लूक 4
4
अरण्यात येशूची परीक्षा
1पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा येशू यार्देन नदीवरून परतला आणि आत्म्याने त्याला चाळीस दिवस रानात नेले. 2तेथे सैतानाने चाळीस दिवस त्याची परीक्षा घेतली. त्या दिवसांत त्याने काही खाल्ले नाही म्हणून ते दिवस संपल्यावर त्याला भूक लागली.
3सैतान त्याला म्हणाला, “तू देवाचा पुत्र असलास, तर ह्या धोंड्याला ‘भाकर हो’ अशी आज्ञा कर.”
4येशूने उत्तर दिले, “‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही’, असे लिहिले आहे.”
5त्यानंतर सैतानाने त्याला उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली 6आणि त्याला म्हटले, “ह्यांचे वैभव व हा सर्व अधिकार मी तुला देईन कारण हे माझ्या स्वाधीन करण्यात आले आहे आणि माझ्या मनास येईल त्याला मी ते देतो. 7म्हणून तू मला नमन करशील, तर हे सर्व तुझे होईल.”
8येशूने त्याला उत्तर दिले, “‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याला नमन कर व त्याचीच आराधना कर’, असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.”
9नंतर त्याने त्याला यरुशलेममध्ये नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले, “तू देवाचा पुत्र असलास तर येथून खाली उडी टाक कारण धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की, 10तुझे रक्षण करण्यासाठी तो आपल्या दूतांना आज्ञा देईल 11आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.”
12येशूने त्याला उत्तर दिले, “‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याची परीक्षा पाहू नकोस’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.”
13येशूची सर्व प्रकारे परीक्षा पाहण्याचे संपवून सैतान योग्य वेळ येईपर्यंत त्याला सोडून गेला.
नासरेथ गावी
14येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीलमध्ये परत आला व त्याच्याविषयीचे वृत्त चहूकडील प्रदेशांत पसरले. 15तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देऊ लागला आणि सर्व जण त्याची प्रशंसा करू लागले.
16ज्या नासरेथमध्ये तो लहानाचा मोठा झाला होता, तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे साबाथ दिवशी सभास्थानात जाऊन वाचायला उभा राहिला. 17तेव्हा यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जो उतारा काढला त्यात असे लिहिले होते:
18-19प्रभूचा आत्मा माझ्यामध्ये आला आहे, कारण गरिबांना शुभवर्तमान सांगण्यासाठी
त्याने मला अभिषिक्त केले आहे.
धरून नेलेल्यांची सुटका
व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ
ह्यांची मी घोषणा करावी,
तसेच जे ठेचले जात आहेत
त्यांची सुटका करावी
व प्रभूच्या अनुग्रहाचे वर्ष आले आहे
हे जगजाहीर करावे
म्हणून मला पाठविण्यात आले आहे.
20मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकास परत देऊन तो खाली बसला. सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. 21तो त्यांना म्हणू लागला, “हा धर्मशास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.”
22सर्व त्याची वाहवा करू लागले. जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्यांविषयी ते आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, “हा योसेफचा मुलगा ना?”
23त्याने त्यांना म्हटले, “खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की, हे वैद्या, तू स्वतःला बरे कर. ‘कफर्णहूम या ठिकाणी ज्या गोष्टी तू केल्या असे आम्ही ऐकले, त्या येथेही आपल्या गावी कर.’” 24पुढे तो म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, कोणताही संदेष्टा स्वतःच्या देशात स्वीकारला जात नाही.
25परंतु सत्य हे आहे की, एलियाच्या काळी साडेतीन वर्षे पाऊस न पडता सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता, त्या काळी इस्राएलमध्ये पुष्कळ विधवा होत्या, 26तरी त्यांतील एकीच्याकडेही एलियाला पाठवले नव्हते, तर सिदोन प्रदेशातील सारफथ येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. 27तसेच अलिशा संदेष्ट्याच्या काळी इस्राएलमध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही बरा झाला नाही, तर सूरियाचा नामान मात्र बरा झाला.”
28हे ऐकत असताना सभास्थानातील सर्व लोक संतापले. 29त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्यांचे गाव वसले होते, त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले. 30पण तो त्यांच्यामधून निघून गेला.
भूतग्रस्ताला बरे करणे
31तो गालीलमधील कफर्णहूम गावी गेला. तेथे त्याने साबाथ दिवशी प्रबोधन केले. 32त्याच्या ज्ञानावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. 33अशुद्ध आत्म्याने पछाडलेला एक माणूस सभास्थानात होता, तो मोठ्याने ओरडून म्हणाला, 34“आम्ही आमचे पाहून घेऊ! अरे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करायला आला आहेस काय? तू कोण आहेस, हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तू आहेस!”
35येशूने त्याला दटावले, “गप्प राहा व ह्याच्यातून निघून जा.” तेव्हा भूत त्या मनुष्याला त्यांच्यासमोर खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघून गेले.
36सर्व जण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “काय हे बोलणे? हा अधिकाराने व सामर्थ्याने दुष्ट आत्म्यांना हुकूम सोडतो आणि ते निघून जातात!” 37ह्या घटनेनंतर त्याची ख्याती त्या प्रदेशात सर्व ठिकाणी पसरत गेली.
अनेक रुग्णांना आरोग्यदान
38तो सभास्थानातून उठून शिमोनच्या घरी गेला. शिमोनची सासू तापाने फणफणत होती. तिला बरे करावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. 39तिच्या खाटेजवळ उभे राहून त्याने तापाला आदेश दिला व तिचा ताप निघाला. ती लगेच उठून त्यांची सेवा करू लागली.
40ज्या सर्वांचे नातलग नाना प्रकारच्या रोगांनी पीडलेले होते त्यांनी त्यांना सूर्यास्ताच्या वेळी येशूकडे आणले. त्याने त्यांच्यांतील प्रत्येकावर हात ठेवून त्यांना बरे केले. 41“तू देवाचा पुत्र आहेस”, असे ओरडत भुतेदेखील पुष्कळ माणसांतून निघाली, परंतु त्याने त्यांना दटावून बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे, हे त्यांना ठाऊक होते.
42दिवस उगवल्यानंतर तेथून निघून तो एकांत ठिकाणी गेला. लोकसमुदाय त्याचा शोध घेत त्याच्याजवळ आले आणि आपणामधून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला आग्रह करू लागले. 43परंतु तो त्यांना म्हणाला, “मला इतर नगरांतही देवाच्या राज्याचे शुभवर्तमान जाहीर केले पाहिजे कारण त्यासाठीच मला पाठविण्यात आले आहे.”
44म्हणून तो यहुदियाच्या सभास्थानांमध्ये प्रबोधन करीत फिरला.
Đang chọn:
लूक 4: MACLBSI
Tô màu
Chia sẻ
Sao chép

Bạn muốn lưu những tô màu trên tất cả các thiết bị của mình? Đăng ký hoặc đăng nhập
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.