लूक 14

14
जलोदर झालेल्या मनुष्याला शब्बाथ दिवशी बरे करणे
1तो एका शब्बाथ दिवशी परूश्यांतील कोणाएका अधिकार्‍याच्या घरी भोजनास गेला, तेव्हा असे झाले की, ते त्याच्या पाळतीवर बसले होते.
2आणि पाहा, जलोदर झालेला कोणीएक माणूस त्याच्यासमोर होता.
3येशूने शास्त्र्यांना व परूश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही?”
4तेव्हा ते गप्प राहिले. मग त्याने त्याला जवळ घेऊन बरे केले व जाऊ दिले.
5मग त्याने त्यांना म्हटले, “तुमच्यापैकी कोणाचा मुलगा किंवा बैल विहिरीत पडला तर तो त्याला शब्बाथ दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय?”
6तेव्हा त्यांना त्या प्रश्‍नाचे उत्तर देता येईना.
नम्रता व आदरातिथ्य
7तेव्हा आमंत्रित लोक मुख्य मुख्य आसने कशी निवडून घेत आहेत हे पाहून तो त्यांना दाखला देऊन म्हणाला,
8“कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नकोस; कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल;
9मग ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ‘ह्यांना जागा दे’; तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील.
10पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बस; म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ‘मित्रा, वर येऊन बस’; म्हणजे तुझ्याबरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल.
11कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल; व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”
12मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलावू नका; कारण तेही कदाचित तुम्हांला उलट आमंत्रण करतील व तुमची फेड होईल.
13तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, अपंग, लंगडे व आंधळे ह्यांना आमंत्रण करा;
14म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड करण्यास त्यांच्याजवळ काही नाही; तरी नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल.”
मोठ्या जेवणावळीचा दृष्टान्त
15मग त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी कोणीएकाने ह्या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, “जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य!”
16त्याने त्याला म्हटले, “कोणाएका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली, तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले.
17आणि जेवणाच्या वेळेस, ‘आता या, तयारी झाली आहे,’ असे आमंत्रितांना सांगायला त्याने आपल्या एका दासाला पाठवले.
18तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे; मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’
19दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासायला जातो; मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’
20आणखी एक जण म्हणाला, ‘मी लग्न केले आहे, म्हणून माझे येणे होत नाही.’
21मग त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा घरधन्याला राग आला व तो आपल्या दासाला म्हणाला, ‘नगराच्या रस्त्यांत व गल्ल्यांत लवकर जा, आणि दरिद्री, अपंग, आंधळे व लंगडे ह्यांना इकडे घेऊन ये.’
22दास म्हणाला, ‘महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्यापि जागा आहे.’
23धनी दासाला म्हणाला, ‘माझे घर भरून जावे म्हणून सडकांवर व कुंपणांकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये.
24कारण मी तुम्हांला सांगतो की, त्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही.”’
खरे शिष्य कोण?
25त्याच्याबरोबर मोठमोठे लोकसमुदाय चालले होते; तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला,
26“जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांचा आणि आपल्या जिवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही.
27जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही.
28तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरूज बांधण्याची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही?
29नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील,
30‘हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही.’
31अथवा असा कोण राजा आहे की तो दुसर्‍या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की, ‘जो वीस हजार घेऊन माझ्यावर येतो, त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जाता येईल काय?’
32जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलांना पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील.
33म्हणून त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही.
34मीठ हा चांगला पदार्थ आहे; पण मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला रुची कशाने आणता येईल?
35ते जमिनीला किंवा उकिरड्यालाही उपयोगी नाही; ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”

Okuqokiwe okwamanje:

लूक 14: MARVBSI

Qhakambisa

Dlulisela

Kopisha

None

Ufuna ukuthi okuvelele kwakho kugcinwe kuwo wonke amadivayisi akho? Bhalisa noma ngena ngemvume