Logoja YouVersion
Ikona e kërkimit

लूक 20

20
येशूच्या अधिकाराविषयी संशय
1एके दिवशी तो मंदिरात लोकांना शिक्षण देत व सुवार्ता सांगत असता मुख्य याजक व शास्त्री हे वडीलमंडळासह त्याच्यापुढे येऊन त्याला म्हणाले,
2“तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि तुम्हांला हा अधिकार देणारा कोण हे आम्हांला सांगा.”
3तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिले, “मीही तुम्हांला एक प्रश्‍न विचारतो; त्याचे मला उत्तर द्या.
4योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता किंवा मनुष्यांपासून होता?”
5तेव्हा ते आपसांत विचार करून म्हणाले, “स्वर्गापासून असे म्हणावे तर हा म्हणेल की, ‘तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’
6आणि मनुष्यांपासून असे म्हणावे तर सर्व लोक आपल्याला धोंडमार करतील, कारण योहान संदेष्टा होता अशी त्यांची खातरी आहे.”
7तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “तो कोणापासून होता हे आम्हांला ठाऊक नाही.”
8येशूने त्यांना म्हटले, “तर कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी मी करतो ते मीही तुम्हांला सांगत नाही.”
द्राक्षमळ्याचा दृष्टान्त
9मग तो लोकांना हा दाखला सांगू लागला, कोणाएका मनुष्याने ‘द्राक्षमळा लावला’ आणि तो मळेकर्‍यांना सोपवून देऊन आपण बरेच दिवस दुसरीकडे जाऊन राहिला.
10मग मळेकर्‍यांनी आपणाला द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावीत म्हणून त्याने हंगामाच्या वेळी त्यांच्याकडे एका दासाला पाठवले; परंतु मळेकर्‍यांनी त्याला ठोक देऊन रिकामे लावून दिले.
11पुन्हा त्याने दुसर्‍या एका दासाला पाठवले; त्यालाही त्यांनी ठोक देऊन व त्याचा अपमान करून रिकामे लावून दिले.
12पुन्हा त्याने तिसर्‍याला पाठवले; त्यालाही त्यांनी घायाळ करून बाहेर घालवून दिले.
13तेव्हा द्राक्षमळ्याचा धनी म्हणाला, ‘आता मी काय करू? मी आपल्या प्रिय पुत्राला पाठवतो, कदाचित त्याला पाहून ते त्याचा मान राखतील.’
14परंतु मळेकरी त्याला पाहून आपसांत विचार करून म्हणाले, ‘हा तर वारस आहे; ह्याला आपण जिवे मारू म्हणजे वतन आपलेच होईल.’
15मग त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर काढून जिवे मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी त्यांचे काय करील?
16तो येऊन त्या मळेकर्‍यांचा नाश करील व द्राक्षमळा दुसर्‍यांना देईल.” हे ऐकून ते म्हणाले, “असे न होवो.”
17त्याने त्यांच्याकडे रोखून पाहिले व म्हटले, “तर
‘जो दगड बांधणार्‍यांनी नापसंत केला
तोच कोनशिला झाला आहे.’
असा जो शास्त्रलेख आहे त्याचा अर्थ काय?
18जो कोणी त्या दगडावर पडेल त्याचे तुकडेतुकडे होतील; परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा तो भुगाभुगा करून टाकील.”
कर देण्याबाबत प्रश्‍न
19तेव्हा शास्त्री व मुख्य याजक हे त्याच घटकेस त्याच्यावर हात टाकण्याच्या विचारात होते; पण त्यांना लोकांची भीती वाटली; हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे ते समजले.
20मग ते त्याच्या पाळतीवर राहिले आणि त्याला बोलण्यात धरून सुभेदाराच्या तावडीत व अधिकारात आणावे म्हणून त्यांनी नीतिमान असल्याची बतावणी केलेले हेर त्याच्याकडे पाठवले.
21त्यांनी त्याला म्हटले, “गुरूजी, आपण योग्य बोलता व शिक्षण देता, आणि तोंडदेखले बोलत नाही, तर देवाचा मार्ग सत्यास अनुसरून शिकवता हे आम्हांला माहीत आहे.
22आम्ही कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?”
23तो त्यांचे कपट ओळखून त्यांना म्हणाला, “[तुम्ही माझी परीक्षा का पाहता?]
24मला एक नाणे दाखवा. ह्याच्यावरील मुखवटा व लेख कोणाचा आहे?” ते म्हणाले, “कैसराचा.”
25तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तर कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या.”
26तेव्हा त्यांना लोकांसमक्ष त्याला त्याच्या बोलण्यात धरता येईना, आणि त्याच्या उत्तराचे आश्‍चर्य वाटून ते स्तब्ध राहिले.
पुनरुत्थानविषयक प्रश्‍न
27नंतर, ‘पुनरुत्थान नाही’ असे म्हणणार्‍या सदूक्यांतून कित्येकांनी जवळ येऊन त्याला विचारले,
28“गुरूजी, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, ‘एखाद्याचा भाऊ’ आपली बायको जिवंत असता ‘निःसंतान असा मेला तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.’
29बरे, सात भाऊ होते; त्यांच्यातील पहिल्या भावाने बायको केली व तो निःसंतान असा मेला.
30मग दुसर्‍याने ती केली व तो निःसंतान असा मेला.
31मग तिसर्‍यानेही; ह्याप्रमाणे ते सातही निःसंतान असे मेले;
32शेवटी ती स्त्रीही मेली.
33तर पुनरुत्थानसमयी ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल? कारण ती त्या सातांचीही बायको झाली होती.”
34येशूने त्यांना म्हटले, “ह्या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात;
35परंतु ते युग व मेलेल्यांतून पुनरुत्थान हे प्राप्त करून घेण्यास जे योग्य ठरतील ते लग्न करून घेणार नाहीत व लग्न करून देणारही नाहीत;
36आणि ते पुढे मरणारही नाहीत, कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत.
37पण मोशेनेही झुडपाच्या वृत्तान्तात, परमेश्वराला ‘अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव’ असे म्हणून मेलेले उठवले जातात हे दर्शवले आहे.
38तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे; कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.”
39तेव्हा शास्त्र्यांतील कित्येकांनी म्हटले, “गुरूजी, ठीक बोललात.”
40मग ते त्याला आणखी काहीही विचारण्यास धजले नाहीत.
ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे काय?
41त्यावर त्याने त्यांना म्हटले, “ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे असे कसे म्हणतात?
42कारण दावीद स्वत: स्तोत्रांच्या पुस्तकात म्हणतो,
‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले,
43मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायांसाठी आसन
करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.’
44दावीद त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा?”
शास्त्र्यांसंबंधाने दिलेला इशारा
45तेव्हा सर्व लोक ऐकत असता त्याने आपल्या शिष्यांना म्हटले,
46“शास्त्र्यांसंबंधाने सावध असा; त्यांना लांबलांब झगे घालून मिरवण्यास हवे असते; बाजारांत नमस्कार, सभास्थानांत मुख्य आसने व मेजवान्यांत मुख्य मुख्य जागा त्यांना आवडतात;
47ते विधवांची घरे गिळंकृत करतात आणि ढोंगाने लांबलचक प्रार्थना करतात; त्यांना अधिक शिक्षा होईल.”

Aktualisht i përzgjedhur:

लूक 20: MARVBSI

Thekso

Ndaje

Copy

None

A doni që theksimet tuaja të jenë të ruajtura në të gjitha pajisjet që keni? Regjistrohu ose hyr