऊ नका कारण त्यासाठी मी योग्य नाही. 7आणि याकारणामुळेच तुमच्याकडे येण्यासाठी मी स्वतःला योग्य समजत नाही. परंतु तुम्ही शब्द मात्र बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल. 8कारण मी स्वतः अधिकाऱ्याच्या अधीन असलेला मनुष्य असून, माझ्याही अधिकाराखाली सैनिक आहेत. मी एकाला, ‘जा,’ म्हटले की तो जातो आणि दुसर्याला, ‘ये,’ म्हटले की तो येतो आणि माझ्या नोकराला, ‘हे,’ कर अथवा, ‘ते,’ कर असे म्हटले तर तो ते करतो.”
9येशूंनी हे ऐकले, तेव्हा ते त्याच्या बोलण्यावरून आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्यामागे आलेल्या लोकांच्या गर्दीकडे वळून ते म्हणाले, “मी तुम्हाला सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलींमध्ये सुद्धा दिसून आला नाही.” 10त्या अधिकार्याचे मित्र त्याच्या घरी परतले, तेव्हा सेवक पूर्ण बरा झालेला त्यांना आढळला.
येशू एका विधवेच्या मुलास जिवंत करतात
11त्यानंतर लगेच, येशू नाईन नावाच्या गावी गेले आणि त्यांचे शिष्य आणि मोठा जमावही त्यांच्याबरोबर गेला. 12ते गावाच्या वेशीजवळ आले असता एका मुलाची प्रेतयात्रा बाहेर पडत होती व तो आपल्या विधवा आईचा एकुलता एक पुत्र होता. तिच्याबरोबर गावातील मोठा लोकसमूह होता. 13प्रभूने तिला पाहिले, तेव्हा त्यांचे हृदय कळवळले आणि ते तिला म्हणाले, “रडू नकोस.”
14नंतर पुढे जाऊन ज्या तिरडीवर त्याला ठेवले होते त्याला स्पर्श केला, तेव्हा तिरडी वाहणारे थांबले. येशूंनी म्हटले, “तरुणा, मी तुला सांगतो, ऊठ!” 15तेव्हा तो मृत मुलगा उठून बसला आणि बोलू लागला. मग येशूंनी त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले.
16हे पाहून सर्व लोक भयचकित झाले आणि परमेश्वराची स्तुती करीत म्हणाले, “आम्हामध्ये एक थोर संदेष्टा उदय पावला आहे. परमेश्वर आपल्या लोकांच्या साहाय्यासाठी आले आहेत.” 17येशूंची ही बातमी यहूदीया प्रांताच्या कानाकोपर्यातून आणि सीमेच्या पलीकडेही पसरली.
येशू आणि बाप्तिस्मा करणारा योहान
18योहानालाही या सर्व गोष्टींविषयी त्याच्या शिष्यांनी सांगितले. त्याने दोघांना बोलाविले, 19आणि त्यांना प्रभूकडे विचारण्यास पाठविले: “जे यावयाचे ते आपण आहात किंवा आम्ही इतर कोणाची वाट पाहावी?”
20ते लोक येशूंकडे आल्यानंतर त्यांना म्हणाले, “बाप्तिस्मा करणारा योहानाने आम्हास आपणाकडे असे विचारावयास पाठविले आहे की, जे यावयाचे ते आपण आहात की आम्ही दुसर्या कोणाची वाट पाहावी?”
21त्याच घटकेस, येशूंनी पुष्कळ लोकांस रोग, पीडा व दुरात्मे यापासून मुक्त केले होते आणि पुष्कळ आंधळ्यांना दृष्टी दिली. 22तेव्हा जे निरोप घेऊन आले होते त्यांना म्हणाले, “तुम्ही जे पाहिले आणि ऐकले ते योहानाला सांगा: आंधळ्यांना दृष्टी मिळते, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिर्यांना ऐकू येते, मेलेले जिवंत होतात आणि गरीब लोकांना शुभवार्ता सांगितली जाते. 23जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”
24योहानाचे शिष्य गेल्यानंतर, येशू जमावाशी योहानाविषयी बोलू लागले. ते म्हणाले, “तुम्ही ओसाड अरण्यात काय पाहण्यासाठी गेला? वार्याच्या झोताने हलणार्या लव्हाळ्याला काय? 25जर नाही, तर मग काय पाहावयाला तुम्ही गेला होता? किमती पोशाख घातलेला एखादा पुरुष काय? नाही. भारी पोशाख घालणारे व सुखविलासातील लोक राजवाड्यात राहतात. 26परंतु तुम्ही काय पाहावयास गेला होता? संदेष्टा? होय, मी तुम्हाला सांगतो, संदेष्ट्यापेक्षाही अधिक. 27हा तोच आहे ज्याच्याविषयी लिहिले आहे:
“मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवेन आणि,
तो तुझा मार्ग तुझ्यापुढे सिद्ध करेल,#7:27 मला 3:1
28मी तुम्हाला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्या व्यक्तीमध्ये योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तरीपण परमेश्वराच्या राज्यामध्ये जो कनिष्ठ आहे, तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे.”
29जकातदारांसह सर्व लोकांनी येशूंचे हे शब्द ऐकले. परमेश्वराचे मार्ग न्याय्य आहेत, हे त्यांनी योहानाकडून पूर्वीच बाप्तिस्मा घेऊन मान्य केले होते. 30तरी, परूशी आणि नियमशास्त्रज्ञांनी त्यांच्याबद्दल असलेला परमेश्वराचा संकल्प धुडकावून लावला होता व योहानाकडून बाप्तिस्मा घेतला नाही.
31येशू पुढे बोलत राहिले, “तर मग काय, या पिढीच्या लोकांची तुलना मी कशाशी करू? ते कोणासारखे आहेत?” 32लहान मुलांसारखी ही पिढी आहे. ते बाजारात बसून इतरांना हाक मारतात:
“ ‘आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजविली,
तरी तुम्ही नाचला नाही;
आम्ही शोकगीत गाईले,
तरी तुम्ही रडला नाही.’
33कारण योहान भाकरी खात नसे किंवा द्राक्षारस पीत नसे आणि तुम्ही म्हणता, ‘त्याला दुरात्म्याने पछाडले आहे.’ 34मनुष्याचा पुत्र खातपीत आला आणि तुम्ही म्हणता, ‘पाहा, हा खादाड आणि मद्यपी मनुष्य! जकातदार आणि पापी लोकांचा मित्र!’ 35परंतु ज्ञान आपल्या मुलांच्या योगे न्यायी ठरते.”
एक पापी स्त्री येशूंना तैलाभ्यंग करते
36एका परूश्याने येशूंना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रण दिले व येशूंनी ते स्वीकारले. ते भोजनास बसले असताना, 37येशू परूश्याच्या घरी भोजनास गेले आहेत हे ऐकून, त्या नगरातील एक पापी स्त्री मोलवान सुगंधी तेलाने भरलेली एक संगमरवरी कुपी घेऊन तिथे आली. 38आत जाऊन ती येशूंच्या मागे उभी राहिली व रडू लागली आणि आपल्या अश्रूंनी त्यांचे पाय भिजवू लागली. मग तिने ते आपल्या केसांनी पुसले. त्यांच्या पायांची चुंबने घेतली आणि सुगंधी तेल त्यावर ओतले.
39ज्या परूश्याने येशूंना भोजनाचे आमंत्रण दिले होते, त्याने हे पाहिले तेव्हा तो मनाशीच म्हणाला, “यावरूनच येशू संदेष्टा नाहीत हे सिद्ध होते, कारण परमेश्वराने त्यांना खरोखरच पाठविले असते, तर ही स्त्री पापी आहे हे त्यांना समजले असते.”
40येशू त्या परूश्याला म्हणाले, “शिमोना, मला तुला काहीतरी सांगावयाचे आहे.”
शिमोन म्हणाला, “गुरुजी बोला.”
41तेव्हा येशूंनी त्याला एक दाखला सांगितला: “एका सावकाराने दोन माणसांना कर्ज दिले, एकाला चांदीची पाचशे नाणी#7:41 एक दिनार एक दिवसाची साधारण मजुरी होती (पाहा मत्त 20:2). आणि दुसर्याला चांदीची पन्नास नाणी. 42परंतु त्यापैकी एकालाही त्याची परतफेड करता आली नाही. तेव्हा त्याने दोघांचेही कर्ज माफ केले. आता या दोघांपैकी कोणाला त्याच्याबद्दल अधिक प्रीती वाटेल?”
43“ज्याचे अधिक कर्ज माफ झाले त्याला” शिमोनाने उत्तर दिले.
येशू म्हणाले, “तू बरोबर न्याय केला आहेस.”
44नंतर ते त्या स्त्रीकडे वळाले आणि शिमोनाला म्हणाले, “तू ही स्त्री पाहिली का? मी तुझ्या घरात आलो. माझे पाय धुण्यासाठी तू मला पाणी दिले नाहीस, परंतु तिने माझे पाय तिच्या अश्रूंनी भिजविले आणि तिच्या केसांनी ते पुसले. 45तू मला चुंबन#7:45 त्यावेळी चुंबन देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्याची प्रथा होती दिले नाहीस. परंतु मी आत आलो तेव्हापासून हिने माझ्या पायांचे चुंबन घेणे थांबविले नाही. 46तू माझ्या डोक्यावर तेल लावले नाहीस, परंतु हिने तर माझ्या पायांवर सुगंधी अत्तर ओतून दिले आहे. 47यास्तव मी तुला सांगतो, हिने दाखविलेल्या पुष्कळ प्रीतीमुळे तिच्या अनेक पापांची क्षमा करण्यात आली आहे. ज्याच्या थोड्या पापांची क्षमा होते, त्याची प्रीतीही थोडीच असते.”
48येशू त्या स्त्रीला म्हणाले, “तुझ्या पापांची क्षमा करण्यात आली आहे.”
49त्या ठिकाणी आलेल्या दुसर्या पाहुण्यांनी एकमेकांमध्ये बोलण्यास सुरुवात केली, “हा कोण आहे जो पापांची सुद्धा क्षमा करतो?”
50येशू त्या स्त्रीला म्हणाले, “तुझ्या विश्वासाने तुझे तारण झाले आहे; शांतीने जा.”