उत्पत्ती 14
14
अब्राम लोटाची सुटका करतो
1शिनाराचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा कदार्लागोमर आणि गोयिमाचा राजा तिदाल ह्यांच्या दिवसांत असे झाले की, 2त्यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोईमाचा राजा शमेबर आणि बेला म्हणजे सोअर ह्याचा राजा ह्यांच्याशी युद्ध केले.
3हे सर्व एकजूट करून सिद्दीम खोर्यात गेले; हे खोरे म्हणजेच क्षारसमुद्र.
4ते कदार्लागोमर ह्यांचे बारा वर्षे अंकित होते, पण तेराव्या वर्षी ते त्याच्यावर उठले.
5चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या पक्षाचे राजे ह्यांनी येऊन अष्टरोथ-कर्णईम येथे रेफाई लोकांना, हाम येथे जूजी लोकांना, किर्याथाईमच्या मैदानात एमी लोकांना 6आणि होरी लोकांना त्यांच्या सेईर डोंगरात मार देऊन एल्-पारानाच्या जवळ रान होते तेथपर्यंत पिटाळून लावले.
7मग मागे परतून एन्-मिशपात म्हणजे कादेश येथे ते आले. त्यांनी अमालेकी लोकांचा सगळा देश जिंकला व हससोन-तामार येथे राहणार्या अमोरी लोकांनाही मार दिला.
8इकडे सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोईमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअर ह्याचा राजा हे त्यांच्याशी युद्ध करायला निघाले आणि सिद्दीम खोर्यात त्यांनी आपल्या सैन्याची रचना केली.
9एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयिमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक ह्यांच्याशी ते लढले; चार राजांनी पाच राजांशी सामना केला.
10सिद्दीम खोर्यात डांबराच्या खाणी पुष्कळ होत्या; सदोम व गमोरा ह्यांचे राजे पळत असता तेथे पडले व बाकीचे डोंगरात पळाले.
11तेव्हा सदोम व गमोरा येथील मालमत्ता व सगळी अन्नसामग्री शत्रू लुटून घेऊन गेले.
12अब्रामाचा पुतण्या लोट हा सदोम येथे राहत होता; त्याला त्यांनी धरून नेले आणि त्याची मालमत्ताही नेली.
13तेथून पळून आलेल्या एका मनुष्याने जाऊन अब्राम इब्री ह्याला हे वर्तमान सांगितले, त्या वेळी तो अष्कोल व आनेर ह्यांचा भाऊ अमोरी मम्रे ह्याच्या एलोन राईत राहत होता; हे अब्रामाच्या जुटीतले होते.
14आपल्या भाऊबंदांना पाडाव करून नेले हे अब्रामाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले तीनशे अठरा दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला.
15त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्यांच्यावर रात्रीची चाल केली आणि त्यांना मार देऊन दिमिष्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला.
16त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली; त्याप्रमाणेच आपला भाऊबंद लोट, त्याची मालमत्ता, स्त्रिया व लोक माघारी आणले.
मलकीसदेक अब्रामाला आशीर्वाद देतो
17कदार्लागोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे ह्यांना मारून तो माघारी येत असता त्याला भेटायला सदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येथवर सामोरा गेला.
18आणि शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षारस घेऊन त्याला सामोरा आला; हा परात्पर देवाचा याजक होता.
19त्याने त्याला असा आशीर्वाद दिला : “आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देवो;
20ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य!” तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा दहावा भाग दिला.
21मग सदोमाचा राजा अब्रामाला म्हणाला, “माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा.”
22पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी ह्याच्यासमोर मी बाहू उभारून सांगतो की,
23तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वहाणेचा बंद मी घेणार नाही; मी अब्रामास संपन्न केले असे म्हणायला तुम्हांला कारण न मिळो;
24ह्या तरुण माणसांनी अन्न खाल्ले तेवढे पुरे; माझ्याबरोबर आलेले आनेर, अष्कोल व मम्रे ह्यांना वाटा मिळाला म्हणजे पुरे; त्यांना आपला वाटा घेऊ द्या.”
Trenutno izabrano:
उत्पत्ती 14: MARVBSI
Istaknuto
Podeli
Kopiraj

Želiš li da tvoje istaknuto bude sačuvano na svim tvojim uređajima? Kreiraj nalog ili se prijavi
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.