YouVersion 標識
搜索圖示

उत्पत्ती 3

3
मानवाचे पतन
1आता याहवेह परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व वन्यप्राण्यांमध्ये सर्प सर्वात धूर्त होता. त्याने स्त्रीला म्हटले, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तुम्ही खाऊ नये असे परमेश्वराने खरोखरच म्हटले आहे काय?”
2स्त्री सर्पाला म्हणाली, “आम्हाला बागेतील झाडांची फळे खाण्याची मुभा आहे. 3पण परमेश्वर म्हणाले, ‘बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ खाऊ नका आणि त्याला स्पर्शही करू नका, असे केल्यास तू मरशील.’ ”
4पण सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही निश्चितच मरणार नाही, 5कारण परमेश्वराला हे माहीत आहे की ज्या दिवशी ते फळ तुम्ही खाल, त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि चांगले व वाईट यातील फरक तुम्हाला समजेल आणि तुम्ही परमेश्वरासारखे व्हाल.”
6जेव्हा स्त्रीने पाहिले की खाण्यास योग्य, दिसण्यास सुंदर आणि सुज्ञ करणारे ते झाड आहे, तेव्हा तिने त्याच्या फळातील काही तोडून घेतले आणि खाल्ले आणि आपला पती, जो तिच्यासोबत होता, त्यालाही दिले आणि त्याने ते खाल्ले. 7पण मग त्यांचे डोळे उघडले आणि आपण नग्न असल्याचे त्यांना समजले; नंतर त्यांनी स्वतःसाठी अंजिराच्या पानांची कटिवेष्टने केली.
8सायंकाळी याहवेह परमेश्वर बागेतून फिरत असल्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि आदाम व त्याची पत्नी, याहवेह परमेश्वरापासून बागेतील झाडामागे लपली. 9परंतु याहवेह परमेश्वराने आदामाला हाक मारून म्हटले, “तू कुठे आहेस?”
10आदाम म्हणाला, “बागेत मी तुमचा आवाज ऐकला आणि मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो; त्यामुळे लपून बसलो.”
11याहवेह म्हणाले, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”
12त्यावर आदाम म्हणाला, “जी स्त्री तुम्ही माझ्या सोबतीला दिली; तिने मला त्या झाडाची फळे दिली आणि मी ती खाल्ली.”
13तेव्हा याहवेह परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाले, “तू हे काय केलेस?”
त्यावर ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ पाडली आणि मी ते फळ खाल्ले.”
14याहवेह परमेश्वर सर्पाला म्हणाले, “कारण तू हे केलेस म्हणून,
“तू सर्व पाळीव प्राण्यांहून,
आणि सर्व वन्यपशूहून अधिक शापित आहेस!
तू तुझ्या पोटावर सरपटशील
आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस
माती खाशील.
15तू आणि स्त्री,
तुझी संतती#3:15 किंवा बीज आणि तिची संतती यामध्ये
मी शत्रुत्व निर्माण करेन;
तिचे संतान तुझे मस्तक चिरडेल#3:15 किंवा फोडेल
आणि तू त्याची टाच फोडशील.”
16नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाले,
“तुझ्या प्रसूतिकाळात मी तुझे क्लेश अत्यंत वाढवेन;
वेदनांनी तू तुझ्या संतानास जन्म देशील,
तुझ्या पतीकडे तुझी ओढ राहील,
आणि तो तुजवर सत्ता गाजवील.”
17नंतर ते आदामाला म्हणाले, “तू तुझ्या पत्नीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, ते खाल्लेस म्हणून आता,
“तुझ्यामुळे भूमी शापित झाली आहे;
तू तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस
अत्यंत क्लेशमय कष्ट करून तिचा उपज खाशील.
18भूमी तुझ्यासाठी काटे आणि कुसळे उगवील,
आणि तू शेतातील पीक खाशील.
19ज्यामधून तू घडविला गेलास
त्या मातीत परत जाऊन मिळेपर्यंत
तू घाम गाळून अन्न खाशील,
कारण तू माती आहेस
आणि तू मातीतच परत जाऊन मिळशील.”
20आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा#3:20 संभावित अर्थ सजीव असे ठेवले, कारण ती सर्व सजिवांची माता होती.
21याहवेह परमेश्वराने आदामासाठी आणि त्याच्या पत्नीसाठी चर्मवस्त्रे केली आणि त्यांना ती घातली. 22नंतर याहवेह परमेश्वर म्हणाले, “पाहा, मानव आपल्यापैकी एक आणि आपल्यासारखा झाला आहे; तो बरे आणि वाईट यातील फरक समजू लागला आहे. परंतु आता जीवनवृक्षाचे फळ त्याच्या हाती लागून त्याने ते तोडून खाऊ नये, कारण मग तो सदासर्वकाळ जिवंत राहील.” 23म्हणून याहवेह परमेश्वराने मनुष्याला ज्या भूमीतून निर्माण केले होते तिची मशागत करण्यासाठी त्या एदेन बागेतून घालवून दिले. 24अशा रीतीने त्यांनी मनुष्याला एदेन बागेच्या बाहेर घालवून दिले आणि जीवनवृक्षाकडे कोणीही जाऊ नये यासाठी एदेन बागेच्या पूर्वेस#3:24 किंवा च्या समोर करूबीम आणि प्रत्येक दिशेकडे फिरणारी एक ज्वालामय तलवार ठेवली.

醒目顯示

分享

複製

None

想要在所有設備上保存你的醒目顯示嗎? 註冊或登入