मत्तय 20

20
द्राक्षमळ्याचा दाखला
1स्वर्गाचे राज्य त्याच्या द्राक्षमळ्यात मजूर लावण्यासाठी पहाटे बाहेर पडलेल्या घरधन्यासारखे आहे. 2त्याने रोजची नेहमीची मजुरी ठरवून मजुरांना त्याच्या द्राक्षमळ्यात पाठवले. 3त्यानंतर तो नऊच्या सुमारास बाहेर गेला तेव्हा त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. 4तो त्यांना म्हणाला, “तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हांला देईन.’ म्हणून ते गेले. 5पुन्हा बाराच्या व तीनच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले. 6मग पाचच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, “तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहात?’ 7ते त्याला म्हणाले, “आम्हांला कोणी कामावर घेतले नाही.” त्याने त्यांना म्हटले, “तुम्हीही द्राक्षमळ्यात कामाला जा.’
8संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, “कामगारांना बोलाव आणि शेवटी आलेल्या कामगारापासून सुरुवात करून पहिल्यापर्यंत सर्वांना मजुरी दे.’ 9जे पाचच्या सुमारास लावले होते ते आल्यावर त्यांना संपूर्ण दिवसाची मजुरी मिळाली. 10जे पहिले आले होते त्यांना आपल्याला अधिक मजुरी मिळेल, असे वाटले. पण त्यांनाही तेवढीच मिळाली. 11ती घेतल्यावर ते घरधन्याविरुद्ध कुरकुर करत म्हणाले, 12‘ह्या शेवटी आलेल्यांनी एकच तास काम केले. आम्ही दिवसभर उन्हातान्हात कष्ट केले आणि आम्हांला व त्यांना आपण सारखीच मजुरी दिली.’
13त्याने त्यांतील एकाला उत्तर दिले, “मित्रा, मी तुझ्यावर अन्याय करत नाही, तू माझ्याबरोबर मजुरीचा करार केला होतास ना? 14तू आपली मजुरी घेऊन नीघ. जसे तुला तसे ह्या शेवटच्या कामगारालाही द्यावे, अशी माझी इच्छा आहे. 15जे माझे आहे, त्याचे मी माझ्या मर्जीप्रमाणे करायला स्वतंत्र नाही काय? अथवा मी उदार आहे, हे तुझ्या डोळ्यात सलते काय?’
16अशा प्रकारे शेवटचे ते पहिले व पहिले ते शेवटचे होतील.”
स्वतःच्या मृत्यूबद्दल येशूने तिसऱ्यांदा केलेले भाकीत
17येशू यरुशलेमकडे जायला निघाला असताना त्याने बारा शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले, 18“पाहा, आपण यरुशलेमला जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल, ते त्याला देहान्ताची शिक्षा देतील, 19निर्भर्त्सना करायला, फटके मारायला व क्रुसावर चढवायला ते त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील व तिसऱ्या दिवशी तो उठवला जाईल.”
याकोब व योहान ह्यांची महत्त्वाकांक्षा
20त्या वेळी जब्दीची पत्नी तिच्या मुलांसह येशूकडे येऊन त्याला नमन करून त्याच्याकडून काही मागू लागली.
21त्याने तिला म्हटले, “तुला काय पाहिजे?” ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाला तुमच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे स्थान मिळेल, असे जाहीर करा.”
22येशू म्हणाला, “तुम्ही काय मागत आहात, हे तुम्हांला समजत नाही. जो प्याला मला प्राशन केला पाहिजे, तो तुम्ही पिऊ शकाल का? जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे, तो तुम्ही घेऊ शकाल का?” ते त्याला म्हणाले, “आम्ही तसे करू शकू.”
23त्याने त्यांना म्हटले, “माझा प्याला तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे तो तुम्ही घ्याल, हे खरे, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसू देणे माझ्या हाती नाही. तर त्या जागा ज्यांच्यासाठी माझ्या पित्याने सिद्ध केल्या आहेत, त्यांना मिळतील.”
24हे ऐकून इतर दहा शिष्य त्या दोघा भावांवर संतापले.
खरा मोठेपणा
25परंतु येशूने त्यांना एकत्र बोलावून म्हटले, “परराष्ट्रीयांत सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत, ते लोकांवर सत्ता चालवतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार गाजवतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. 26पण तुमचे तसे नसावे. जो तुमच्यामध्ये थोर होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे 27आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो, त्याने तुमचा दास व्हावे. 28जसे मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला नव्हे, तर सेवा करायला व पुष्कळांसाठी आपला प्राण खंडणी म्हणून अर्पण करायला आला आहे.”
दोन आंधळ्यांना दृष्टिदान
29येशू आणि त्याचे शिष्य यरीहो सोडून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून जाऊ लागला. 30तेव्हा येशू जवळून जात आहे, हे ऐकून रस्त्याच्या कडेला बसलेले दोन आंधळे ओरडून म्हणाले, “प्रभो, दावीदपुत्रा, आमच्यावर दया करा.”
31त्यांनी गप्प राहावे म्हणून लोकांनी त्यांना धमकावले, परंतु ते अधिकच ओरडून म्हणाले, “प्रभो, दावीदपुत्रा, आमच्यावर दया करा.”
32येशूने थांबून त्यांना बोलावून म्हटले, “मी तुमच्यासाठी काय करावे, अशी तुमची इच्छा आहे?”
33ते त्याला म्हणाले, “प्रभो, आम्हांला दृष्टी प्राप्त व्हावी.”
34येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्यांना तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्या मागे गेले.

ప్రస్తుతం ఎంపిక చేయబడింది:

मत्तय 20: MACLBSI

హైలైట్

షేర్ చేయి

కాపీ

None

మీ పరికరాలన్నింటి వ్యాప్తంగా మీ హైలైట్స్ సేవ్ చేయబడాలనుకుంటున్నారా? సైన్ అప్ చేయండి లేదా సైన్ ఇన్ చేయండి