Biểu trưng YouVersion
Biểu tượng Tìm kiếm

लूक 19

19
जकातदार जक्क य
1येशूने यरीहो नगरात प्रवेश केला व तेथून तो पुढे जात होता. 2तेथे पाहा, जक्कय नावाचा एक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार होता व श्रीमंत होता. 3येशू कोण आहे, हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना कारण तो ठेंगणा होता. 4म्हणून पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी तो एका उंबराच्या झाडावर चढला कारण येशू त्या वाटेने जाणार होता. 5येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, “जक्कय, त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.”
6त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले. 7हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे.
8जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभो, पाहा, माझ्या संपत्तीचा अर्धा हिस्सा मी गोरगरिबांना देईन व अन्यायाने मी कोणाचे काही घेतले असेल, तर ते चौपट परत करीन.”
9येशूने त्याला म्हटले, “आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहामाचा पुत्र आहे. 10मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधायला व तारायला आला आहे.”
मोहरांचा दाखला
11लोक ह्या गोष्टी ऐकत असता येशूने त्यांना एक दाखला सांगितला. कारण तो यरुशलेमजवळ पोहोचला होता आणि देवाचे राज्य आता लवकरच प्रकट होणार आहे, असे त्यांना वाटत होते. 12तो म्हणाला, “आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने एक उमराव दूर देशी जायला निघाला. 13जाण्यापूर्वी त्याने त्याच्या दहा दासांना बोलावले व त्यांना प्रत्येकी एकेक सोन्याची मोहर देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत हिच्या साहाय्याने व्यापार करा.’ 14त्याच्या नगरातले लोक त्याचा द्वेष करीत असत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग प्रतिनिधी पाठवून कळवले, ‘ह्याने आम्हांवर राज्य करावे, अशी आमची इच्छा नाही.’
15तो राजा होऊन परत आल्यावर त्याच्या दासांनी व्यापारात काय काय मिळविले, हे पाहावे म्हणून त्याने त्यांना स्वतःकडे बोलावण्यास सांगितले. 16पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, ‘महाराज, तुमच्या मोहरेवर मी आणखी दहा मोहरा मिळवल्या आहेत.’ 17त्याने त्याला म्हटले, ‘शाब्बास, भल्या दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर मी तुला अधिकार देईन.’ 18नंतर दुसरा येऊन म्हणाला, ‘महाराज, तुमच्या मोहरेवर मी आणखी पाच मोहरांची कमाई केली आहे.’ 19त्यालाही त्याने म्हटले, ‘तुलाही मी पाच नगरांवर अधिकार देईन.’
20त्यानंतर आणखी एक दास येऊन म्हणाला, ‘महाराज, ही पाहा तुमची मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती. 21कारण आपण कठोर असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जे आपण ठेवले नाही, ते आपण घेता व जे आपण पेरले नाही, त्याची कापणी करता.’ 22तो त्याला म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच शब्दांत तुझा न्याय करतो. मी कठोर माणूस आहे, जे मी ठेवले नाही, ते घेतो व जे मी पेरले नाही, त्याची कापणी करतो, हे तुला ठाऊक होते ना? 23मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाही? ठेवला असता, तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.’
24त्याने जवळ उभे राहणाऱ्यांना सांगितले, ‘ह्याच्याकडून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’ 25ते त्याला म्हणाले, ‘महाराज, त्याच्याजवळ तर दहा मोहरा आहेत!’ 26‘मी तुम्हांला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे, त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ काहीच नाही, त्याचे जे आहे, तेदेखील त्याच्याकडून घेतले जाईल. 27परंतु ज्या माझ्या वैऱ्यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये, असे होते, त्यांना येथे आणा व माझ्यासमोर ठार मारा.’”
येशूचा यरुशलेम नगरीत जयोत्सवाने प्रवेश
28ह्या गोष्टी सांगून झाल्यावर यरुशलेमकडे वर चढत असता स्वतः येशू सर्वांच्या पुढे चालत होता. 29ज्याला ऑलिव्ह डोंगर म्हणतात त्याच्याजवळ असलेल्या बेथफगे व बेथानी ह्या गावांजवळ तो येऊन पोहचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठविले, 30“तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे तेथे पोहोचताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू तुम्हांला बांधलेले आढळेल. ते सोडून आणा. 31तुम्ही ते का सोडता, असे कोणी तुम्हांला विचारले, तर प्रभूला ह्याची गरज आहे, असे सांगा.”
32ज्यांना पाठवले होते, ते तेथे गेल्यावर त्यांना त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. 33ते शिंगरू सोडत असता त्याचा धनी त्यांना म्हणाला, “शिंगरू का सोडता?”
34“प्रभूला ह्याची गरज आहे”, त्यांनी उत्तर दिले. 35त्यांनी ते येशूकडे आणले. आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसवले. 36तो पुढे जात असता लोक त्यांची वस्त्रे वाटेवर पसरीत गेले.
37तो ऑलिव्ह डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य आणि लोकसमुदाय जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती, त्या सर्वांमुळे आनंदित होऊन उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले, 38“प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्य असो! स्वर्गात शांती. आणि सर्वोच्च स्वर्गात प्रभूला गौरव.”
39लोकसमुदायातील काही परुश्यांनी त्याला म्हटले, “गुरुवर्य, आपल्या शिष्यांना आवरा.”
40त्याने म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, ते गप्प राहिले, तर धोंडे ओरडू लागतील.”
यरुशलेमकडे पाहून येशूने केलेला विलाप
41येशू नगरीजवळ आल्यावर तिच्याकडे पाहून तिच्याकरिता विलाप करीत म्हणाला, 42“जर तू, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आत्ता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. 43पुढे तुला असे दिवस येणार आहेत की, त्यांत तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील; तुझा चहूकडून कोंडमारा करतील. 44तुला व तुझ्या लोकांना धुळीस मिळवतील. तुझ्यामध्ये दगडावर दगड राहू देणार नाहीत कारण तुझ्यावर कृपादृष्टी वळवल्याचा समय तू ओळखला नाहीस.”
येशू मंदिराचे शुद्धीकरण करतो
45नंतर येशू मंदिरात गेला व तेथे जे विक्री करत होते, त्यांना तो बाहेर घालवू लागला. 46तो त्यांना म्हणाला, “‘माझ्या घराला प्रार्थनागृह म्हटले जाईल’, असा धर्मशास्त्रलेख आहे, परंतु त्याचा तुम्ही लुटारूंचा अड्डा केला आहे.”
47तो मंदिरात दररोज प्रबोधन करीत असे. मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे पुढारी त्याचा घात करायला पाहत होते. 48परंतु काय करावे, हे त्यांना सुचेना कारण सर्व लोक त्याची शिकवण मन लावून ऐकत असत.

Tô màu

Chia sẻ

Sao chép

None

Bạn muốn lưu những tô màu trên tất cả các thiết bị của mình? Đăng ký hoặc đăng nhập