लूक 17
17
येशूची काही वचने
1मग त्याने शिष्यांना म्हटले, “अडखळणे येऊ नयेत हे अशक्य आहे; परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार!
2त्याने ह्या लहानांतील एकाला अडखळण करावे ह्यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकावे ह्यात त्याचे हित आहे.
3तुम्ही स्वत: सांभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर.
4त्याने दिवसातून सात वेळा तुझा अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, ‘मला पश्चात्ताप झाला आहे,’ असे म्हटले तरी त्याला क्षमा कर.”
5मग प्रेषित प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढवा.”
6प्रभू म्हणाला, “तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल, तर ह्या तुतीला, ‘तू मुळांसकट उपटून समुद्रात लावली जा,’ असे तुम्ही सांगताच ती तुमचे ऐकेल.
7तुमच्यापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल, ‘आताच येऊन जेवायला बस.’
8उलट ‘माझे जेवण तयार कर, माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर, आणि मग तू खा व पी,’ असे तो त्याला म्हणणार नाही काय?
9सांगितलेली कामे दासाने केली म्हणून तो त्याचे उपकार मानतो काय?
10त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा.”
दहा कुष्ठरोगी
11मग असे झाले की, तो यरुशलेमेकडे चालला असता शोमरोन व गालील ह्यांमधून गेला.
12आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले दहा पुरुष त्याला भेटण्यास आले.
13ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, “अहो येशू, गुरूजी, आमच्यावर दया करा.”
14त्याने त्यांना पाहून म्हटले, “तुम्ही जाऊन स्वतःस ‘याजकांना दाखवा.”’ मग असे झाले की, ते जाता जाता शुद्ध झाले.
15त्यांच्यातील एक जण आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णत परत आला;
16आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा पडला; हा तर शोमरोनी होता.
17तेव्हा येशूने म्हटले, “दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग नऊ जण कोठे आहेत?
18ह्या परक्यावाचून देवाचा गौरव करण्यास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय?”
19तेव्हा त्याने म्हटले, “ऊठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
देवाच्या राज्याचे आगमन
20देवाचे राज्य केव्हा येईल असे परूश्यांनी विचारले असता त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही;
21‘पाहा, ते येथे आहे! किंवा तेथे आहे!’ असे म्हणणार नाहीत, कारण पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.”
22त्यावर त्याने शिष्यांना म्हटले, “असे दिवस येणार आहेत की, मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांपैकी एक दिवस पाहण्याची तुम्ही इच्छा कराल पण तो तुम्हांला दिसणार नाही.
23ते तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो तेथे आहे! पाहा, येथे आहे!’ तर तुम्ही जाऊ नका व त्यांच्यामागे लागू नका;
24कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूस चमकून दुसर्या बाजूपर्यंत प्रकाशते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवशी होईल.
25तथापि त्याने प्रथम फार दुःख भोगावे व ह्या पिढीकडून नाकारले जावे ह्याचे अगत्य आहे.
26नोहाच्या दिवसांत झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतही होईल.
27‘नोहा तारवात गेला’ आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करत होते व लग्न करून देत होते.
28तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसांत झाले, त्याप्रमाणे होईल; म्हणजे ते लोक खातपीत होते, विकत घेत होते, विकत होते, लागवड करत होते, घरे बांधत होते;
29परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी ‘आकाशातून अग्नी व गंधक ह्यांची वृष्टी होऊन’ सर्वांचा नाश झाला.
30मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशी असेच होईल.
31त्या दिवशी जो धाब्यावर असेल त्याने आपले घरात असलेले सामान नेण्याकरता खाली येऊ नये आणि तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी ‘मागे फिरू नये.’
32लोटाच्या बायकोची आठवण करा.
33जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील तो आपल्या जिवाला मुकेल, आणि जो कोणी आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील.
34मी तुम्हांला सांगतो, त्या रात्री एका बाजेवर दोघे असतील, एक घेतला जाईल व दुसरा तेथेच ठेवला जाईल.
35दोघी मिळून दळत असतील, एक घेतली जाईल व दुसरी तेथेच ठेवली जाईल.”1
36,37त्यांनी त्याला म्हटले, “प्रभूजी, कोठे?” त्याने त्यांना म्हटले, “जेथे प्रेत आहे तेथे गिधाडे जमतील.”
Currently Selected:
लूक 17: MARVBSI
ማድመቅ
Share
Copy
ያደመቋቸው ምንባቦች በሁሉም መሣሪያዎችዎ ላይ እንዲቀመጡ ይፈልጋሉ? ይመዝገቡ ወይም ይግቡ
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.