YouVersion logo
Dugme za pretraživanje

योहान 3

3
येशू निकदेमास शिक्षण देतात
1आता निकदेम नावाचा एक परूशी, जो यहूदी प्रतिनिधीमंडळाचा सभासद होता, 2तो रात्री येशूंकडे आला व म्हणाला, “गुरुजी, आपण शिक्षक आहात व परमेश्वराकडून आलेले आहात, हे आम्हास माहीत आहे. कारण ही जी चिन्हे आपण करत आहात, ती परमेश्वर बरोबर असल्याशिवाय करता येणार नाही.”
3त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो, नवीन जन्म झाल्याशिवाय कोणालाही परमेश्वराचे राज्य पाहता येणार नाही.”#3:3 ग्रीक शब्द पुन्हा याचा अर्थ वरून असा होतो वचन 7
4तेव्हा निकदेमाने विचारले, “जे वृद्ध आहेत त्यांचा नव्याने जन्म कसा होऊ शकेल? त्यांना दुसर्‍या वेळी आपल्या मातेच्या उदरात जाऊन जन्म घेता येणे शक्य नाही!”
5येशूंनी उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो, पाण्याने आणि पवित्र आत्म्याने जन्म झाल्याशिवाय कोणीही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. 6शरीर शरीरालाच आणि आत्मा आत्म्याला जन्म देतो. 7‘तुझा नवीन जन्म झाला पाहिजे,’ या माझ्या विधानाचे आश्चर्य मानण्याचे कारण नाही. 8वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, परंतु तो कोठून आला व कोठे जाईल हे तुम्ही सांगू शकत नाही. तसेच जो प्रत्येकजण आत्म्यापासून जन्मतो त्यांच्या बाबतीत असेच आहे.”
9तेव्हा निकदेमाने विचारले, “पण हे कसे होईल?”
10“येशूंनी म्हटले, तुम्ही इस्राएलचे शिक्षक असूनही तुम्हाला या गोष्टी समजत नाही काय? 11मी तुला निश्चित सांगतो की जे आम्हास समजले आहे ते आम्ही बोलतो आणि आम्ही जे काही पाहिले आहे, त्याविषयी साक्ष देतो आणि तरीही तुम्ही लोक आमची साक्ष मान्य करीत नाही. 12मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हाला सांगितल्या तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही; तर मग स्वर्गीय गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा ठेवाल? 13स्वर्गातून आलेल्या मानवपुत्राशिवाय इतर कोणीही स्वर्गात गेला नाही.#3:13 काही मूळप्रतींमध्ये मनुष्य जो स्वर्गात आहे. 14जसा मोशेने जंगलात साप उंच केला, त्याचप्रमाणे मानवपुत्रालाही उंच केले जाईल,#3:14 उंच केले जाईल ग्रीक भाषेत हा शब्दाचा अर्थ गौरविले जाणे असाही आहे 15जो कोणी त्याजवर विश्वास ठेवेल, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.”
16कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. 17परमेश्वराने आपल्या पुत्राला या जगामध्ये, जगाला दोष लावण्यासाठी नव्हे तर, त्यांच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले आहे. 18जो त्यांच्यावर विश्वास ठेवतो तो दोषरहित ठरेल, परंतु जो विश्वास ठेवीत नाही तो दोषी ठरवण्यात आला आहे, कारण त्याने परमेश्वराच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवण्याचे नाकारले. 19निर्णय हाच आहे: प्रकाश या जगात आला आहे, परंतु लोकांनी प्रकाशाऐवजी अंधकाराची अधिक आवड धरली; कारण त्यांची कर्मे दुष्ट होती. 20दुष्कृत्ये करणारा प्रत्येकजण प्रकाशाचा द्वेष करतो आणि प्रकाशाकडे येत नाही, कारण आपली दुष्कृत्ये प्रकट होतील अशी त्याला भीती वाटते. 21परंतु जो सत्याने जीवन जगतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की जे काही त्यांनी केले ते परमेश्वराच्या दृष्टीने योग्य आहे, हे स्पष्ट दिसून यावे.
योहानाची येशूंविषयी साक्ष
22त्यानंतर, येशू आणि त्यांचे शिष्य यहूदीया प्रांतात आले आणि तेथे थोडा वेळ त्यांच्याबरोबर घालविला आणि बाप्तिस्मे केले. 23आता योहान शालिमाजवळ असलेले एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता, कारण तेथे विपुल प्रमाणात पाणी असून, लोक बाप्तिस्मा घेण्यासाठी सारखे येत असत. 24त्या वेळेपर्यंत योहान तुरुंगात टाकला गेला नव्हता. 25कोणाएका यहूदी माणसाने योहानाच्या शिष्यांबरोबर शुद्धीकरणाच्या विधिबद्दल वादविवाद केला. 26तेव्हा शिष्य योहानाकडे आले आणि म्हणाले, “गुरुजी, यार्देन नदीच्या पलीकडे जो मनुष्य आपल्याबरोबर होता व ज्यांच्याबद्दल आपण साक्ष दिली, ते बाप्तिस्मा करीत आहेत आणि पाहा, प्रत्येकजण त्यांच्याकडे जात आहे.”
27त्यावर योहानाने उत्तर दिले, “मनुष्याला जे काही स्वर्गातून दिले जाईल तेच प्राप्त होईल. 28‘मी ख्रिस्त नव्हे, परंतु त्यांच्यापुढे मला पाठविण्यात आले आहे,’ असे मी म्हटले होते याचे साक्षी तुम्हीच आहात. 29वधू वराची असते. वराचा मित्र जवळ थांबून त्याचे भाषण ऐकतो, वराचा आवाज ऐकून त्याचा आनंद पूर्ण होतो, तो आनंद माझा आहे आणि आता तो परिपूर्ण झाला आहे. 30ते अधिक थोर होवो, आणि मी लहान व्हावे.”#3:30 काही उलगडा करणारे अवतरन मार्क वचन 36 मध्ये त्याचा शेवट करतात.
31जो स्वर्गातून आलेला आहे तो इतर सर्वांपेक्षा थोर आहे. जो जगापासून आहे तो जगाचा आहे; व जगातील विषयांच्या बाबतीत बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांहून थोर आहे. 32त्यांनी जे पाहिले व ऐकले त्याविषयी ते साक्ष देतात, परंतु त्यांची साक्ष कोणीच मान्य करत नाही. 33जे कोणी त्यांची साक्ष स्वीकारतात, त्यांनी असे प्रमाणित केले की परमेश्वर सत्य आहे. 34ज्या कोणाला परमेश्वराने पाठविले, ते परमेश्वराची वचने बोलतात, कारण परमेश्वर विपुलतेचा आत्मा देतात. 35पिता पुत्रावर प्रीती करतात आणि त्याने प्रत्येक गोष्ट त्यांच्या हाती सोपविली आहे. 36जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन आहे; परंतु जे कोणी पुत्राला नाकारतात, ते जीवन पाहणार नाही, पण परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर राहील.

Trenutno izabrano:

योहान 3: MRCV

Istaknuto

Podijeli

Kopiraj

None

Želiš li da tvoje istaknuto bude sačuvano na svim tvojim uređajima? Kreiraj nalog ili se prijavi