योहान 7
7
येशू मंडपाच्या सणास जातात
1यानंतर, येशू गालीलाच्या अवतीभोवती फिरले. त्यांना यहूदीया प्रांतातून जाण्याची इच्छा नव्हती,#7:1 काही मूळप्रतींमध्ये त्याला अधिकार नव्हता. कारण तेथील यहूदी पुढारी त्यांना जिवे मारण्यासाठी मार्ग शोधत होते. 2परंतु जेव्हा यहूदीयांच्या मंडपाचा सण जवळ आला, 3येशूंचे भाऊ त्यांना म्हणाले, “तुम्ही गालीलातून निघून यहूदीयात जा, म्हणजे तेथील तुमच्या शिष्यांना जे कार्य तुम्ही करता ते पाहावयास मिळेल. 4ज्याला प्रसिद्धी पाहिजे असा कोणी गुप्तपणे काही करीत नाही. तुम्ही या गोष्टी करीत आहात, तर जगाला प्रकट व्हा.” 5कारण त्यांच्या भावांचा देखील त्यांच्यावर विश्वास नव्हता.
6यावर येशूंनी त्यांना म्हटले, “माझी वेळ अद्यापि आलेली नाही; तुम्हाला कोणतीही वेळ योग्यच आहे. 7जग तुमचा द्वेष करू शकत नाही, परंतु माझा द्वेष करते, कारण जगाची कर्मे दुष्ट आहेत अशी मी त्यांच्याविषयी साक्ष देतो. 8तुम्ही सणास जा. मी या सणास वर जात नाही कारण माझी वेळ अजून आली नाही.” 9त्यांना असे सांगितल्यावर, ते गालीलातच राहिले.
10तथापि, असे असूनही, येशूंचे भाऊ सणासाठी गेल्यानंतर, येशूही, उघडपणे नव्हे, तर गुप्तपणे तेथे गेले. 11आता सणात यहूदी पुढारी येशूंवर नजर ठेवून विचारपूस करीत होते, “की ते कोठे आहेत?”
12समुदायामध्ये त्यांच्याबद्दल सर्वत्र चर्चा होत होती. काही म्हणत होते, “तो खरोखर चांगला माणूस आहे.”
तर इतर म्हणत होते, “नाही, तो लोकांची फसवणूक करतो.” 13परंतु यहूदी पुढार्यांच्या भीतीमुळे लोकांसमोर त्यांच्याविषयी बोलण्यास कोणीच धजत नव्हते.
येशू सणामध्ये शिकवितात
14मग अर्धा सण पार पडल्यानंतर येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि शिकवू लागले. 15जे यहूदी तेथे होते ते चकित झाले आणि विचारू लागले, “हा मनुष्य शिकला नसून हे ज्ञान त्याला कसे प्राप्त झाले?”
16येशू त्यांना म्हणाले, “माझी शिकवण माझी स्वतःची नसून ज्यांनी मला पाठविले, त्यांची आहे. 17जर कोणी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करण्याचा निर्धार करेल तर त्याला खात्रीने समजेल की माझी शिकवण परमेश्वरापासून आहे की मी स्वतःच्या मनाचे बोलत आहे. 18जो कोणी स्वतःचे विचार मांडतो तो स्वतःचे गौरव करतो, परंतु जो ज्याने त्याला पाठविले त्याला गौरव मिळावे म्हणून बोलतो, तो मनुष्य खरा आहे; व त्याच्यात खोटेपण नाही. 19मोशेने तुम्हाला नियमशास्त्र दिले आहे ना? तरी तुम्हापैकी एकही नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही मला ठार मारण्याचा प्रयत्न का करता?”
20त्यावर लोकसमुदायाने उत्तर दिले, “तू भूतग्रस्त आहेस. तुला जिवे मारण्याचा प्रयत्न कोण करीत आहे?”
21येशू त्यांना म्हणाले, “मी एक चमत्कार केला आणि तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटले. 22मोशेने तुम्हाला सुंतेचा नियम दिला तरी, ही प्रथा मोशेद्वारे आली नसून, पूर्वजांपासून आलेली आहे, त्यानुसार तुम्ही मुलाची सुंता शब्बाथ दिवशी करता. 23मोशेच्या नियमांचा भंग होऊ नये म्हणून मुलाची सुंता जर शब्बाथ दिवशी करता, मी शब्बाथ दिवशी एका मनुष्याला पूर्ण स्वास्थ्य दिले तर माझ्यावर का रागावता? 24तोंड बघून न्याय करू नका, तर यथायोग्य न्याय करा.”
येशू कोण आहे यावरून फूट पडते
25यरुशलेममध्ये राहणारे काही लोक आपआपसात विचारू लागले, “ज्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत आहेत तो हाच मनुष्य नाही काय? 26हा तर, येथे जाहीरपणे बोलत आहे आणि ते एक शब्दही बोलत नाहीत. तर मग हाच ख्रिस्त आहे अशी आपल्या पुढार्यांना खात्री पटली आहे का? 27परंतु हा माणूस कोठून आला आहे हे आपणास माहीत आहे; जेव्हा ख्रिस्त येईल, तेव्हा तो कोठून येईल हे कोणालाही कळणार नाही.”
28हे ऐकून मंदिराच्या आवारात, शिकवीत असताना, येशू मोठ्याने म्हणाले, “होय, मी कोण, कोठला हे सर्व तुम्हाला ठाऊक आहे. तरी मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने येथे आलो नाही, परंतु ज्याने मला पाठविले तो खरा आहे; त्यांना तुम्ही ओळखीत नाही, 29पण मी त्यांना ओळखतो, कारण मी त्यांच्यापासून आहे आणि त्यांनीच मला पाठविले आहे.”
30त्यांनी येशूंना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणी त्यांच्यावर हात टाकू शकले नाही, कारण त्यांची वेळ अद्यापि आली नव्हती. 31तरी, लोकसमुदायामधील अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. ते म्हणाले, “जेव्हा ख्रिस्त मसीहा येईल, तेव्हा तो या मनुष्यापेक्षा अधिक चिन्हे करील काय?”
32जेव्हा परूश्यांनी लोकांची त्यांच्याबद्दल चाललेली कुजबुज ऐकली. तेव्हा त्यांनी आणि प्रमुख याजकांनी येशूंना अटक करण्यासाठी मंदिराचे शिपाई पाठविले.
33येशू त्यांना म्हणाले, “मी तुमच्याजवळ आणखी थोडा वेळ राहणार आहे, मग ज्याने मला पाठविले, त्यांच्याकडे परत जाईन. 34तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी तुम्हाला सापडणार नाही आणि मी जेथे असेन, तेथे तुम्हाला येता येणार नाही.”
35यहूदी पुढारी एकमेकांस विचारू लागले, “या माणसाचा कुठे जाण्याचा विचार आहे की तो आपणास सापडणार नाही? कदाचित हा आपले लोक जे ग्रीक लोकांमध्ये पांगलेले आहेत, त्या लोकांना शिक्षण देण्यासाठी जात असेल काय? 36‘तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी तुम्हाला सापडणार नाही आणि मी जेथे असेन, तेथे तुम्हाला येता येणार नाही,’ असे तो बोलला याचा अर्थ तरी काय असावा?”
37मग सणाच्या शेवटच्या म्हणजे सर्वात महत्वाच्या दिवशी, येशू मोठ्याने म्हणाले, “जे कोणी तान्हेले असतील, त्यांनी माझ्याकडे यावे आणि प्यावे. 38जे कोणी माझ्यावर विश्वास ठेवतात, शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे, त्यांच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” 39त्यांच्या म्हणण्याचा अर्थ पवित्र आत्मा, ज्यांनी विश्वास ठेवला त्या प्रत्येकाला दिला जाणार होता. परंतु तो आत्मा दिला गेला नव्हता, कारण येशूंचे गौरव अद्याप झाले नव्हते.
40त्यांचे हे शब्द ऐकल्यावर, त्यांच्यातील काहीजण म्हणाले, “खरोखर हा मनुष्य संदेष्टा आहे.”
41इतर काही म्हणाले, “हेच ख्रिस्त आहेत.”
पण इतर काहीजण म्हणाले, “ख्रिस्त गालीलातून येऊ शकेल काय? 42शास्त्रलेख असे सांगत नाही का, दावीदाच्या कुळात, बेथलेहेममध्ये, जेथे दावीद राहिला तेथून ख्रिस्त येईल?” 43अशा रीतीने लोकसमुदायात येशूंमुळे फूट पडली. 44काहींना त्यांना पकडावेसे वाटले, परंतु कोणीही त्यांच्यावर हात टाकला नाही.
यहूदी पुढार्यांचा अविश्वास
45शेवटी मंदिराचे शिपायी प्रमुख याजक व परूशी यांच्याकडे परत आले, त्यांनी विचारले, “तुम्ही त्याला आत का आणले नाही?”
46शिपाई उत्तर देत म्हणाले, “या मनुष्यासारखे आतापर्यंत कोणीही बोलले नाही.”
47त्यावर उलट उत्तर देत परूशी म्हणाले, “तुम्हालाही त्याने फसवले आहे काय?” 48अधिकार्यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय? 49नाही! परंतु हा समुदाय ज्यांना नियमशास्त्राविषयी माहिती नाही—तो शापित आहे.
50निकदेम, हा त्यांच्यापैकी एक असून, जो पूर्वी येशूंकडे गेला होता, म्हणाला, 51“एखाद्याचे प्रथम न ऐकता व जे कार्य तो करत आहे ते समजून न घेता नियमशास्त्र त्याला दोषी ठरविते काय?”
52त्यावर त्यांनी उत्तर दिले, “तुम्हीदेखील गालीलकर आहात काय? शोधून पाहा म्हणजे तुम्हाला समजेल की गालीलातून कोणताही संदेष्टा येत नाही.”
53नंतर ते सर्वजण घरी गेले.
Trenutno izabrano:
योहान 7: MRCV
Istaknuto
Podijeli
Kopiraj
Želiš li da tvoje istaknuto bude sačuvano na svim tvojim uređajima? Kreiraj nalog ili se prijavi
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.