የYouVersion አርማ
የፍለጋ አዶ

मत्तय 14

14
बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचा शिरच्छेद
1त्या वेळी हेरोद राजाने येशूची कीर्ती ऐकली 2आणि आपल्या सेवकांना म्हटले, “हा बाप्तिस्मा देणारा योहान आहे. तो मेलेल्यांतून उठला आहे आणि म्हणून ही सामर्थ्यशाली कृत्ये करत आहे.”
3हेरोदने त्याचा भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानला बांधून कैदेत टाकले होते; 4कारण योहानने त्याला म्हटले होते, “तू तिला ठेवावेस हे योग्य नाही.” 5तेव्हापासून तो त्याला ठार मारायला पाहात होता, पण तो यहुदी लोकांना भीत होता कारण ते योहानला संदेष्टा मानत असत.
6पुढे हेरोदचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नृत्य करून हेरोदला खूष केले. 7त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले, “तू जे काही मागशील, ते मी तुला देईन.”
8तिच्या आईने तिला पढवल्याप्रमाणे ती म्हणाली, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिर तबकात घालून मला आत्ता येथे आणून द्या.”
9राजाला वाईट वाटले, परंतु सर्व पाहुण्यांच्या देखत वाहिलेल्या शपथेमुळे त्याने ते द्यायचा आदेश दिला 10आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानचा शिरच्छेद करविला. 11त्याचे शिर तबकात घालून मुलीला देण्यात आले आणि तिने ते आपल्या आईला दिले. 12नंतर योहानचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह उचलून नेला व पुरला आणि येशूला ही बातमी जाऊन कळवली.
पाच हजारांना भोजन
13योहानविषयीचे वृत्त ऐकून येशू तेथून तारवात बसून अरण्यात एकांती जाण्यासाठी निघाला. हे समजताच आपापल्या नगरांतून लोक त्याच्या मागे पायी गेले. 14तो बाहेर आला तेव्हा त्याने विशाल लोकसमुदाय पाहिला. त्याला त्याचा कळवळा आला व त्यांच्यांतील आजारी लोकांना त्याने बरे केले.
15दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही एकाकी जागा आहे व वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतःकरता खायला विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.”
16येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जायची गरज नाही, तुम्ही त्यांना खायला द्या.”
17ते त्याला म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी व दोन मासे आहेत.”
18तो म्हणाला, “ते इकडे माझ्याजवळ आणा.” 19त्याने लोकसमुदायाला गवतावर बसायला सांगितले. नंतर त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन त्याने स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या. शिष्यांनी त्या लोकसमुदायाला वाटल्या. 20जमलेले सर्व लोक जेवून तृप्त झाले. शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या. 21जेवणाऱ्यांमध्ये सुमारे पाच हजार पुरुष होते. शिवाय स्त्रिया व मुले होती, ती निराळीच.
येशू पाण्यावरून चालतो
22“मी लोकसमुदायाला निरोप देत आहे तोवर तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे सरोवराच्या पलीकडे जा”, असे म्हणून त्याने शिष्यांना पाठवून दिले. 23लोकसमुदायाला निरोप दिल्यावर तो प्रार्थना करायला डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. 24काठापासून बरेच दूर आलेले तारू लाटांमुळे हेलकावे खाऊ लागले, कारण वारा विरुद्ध दिशेचा होता.
25पहाटेस तीन ते सहाच्या दरम्यान तो पाण्यावर चालत त्यांच्याकडे आला. 26शिष्य त्याला पाण्यावर चालताना पाहून घाबरून ओरडू लागले, “भूत आहे.”
27परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे. भिऊ नका.”
28पेत्र पुढे होऊन म्हणाला, “प्रभो, खरोखरच आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे यायची मला आज्ञा करा.”
29त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. 30परंतु जोरदार वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला तसा तो ओरडून म्हणाला, “प्रभो, मला वाचवा.”
31येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”
32ते दोघे तारवात चढल्यावर वारा पडला. 33जे तारवात होते, ते येशूला नमन करून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहात.”
34ते सरोवराच्या पलीकडे जाऊन गनेसरेतच्या भागात किनाऱ्यावर उतरले. 35तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आसपासच्या परिसरात माणसे पाठवून सर्व आजारी लोकांना त्याच्याकडे आणले. 36“केवळ तुमच्या वस्त्राच्या किनारीला आम्हांला स्पर्श करू द्या”, अशी त्यांनी येशूला विनंती केली आणि जेवढ्या लोकांनी त्याला स्पर्श केला, तेवढे लोक बरे झाले.

Currently Selected:

मत्तय 14: MACLBSI

ማድመቅ

Share

Copy

None

ያደመቋቸው ምንባቦች በሁሉም መሣሪያዎችዎ ላይ እንዲቀመጡ ይፈልጋሉ? ይመዝገቡ ወይም ይግቡ