लूक 24
24
येशू मरणातून पुन्हा उठले
1आठवड्याच्या पहिल्या दिवशी, भल्या पहाटेस, त्या स्त्रियांनी त्यांनी तयार केलेले मसाले घेतले आणि त्या कबरेकडे गेल्या; 2तेथे त्यांनी पाहिले की तो दगड कबरेपासून दूर सरकवलेला आहे, 3परंतु जेव्हा त्यांनी आत प्रवेश केला तेव्हा त्यांना प्रभू येशूंचे शरीर सापडले नाही. 4याबद्दल ते आश्चर्य करीत असतानाच, अकस्मात त्यांच्या बाजूला विजेसारखे चकाकणारी वस्त्रे घातलेले दोन पुरुष उभे राहिले. 5त्यामुळे त्या स्त्रिया भयभीत झाल्या व खाली वाकून त्यांनी आपली तोंडे भूमीकडे केली. पण ते पुरुष त्यांना म्हणाले, “जे जिवंत आहेत त्यांना तुम्ही मृतांमध्ये का शोधता? 6ते येथे नाही, ते पुन्हा उठले आहेत! गालीलात असताना त्यांनी तुम्हाला काय सांगितले होते याची आठवण करा. 7‘मानवपुत्र दुष्ट लोकांच्या हाती विश्वासघाताने धरून दिला जाईल, त्यांना क्रूसावर खिळून मारण्यात येईल आणि ते तिसर्या दिवशी पुन्हा उठतील.’ ” 8तेव्हा त्यांना त्यांचे शब्द आठवले.
9मग कबरेपासून परत येऊन त्यांनी येशूंच्या अकरा शिष्यांना आणि इतर सर्वांना हे वर्तमान सांगितले. 10ज्या स्त्रिया कबरेकडे गेल्या होत्या, त्यांत मरीया मग्दालिया, योहान्ना, याकोबाची आई मरीया आणि इतर ज्या त्यांच्याबरोबर होत्या त्यांनी हे प्रेषितांना सांगितले. 11परंतु त्यांनी त्या स्त्रियांवर विश्वास ठेवला नाही कारण त्यांना त्यांचे शब्द मूर्खपणाचे वाटले. 12पेत्र कबरेजवळ धावत गेला व त्याने आत डोकावून पाहिले, तेव्हा त्याला केवळ तागाची वस्त्रे पडलेली दिसली, तेव्हा काय घडले असावे याविषयी तो आश्चर्य करीत परत गेला.
अम्माऊस गावच्या रस्त्यावर
13त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी, येशूंचे दोन अनुयायी यरुशलेमपासून अंदाजे#24:13 किंवा सुमारे 11 किलोमीटर सात मैल असलेल्या अम्माऊस गावी चालले होते. 14घडलेल्या त्या सर्व गोष्टींविषयी ते एकमेकांबरोबर बोलत होते. 15ते एकमेकांशी बोलत व चर्चा करीत असताना प्रत्यक्ष येशू तेथे आले आणि त्यांच्याबरोबर चालू लागले. 16परंतु ते त्यांना ओळखणार नाहीत असे करण्यात आले होते.
17येशूंनी त्यांना विचारले, “चालताना, तुम्ही काय चर्चा करीत आहात?”
हा प्रश्न ऐकून ते शांत उभे राहिले, त्यांचे चेहरे दुःखी झाले. 18त्यांच्यापैकी क्लयपा नावाचा एकजण म्हणाला, “गेल्या काही दिवसात यरुशलेममध्ये घडलेल्या त्या घटनांची माहिती नसलेले असे तुम्ही एकटेच आहात काय?”
19“कसल्या घटना?” येशूंनी विचारले.
ते म्हणाले, “नासरेथ या गावातून आलेल्या येशूंविषयी, जो परमेश्वराच्या आणि सर्व लोकांच्या दृष्टीने उक्ती व कृती यामध्ये सामर्थ्यशाली असा संदेष्टा होता. 20मुख्य याजकांनी आणि आमच्या राज्यकर्त्यांनी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली, त्यांनी त्यांना क्रूसावर खिळून मारले. 21परंतु आम्हाला आशा होती की हा तोच जो इस्राएलास मुक्ती देणारा असा होता. या सर्वगोष्टी घडल्या त्याला आज तिसरा दिवस आहे. 22पण आमच्यातील काही स्त्रियांनी आम्हाला आश्चर्याचा मोठाच धक्का दिला आहे. त्या अगदी आज पहाटे कबरेकडे गेल्या. 23पण त्यांना त्यांचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन सांगितले की त्यांना देवदूतांचे दर्शन झाले व ते म्हणाले की येशू जिवंत आहे. 24तेव्हा आमच्यातील काही लोक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी जसे सांगितले होते तसेच त्यांना दिसले. परंतु येशूंचे शरीर त्यांना दिसले नाही.”
25तेव्हा येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही मूर्ख आहात आणि संदेष्ट्यांनी जे लिहिले आहे, त्यावर विश्वास ठेवण्यास मतिमंद आहात. 26आपल्या गौरवात जाण्यापूर्वी या गोष्टी ख्रिस्ताने सहन करणे गरजेचे आहे असे नाही काय?” 27नंतर त्यांनी संपूर्ण धर्मग्रंथातील मोशे व सर्व संदेष्ट्यांच्या लिखाणामधून स्वतःविषयी काय सांगितले आहे, हे त्यांना स्पष्ट केले.
28जेव्हा ते त्या गावाजवळ आले जेथे ते जात होते, तेव्हा येशूंनी पुढे जाणे चालू ठेवले, जसे की ते पुढे जात होते असे दर्शविले. 29परंतु त्यांनी त्यांना आग्रह करून म्हटले, “आमच्या येथे राहा, कारण संध्याकाळ होत चालली आहे.” तेव्हा येशू त्यांच्या घरी गेले.
30ते भोजनास बसले असताना, येशूंनी भाकर घेतली, आभार मानले, ती मोडली आणि ती त्यांना दिली. 31तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यांना ओळखले. त्याच क्षणाला येशू त्यांच्यापासून अंतर्धान पावले. 32ते एकमेकांस म्हणू लागले, “ते रस्त्याने आपल्यासोबत बोलत असताना आणि आपल्याला शास्त्रलेख समजावून सांगत असताना आपली अंतःकरणे प्रज्वलित झाली नाहीत काय?”
33तेव्हा त्याच घटकेस ते उठून यरुशलेमास माघारे गेले, तेथे येशूंचे अकरा शिष्य आणि इतर अनुयायी एकत्र जमले आहेत, असे त्यांनी पाहिले. 34जमलेले लोक म्हणत होते, “प्रभू खरोखर उठले आहे व त्यांनी शिमोनाला दर्शन दिले आहे.” 35तेव्हा त्या दोघांनी सांगितले की, ते रस्त्याने असताना काय घडले होते आणि येशूंनी भाकर मोडली तेव्हा त्यांनी त्यांना कसे ओळखले.
येशूंचे प्रेषितांना दर्शन
36ते हे सर्व सांगत असतानाच, प्रत्यक्ष येशू स्वतः अकस्मात त्यांच्यामध्ये उभे राहिले आणि म्हणाले, “तुम्हाला शांती असो.”
37आपण एखादा दुष्टात्मा पाहत आहोत असे वाटून, ते सर्व विलक्षण भयभीत झाले. 38येशूंनी त्यांना विचारले, “तुम्ही का घाबरला आणि तुमच्या मनात संशय का आला? 39माझे हात व माझे पाय पाहा. मी तोच आहे. भुतांना मांस व हाडे नसतात, पण मला ती आहेत हे तुम्ही पाहत आहात.”
40हे बोलल्यावर येशूंनी आपले हात व पाय त्यांना दाखविले. 41त्यावेळी त्यांची हृदये आनंदाने भरली, पण त्याबरोबरच त्यांच्या मनात संशयही दाटला होता. तेव्हा येशूंनी त्यांना विचारले, “तुमच्याजवळ येथे खावयास काही आहे काय?” 42तेव्हा त्यांनी त्यांना भाजलेल्या माशाचा एक तुकडा दिला. 43त्यांनी तो घेऊन त्यांच्यादेखत खाल्ला.
44मग येशू त्यांना म्हणाले, “मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रसंहितेमध्ये जे काही माझ्याविषयी लिहिले आहे ते सर्व खरे झालेच पाहिजे, हे मी तुम्हाला तुमच्याबरोबर असताना सांगितले होते.”
45मग शास्त्रलेख त्यांना समजावा म्हणून त्यांनी त्यांची मने उघडली. 46त्यांनी पुढे म्हटले, “ख्रिस्ताने दुःख सहन करावे, मरावे आणि तिसर्या दिवशी मरणातून पुन्हा उठावे या गोष्टी फार पूर्वी लिहून ठेवल्या होत्या. 47आणि यरुशलेमापासून आरंभ करून सर्व राष्ट्रांमध्ये त्यांच्या नावाने पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाची घोषणा करण्यात यावी. 48तुम्ही या सर्व गोष्टींचे साक्षी आहात. 49माझ्या पित्याने अभिवचन दिलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवीन. तुम्हाला वरून सामर्थ्य मिळेपर्यंत या शहरातच राहा.”
येशूंचे स्वर्गारोहण
50यानंतर येशूंनी त्यांना बेथानी गावापर्यंत नेले आणि आपले हात वर करून आशीर्वाद दिला. 51येशू त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांना सोडून स्वर्गात वर घेतले गेले. 52तेव्हा त्यांनी त्यांना नमन केले आणि मोठ्या आनंदाने ते यरुशलेमास परतले 53आणि ते मंदिरामध्ये नियमितपणे परमेश्वराची स्तुती करीत राहिले.
Aktualisht i përzgjedhur:
लूक 24: MRCV
Thekso
Ndaje
Copy
A doni që theksimet tuaja të jenë të ruajtura në të gjitha pajisjet që keni? Regjistrohu ose hyr
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.