प्रेषितांची कृत्ये 10
10
पेत्र व कर्नेल्य
1कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा कोणीएक पुरुष इटलिक म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता.
2तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांना फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता.
3त्याने दिवसाच्या सुमारे तिसर्या प्रहरी दृष्टान्तात असे स्पष्टपणे पाहिले की, आपणाकडे देवाचा दूत येत असून “कर्नेल्या,” अशी आपणास हाक मारत आहे.
4तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, “काय महाराज?” त्याने त्याला म्हटले, “तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत.
5तर आता यापोस माणसे पाठव आणि शिमोन नावाच्या माणसाला बोलावून आण; त्याला पेत्रही म्हणतात.
6तो शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणार्या चांभाराच्या येथे उतरला आहे; त्याचे घर समुद्राच्या किनार्यास आहे. [तुला काय करावे लागेल हे तो तुला सांगेल.]”
7जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता तो निघून गेल्यानंतर त्याने आपल्या घरच्या दोघा चाकरांना व आपल्या हुजरातीतल्या एका भक्तिमान शिपायाला बोलावले;
8आणि त्यांच्याजवळ सर्व सविस्तर सांगून त्यांना यापोस पाठवले.
9ते दुसर्या दिवशी वाटेवर असता गावाजवळ येताना दोन प्रहराच्या सुमारास पेत्र प्रार्थना करण्यास धाब्यावर गेला.
10तेव्हा त्याला भूक लागून काही खावेसे वाटले; आणि जेवणाची तयारी होत आहे इतक्यात त्याचे देहभान सुटले.
11तेव्हा आकाश उघडलेले व मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टान्त त्याला झाला.
12त्यात पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद, सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे होती.
13मग त्याने अशी वाणी ऐकली की, ‘पेत्रा, ऊठ; मारून खा.’
14पेत्र म्हणाला, “नको, नको, प्रभू; कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही.”
15मग दुसर्यांदा अशी वाणी झाली की, “देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस.”
16असे तीन वेळा झाले आणि लगेच ते पात्र आकाशात वर घेतले गेले.
17आपण पाहिलेल्या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा ह्याविषयी पेत्र विचारात पडला असता, पाहा, कर्नेल्याने पाठवलेली माणसे शिमोनाचे घर शोधल्यावर दरवाजाजवळ येऊन उभी राहिली;
18आणि त्यांनी हाक मारून विचारले, “शिमोन पेत्र येथे पाहुणा उतरला आहे काय?”
19पेत्र त्या दृष्टान्ताविषयी विचार करत असता आत्मा त्याला म्हणाला, “पाहा, तीन माणसे तुझा शोध करत आहेत.
20तर ऊठ, खाली ये आणि काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा; कारण मीच त्यांना पाठवले आहे.”
21पेत्र त्या माणसांकडे खाली येऊन म्हणाला, “पाहा, ज्याचा शोध तुम्ही करत आहात तो मी आहे; तुम्ही कोणत्या कारणामुळे येथे आलात?”
22ते म्हणाले, “कर्नेल्य शताधिपती हा नीतिमान मनुष्य असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहूदी लोक त्याच्याविषयी चांगली साक्ष देतात. त्याला पवित्र देवदूताने सुचवले आहे की, आपणाला घरी बोलावून आपणाकडून संदेश ऐकावा.”
23मग त्याने त्यांना आत बोलावून त्यांचा पाहुणचार केला. दुसर्या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला आणि यापोतील बंधुजनांपैकी कित्येक त्याच्याबरोबर गेले.
24तिसर्या दिवशी तो कैसरीयास पोहचला तेव्हा कर्नेल्य आपल्या नातलगांना व इष्टमित्रांना जमवून त्यांची वाट पाहत होता.
25पेत्र आत जात असता कर्नेल्य त्याला सामोरा गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले.
26पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, “उभे राहा; मीही मनुष्यच आहे.”
27मग तो त्याच्याबरोबर बोलत बोलत आत गेला, तेव्हा त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळून आले.
28त्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला ठाऊकच आहे की, यहूदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणेयेणे ठेवणे हे त्याच्या रीतीरिवाजाविरुद्ध आहे; तथापि कोणाही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखवले आहे.
29म्हणून मला बोलावल्याबरोबर मी काकू न करता आलो आहे. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलावले?”
30तेव्हा कर्नेल्य म्हणाला, “आज चार दिवस झाले, मी आपल्या घरी तिसर्या प्रहरी प्रार्थना [व उपास] करत होतो; तेव्हा पाहा, तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष माझ्यापुढे उभा राहून म्हणाला,
31‘कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि देवासमोर तुझ्या दानधर्माचे स्मरण करण्यात आले आहे.
32तर यापोस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन ह्याला बोलावून आण; तो समुद्राच्या काठी कातडे कमावणार्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे.’ [तो आल्यावर तुझ्याशी बोलेल].
33म्हणून मी आपणाकडे माणसांना तत्काळ पाठवले. आपण आलात हे बरे केले. तर आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञापिले आहे ते ऐकावे म्हणून आम्ही सर्व जण येथे देवासमोर हजर आहोत.”
पेत्राचे भाषण
34तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला :
35“‘देव पक्षपाती नाही’, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.
36येशू ख्रिस्त (तोच सर्वांचा प्रभू आहे) ह्याच्या द्वारे देवाने ‘शांतीच्या सुवार्तेची घोषणा करताना आपले जे वचन इस्राएलाच्या’ संततीस पाठवले ते हे.
37योहानाने बाप्तिस्म्याची घोषणा केल्यानंतर गालीलापासून प्रारंभ होऊन सर्व यहूदीयामध्ये घडलेली गोष्ट तुम्हांला तर माहीतच आहे.
38नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला; कारण देव त्याच्याबरोबर होता.
39आणि त्याने यहूद्यांच्या देशात व यरुशलेमेत जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत. त्यांनी त्याला खांबावर टांगून मारले;
40पण त्याला देवाने तिसर्या दिवशी उठवले व त्याने प्रकट व्हावे असे केले.
41तरी हे प्रकटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण जे साक्षी देवाने पूर्वी निवडले त्या आम्हांला केले; त्या आम्ही तो मेलेल्यांतून उठल्यानंतर त्याच्याबरोबर खाणेपिणे केले.
42त्याने आम्हांला अशी आज्ञा केली की, ‘लोकांना उपदेश करा व अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जिवंताचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे.’
43त्याच्यावर विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात.”
परराष्ट्रीयांवर पवित्र आत्मा उतरतो व त्यांचा बाप्तिस्मा होतो
44पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणार्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला.
45मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणार्या व सुंता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले.
46कारण त्यांनी त्यांना अनेक भाषांतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले.
47तेव्हा पेत्राने म्हटले, “आम्हांला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्याने पाण्याची मनाई करवेल?”
48मग ‘प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा व्हावा’ अशी त्याने आज्ञा केली. तेव्हा काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली.
Currently Selected:
प्रेषितांची कृत्ये 10: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.