Biểu trưng YouVersion
Biểu tượng Tìm kiếm

योहान 10

10
उत्तम मेंढपाळ
1मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे.
2जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे.
3त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो; मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या-त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो.
4तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याची वाणी ओळखतात.
5ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्यांची वाणी ओळखत नाहीत.”
6हा दृष्टान्त येशूने त्यांना सांगितला, तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही.
7म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे.
8जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत; त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही.
9मी दार आहे. माझ्या द्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारणप्राप्ती होईल; तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खाण्यास मिळेल.
10चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो; मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.
11मीच उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरता आपला प्राण देतो.
12जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे, ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडगा येत असलेला पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दाणादाण करतो.
13मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढरांची काळजी नाही.
14,15मी उत्तम मेंढपाळ आहे; जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो.
16ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत; ती माझी वाणी ऐकतील; मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.
17मी आपला प्राण परत घेण्याकरता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो.
18कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे.”
19ह्या शब्दांवरून यहूद्यांत पुन्हा फूट पडली.
20त्यांच्यातील पुष्कळ जण म्हणाले, “त्याला भूत लागले आहे व तो वेडा आहे; त्याचे तुम्ही का ऐकता?”
21दुसरे म्हणाले, “ही वचने भूतग्रस्ताची नाहीत; भुताला आंधळ्याचे डोळे उघडता येतात काय?”
पुनःस्थापनेच्या सणाच्या वेळी येशू
22तेव्हा यरुशलेमेत पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा होता;
23आणि येशू मंदिरामधील शलमोनाच्या देवडीत फिरत होता.
24तेव्हा यहूद्यांनी त्याला गराडा घालून म्हटले, “तुम्ही कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असलात तर आम्हांला उघड सांगा.”
25येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही; जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात.
26तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही.
27माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात;
28मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही.
29पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे; आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही.
30मी आणि पिता एक आहोत.”
यहूद्यांनी दाखवलेले शत्रुत्व
31तेव्हा यहूद्यांनी त्याला दगडमार करायला पुन्हा दगड उचलले.
32येशू त्यांना म्हणाला, “मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हांला दाखवली आहेत. त्यांतून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता?”
33यहूद्यांनी त्याला उत्तर दिले, “चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुम्हांला दगडमार करत नाही, तर दुर्भाषणासाठी; कारण तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणवता.”
34येशूने त्यांना म्हटले, “‘तुम्ही देव आहात असे मी म्हणालो’ हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय?”
35ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले, - आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही -
36तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला, ‘मी देवाचा पुत्र आहे’ असे म्हटल्यावरून ‘तुम्ही दुर्भाषण करता’ असे तुम्ही म्हणता काय?
37मी आपल्या पित्याची कृत्ये करत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका;
38परंतु जर मी ती करतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा; अशासाठी की, माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे.”
39ते त्याला पुन्हा धरायला पाहू लागले; परंतु तो त्यांच्या हाती न लागता निघून गेला.
40मग तो पुन्हा यार्देनेच्या पलीकडे, योहान पहिल्याने बाप्तिस्मा करत असे त्या ठिकाणी गेला व तेथे राहिला.
41तेव्हा त्याच्याकडे पुष्कळ लोक आले; ते म्हणाले, “योहानाने काही चिन्ह केले नाही खरे; तरी योहानाने ह्याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.”
42तेथे पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

Tô màu

Chia sẻ

Sao chép

None

Bạn muốn lưu những tô màu trên tất cả các thiết bị của mình? Đăng ký hoặc đăng nhập