मत्तय 1

1
येशू ख्रिस्त यांची वंशावळी
1अब्राहामाचा पुत्र दावीदाचा पुत्र, येशू ख्रिस्त#1:1 ख्रिस्त अर्थ अभिषिक्त यांची वंशावळी आहे:
2अब्राहाम इसहाकाचा पिता होता,
इसहाक याकोबाचा पिता,
याकोब हा यहूदा व त्याचे भाऊ यांचा पिता होता,
3यहूदा हा पेरेस व जेरह यांचा पिता, याच्या आईचे नाव तामार असे होते,
पेरेस हा हेस्रोनचा पिता,
हेस्रोन अरामचा पिता,
4अराम हा अम्मीनादाबाचा पिता,
अम्मीनादाब नहशोनाचा पिता,
नहशोन हा सल्मोनाचा पिता,
5सल्मोन हा बवाजाचा पिता, बवाजाच्या आईचे नाव राहाब असे होते,
बवाज हा ओबेदाचा पिता, ओबेदची आई रूथ होती,
ओबेद हा इशायाचा पिता,
6इशाय हा दावीद राजाचा पिता,
दावीद हा शलमोनाचा पिता, शलमोनाची आई पूर्वी उरीयाची पत्नी होती,
7शलमोन रहबामाचा पिता,
रहबाम अबीयाचा पिता,
अबीया आसाचा पिता,
8आसा यहोशाफाटाचा पिता,
यहोशाफाट हा योरामाचा पिता,
योराम हा उज्जीयाचा पिता,
9उज्जीया योथामाचा पिता,
योथाम आहाजाचा पिता,
आहाज हिज्कीयाचा पिता,
10हिज्कीया मनश्शेचा पिता,
मनश्शे आमोनाचा पिता,
आमोन योशीयाचा,
11योशीया हा यखन्या#1:11 यखन्या किंवा यहोयाखीन वचन 12 सुद्धा व त्यांचे भाऊ यांचा पिता होता, हे बाबेलमध्ये हद्दपार केले तेव्हा झाले.
12बाबेलमध्ये हद्दपार झाल्यावर:
यखन्या हा शल्तीएलचा पिता,
शल्तीएल हा जरूब्बाबेलाचे पिता,
13जरूब्बाबेल अबीहूदचा पिता,
अबीहूद हा एल्याकीमचा पिता,
एल्याकीम हा अज्जूरचा पिता,
14अज्जूर हा सादोकाचा पिता,
सादोक हा याखीमचा पिता,
याखीम हा एलीहूदाचा पिता,
15एलीहूद हा एलाजाराचा पिता,
एलाजार हा मत्तानाचा पिता,
मत्तान याकोबाचा पिता,
16याकोब हा योसेफाचा पिता, योसेफ मरीयेचा पती होता; मरीया येशूंची आई होती ज्यांना ख्रिस्त म्हणत.
17अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढया, दावीदापासून बाबेलच्या बंदीवासापर्यंत चौदा पिढया, बंदीवासापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढया.
योसेफ येशूंना स्वतःचा पुत्र म्हणून स्वीकारतो
18येशू ख्रिस्त यांचा जन्म अशाप्रकारे झाला: त्यांची आई मरीया, हिचे लग्न योसेफाबरोबर ठरलेले होते. परंतु ते दोघे एकत्र येण्यापूर्वीच, मरीया पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती आहे असे आढळून आले. 19तिचा पती योसेफ हा नीतिमान#1:19 नीतिमान अर्थात् विश्वासूपणे नियमांचे पालन करणारा होता, आणि समाजात तिला लज्जित करू नये म्हणून त्याने तिला गुप्तपणे घटस्फोट देण्याचे मनात ठरविले.
20परंतु हे त्याने ठरविल्यानंतर, प्रभुचा एक दूत त्याला स्वप्नात प्रकट झाला आणि म्हणाला, “योसेफा दावीदाच्या पुत्रा, आपली पत्नी म्हणून मरीयेला घरी नेण्यास भिऊ नकोस, कारण जे तिच्या गर्भामध्ये आहे ते पवित्र आत्म्याकडून आहे. 21ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्यांचे नाव येशू#1:21 येशू हिब्री भाषेत यहोशवा अर्थ प्रभू जो तारण करतो ठेव, कारण तेच आपल्या लोकांचे त्यांच्या पापांपासून तारण करतील.”
22प्रभुने आपल्या संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व घडून आले. 23“कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल, आणि त्यांचे नाव इम्मानुएल ठेवतील”#1:23 यश 7:14 (इम्मानुएलचा अर्थ “परमेश्वर आम्हाबरोबर”).
24योसेफाने जागा झाल्यावर, प्रभुच्या दूताने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले आणि मरीयेला त्याची पत्नी म्हणून घरी आणले. 25तरीपण तिच्या पुत्राचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी संबंध ठेवला नाही. मग योसेफाने त्यांचे नाव येशू ठेवले.

Поточний вибір:

मत्तय 1: MRCV

Позначайте

Поділитись

Копіювати

None

Хочете, щоб ваші позначення зберігалися на всіх ваших пристроях? Зареєструйтеся або увійдіть