የYouVersion አርማ
የፍለጋ አዶ

लूक 12

12
ढोंगाविरुद्ध येशू आपल्या शिष्यांना इशारा देतो
1इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकांना तुडवू लागले; तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, “तुम्ही आपणांस परूश्यांच्या खमिराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा.
2जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही.
3जे काही तुम्ही अंधारात बोललात ते उजेडात ऐकण्यात येईल आणि जे तुम्ही आतल्या कोठड्यांत कानात सांगितले ते धाब्यांवर गाजवले जाईल.
तो आपल्या शिष्यांना धैर्य देतो
4माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराचा वध करतात, पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका.
5तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा; हो, मी तुम्हांला सांगतो, त्याचीच भीती बाळगा.
6पाच चिमण्या दोन दमड्यांना विकतात की नाही? तरी त्यांच्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही.
7फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिऊ नका; तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात.
8मी तुम्हांला सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर पत्करतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्करील;
9परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल.
10आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल; परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला त्याची क्षमा होणार नाही.
11जेव्हा तुम्हांला सभा, सरकार व अधिकारी ह्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे ह्यांविषयी काळजी करू नका;
12कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील.”
द्रव्यलोभ व श्रीमंत मूर्ख मनुष्याचा दृष्टान्त
13लोकसमुदायातील कोणीएकाने त्याला म्हटले, “गुरूजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा.”
14तो त्याला म्हणाला, “गृहस्था, मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले?”
15आणखी त्याने त्यांना म्हटले, “सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.”
16त्याने त्यांना एक दाखला सांगितला, “कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले.
17तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, ‘मी काय करू? कारण माझे उत्पन्न साठवण्यास मला जागा नाही.’
18मग त्याने म्हटले, ‘मी असे करीन; मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन; आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन.
19मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.’
20परंतु देवाने त्याला म्हटले, ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहेस, ते कोणाचे होईल?’
21जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.”
चिंतेबाबत इशारा
22तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, “म्हणून मी तुम्हांला सांगतो, आपण काय खावे अशी आपल्या जिवाची, अथवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराची चिंता करत बसू नका.
23कारण अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे.
24कावळ्यांचा विचार करा; ते पेरत नाहीत व कापणीही करत नाहीत; त्यांना कणगी नाही व कोठारही नाही; तरी देव त्यांचे पोषण करतो; पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात!
25तसेच चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे?
26म्हणून अति लहान गोष्टदेखील जर तुमच्याने होत नाही तर इतर गोष्टींविषयी का चिंता करत बसता?
27फुले कशी वाढतात ह्याचा विचार करा; ती कष्ट करत नाहीत व कातत नाहीत; तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता.
28जे गवत रानात आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो अल्पविश्वासी जनहो, तो तुम्हांला किती विशेषेकरून पोशाख घालील!
29तसेच काय खावे किंवा काय प्यावे ह्याच्यामागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ राहू नका.
30कारण जगातील राष्ट्रे ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात; परंतु तुम्हांला त्यांची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे;
31तर तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर ह्याही गोष्टी तुम्हांला मिळतील.
32हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.
33जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा; तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणार्‍या थैल्या आपणांसाठी करून ठेवा; तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही.
34कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.
जागृतीची आवश्यकता व इमानी कारभार्‍याचा दृष्टान्त
35तुमच्या कंबरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या;
36आणि धनी लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे म्हणून, तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसांसारखे तुम्ही व्हा.
37आणि धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य; मी तुम्हांला खचीत सांगतो की, तो आपली कंबर बांधून त्यांना जेवायला बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील.
38तो रात्रीच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या प्रहरी येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत.
39आणखी हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागा राहिला असता व त्याने आपले घर फोडू दिले नसते.
40तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”
41तेव्हा पेत्राने म्हटले, “प्रभूजी, हा दाखला आपण आम्हांलाच सांगता की सर्वांना?”
42तेव्हा प्रभू म्हणाला, “आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामग्री द्यायला धनी ज्याला नेमील असा विश्वासू व विचारशील कारभारी कोण?
43त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य.
44मी तुम्हांला खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील.
45परंतु ‘आपला धनी येण्यास उशीर लागेल’ असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरांस व चाकरिणींस मारहाण करू लागेल, आणि खाऊनपिऊन मस्त होईल,
46तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील, आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमील.
47आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील,
48परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल, आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील.
काळाची लक्षणे
49मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे; ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते!
50मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे व तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे.
51मी पृथ्वीवर शांतता करण्यास आलो आहे असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नाही, तर फूट पाडण्यास;
52आतापासून एका घरातील पाच जणांत दोघांविरुद्ध तिघे व तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल.
53मुलाविरुद्ध बाप व ‘बापाविरुद्ध मुलगा,’ मुलीविरुद्ध आई व आईविरुद्ध मुलगी, ‘सुनेविरुद्ध सासू व सासूविरुद्ध सून’ अशी फूट पडेल.”
54आणखी तो लोकसमुदायांनाही म्हणाला, “जेव्हा तुम्ही ढग पश्‍चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेचच म्हणता, ‘पावसाची सर येत आहे,’ आणि तसे घडते.
55दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा ‘कडाक्याची उष्णता होईल,’ असे तुम्ही म्हणता आणि तसे घडते.
56अहो ढोंग्यांनो, तुम्हांला पृथ्वीवरील व आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही?
57आणखी जे यथार्थ आहे ते तुम्ही स्वतःच का ठरवत नाही?
58तू आपल्या वाद्याबरोबर अधिकार्‍याकडे जाताना वाटेतच त्याच्याशी तडजोड करण्याचा यत्न कर; नाहीतर कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल; आणि न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल व शिपाई तुला तुरुंगात घालील.
59मी तुला सांगतो, अगदी शेवटली टोली फेडीपर्यंत तू तेथून सुटणारच नाहीस.”

Currently Selected:

लूक 12: MARVBSI

ማድመቅ

Share

Copy

None

ያደመቋቸው ምንባቦች በሁሉም መሣሪያዎችዎ ላይ እንዲቀመጡ ይፈልጋሉ? ይመዝገቡ ወይም ይግቡ