Biểu trưng YouVersion
Biểu tượng Tìm kiếm

योहान 17

17
येशूची प्रार्थना
1ह्या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, “हे माझ्या पित्या, वेळ आली आहे; पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू आपल्या पुत्राचा गौरव कर;
2कारण जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्यमात्रावर त्याला अधिकार दिला आहेस.
3सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.
4जे काम तू मला करायला दिलेस ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे.
5तर आता हे माझ्या पित्या, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्याजवळ होता त्याच्या योगे तू आपणाजवळ माझा गौरव कर.
6जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रकट केले; ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस; आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे.
7आता त्यांना समजले आहे की, जे काही तू मला दिले आहेस ते सर्व तुझ्यापासून आहे.
8कारण जी वचने तू मला दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली; मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवलेस असा त्यांनी विश्वास ठेवला.
9त्यांच्यासाठी मी विनंती करतो; मी जगासाठी विनंती करत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी; कारण ते तुझे आहेत.
10जे माझे ते सर्व तुझे आहे, आणि जे तुझे ते माझे आहे, आणि त्यांच्या ठायी माझा गौरव झाला आहे.
11ह्यापुढे मी जगात नाही, पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे.
12जोपर्यंत मी जगात त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले; मी त्यांचा सांभाळ केला, आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही; शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले.
13पण आता मी तुझ्याकडे येत आहे; आणि माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो.
14मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.
15तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करतो.
16जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.
17तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे.
18जसे तू मला जगात पाठवलेस तसे मीही त्यांना जगात पाठवले,
19आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करतो.
20मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो,
21ह्यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या-माझ्यामध्ये [एक] व्हावे, कारण तू मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा.
22तू जो गौरव मला दिला आहेस तो मी त्यांना दिला आहे, ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे;
23म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये; ह्यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीती केलीस तशी त्यांच्यावरही प्रीती केलीस.
24हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे; ह्यासाठी की, जो माझा गौरव तू मला दिला आहेस तो त्यांनी पाहावा; कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस.
25हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, पण मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवलेस असे त्यांनी ओळखले आहे.
26मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन; ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”

Tô màu

Chia sẻ

Sao chép

None

Bạn muốn lưu những tô màu trên tất cả các thiết bị của mình? Đăng ký hoặc đăng nhập