Biểu trưng YouVersion
Biểu tượng Tìm kiếm

योहान 20

20
रिकामी कबर
1आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरीया मग्दालीया कबरेजवळ आली, आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले.
2तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हांला ठाऊक नाही.”
3ह्यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जाण्यास निघाले.
4तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले; आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहचला;
5त्याने ओणवून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही.
6मग शिमोन पेत्रही त्याच्यामागून येऊन पोहचला व कबरेत शिरला;
7आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे, तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले.
8तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला.
9कारण ‘त्याने मेलेल्यांमधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे’ हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता.
10तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले.
येशूचे मरीयेला दर्शन
11इकडे मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले.
12आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ, बसलेले तिला दिसले.
13ते तिला म्हणाले, “बाई, का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून.”
14असे बोलून ती पाठमोरी फिरली, तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला; परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही.
15येशूने तिला म्हटले, “बाई, का रडतेस? कोणाचा शोध करतेस?” तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, “दादा, तू त्याला येथून नेले असलेस तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.”
16येशूने तिला म्हटले, “मरीये!” ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, “रब्बूनी!” (म्हणजे गुरूजी!)
17येशूने तिला म्हटले, “मला बिलगून बसू नकोस; कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.”
18मरीया मग्दालीया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले.
येशूचे प्रेषितांना दर्शन
19त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती असो.”
20असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली; तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला.
21येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो.”
22असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा.
23ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे; आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.”
येशूचे थोमाला दर्शन
24येशू आला तेव्हा बारा जणांतील एक म्हणजे दिदुम1 म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता.
25म्हणून दुसर्‍या शिष्यांनी त्याला सांगितले, “आम्ही प्रभूला पाहिले.” पण त्याने त्यांना म्हटले, “त्याच्या हातांत खिळ्यांचे वण पाहिल्यावाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यावाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही.”
26मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती असो.”
27नंतर त्याने थोमाला म्हटले, “तू आपले बोट इकडे कर. माझे हात पाहा. आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असू नकोस, तर विश्वास ठेवणारा अस.”
28थोमाने त्याला म्हटले, “माझा प्रभू व माझा देव!”
29येशूने त्याला म्हटले, “तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस; पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.”
ह्या शुभवर्तमानाचा हेतू
30ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली.
31येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हांला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत.

Tô màu

Chia sẻ

Sao chép

None

Bạn muốn lưu những tô màu trên tất cả các thiết bị của mình? Đăng ký hoặc đăng nhập