YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांची कृत्ये 11

11
पेत्राचे आत्मसमर्थन
1प्रेषितांनी व यहूदीया प्रांतात असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की, परराष्ट्रीयांनीही देवाचे वचन ग्रहण केले.
2मग पेत्र यरुशलेमेस गेला तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की,
3“सुंता न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही जेवलात.”
4तेव्हा पेत्राने अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली :
5“मी यापो नगरात प्रार्थना करत होतो; तेव्हा देहभान सुटून मी असा एक दृष्टान्त पाहिला की, एक पात्र उतरले, व ते मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले.
6त्याच्याकडे मी न्याहाळून पाहत होतो तेव्हा पृथ्वीवरले चतुष्पाद, श्वापदे, सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे माझ्या दृष्टीस पडली.
7आणि मी अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना ऐकली की, ‘पेत्रा, ऊठ; मारून खा.’
8परंतु मी म्हणालो, “नको, नको, प्रभू; कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही.
9मग दुसर्‍यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली, ‘देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस.’
10असे तीनदा झाले; नंतर ती अवघी पुन्हा आकाशात वर ओढली गेली.
11इतक्यात पाहा, ज्या घरात आम्ही होतो त्याच्यापुढे कैसरीयातून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली.
12तेव्हा आत्म्याने मला सांगितले की, ‘काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.’ मग हे सहा बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही त्या माणसाच्या घरी गेलो.
13त्याने आम्हांला सांगितले की, ‘मी आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला, यापोस कोणाला तरी पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनास बोलावून आण;
14ज्यांच्या योगे तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल.’
15मी बोलू लागलो तेव्हा, जसा आरंभी आपल्यावर तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला.
16तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली, ती अशी की, ‘योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला हे खरे; परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.’
17जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यांनाही देवाने सारखेच दान दिले; तर मग देवाला अडवणारा असा मी कोण?”
18हे ऐकून ते उगे राहिले आणि देवाचा गौरव करत बोलले, “तर मग देवाने परराष्ट्रीयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्‍चात्तापबुद्धी दिली आहे.”
परराष्ट्रीयांमधून झालेली ख्रिस्ती मंडळी
19स्तेफनावरून उद्भवलेल्या छळामुळे ज्यांची पांगापांग झाली होती ते फेनिके, कुप्र व अंत्युखिया येथपर्यंत फिरून यहूद्यांना मात्र देवाचे वचन सांगत असत.
20तरी त्यांच्यापैकी कित्येक कुप्री व कुरेनेकर होते; ते अंत्युखियात येऊन प्रभू येशूची सुवार्ता हेल्लेणी लोकांनाही सांगू लागले.
21तेव्हा प्रभूचा हात त्यांच्याबरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले.
22त्यांच्याविषयीचे वर्तमान यरुशलेमेतल्या मंडळीच्या कानी आले तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठवले.
23तो तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला; आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की, ‘दृढ निश्‍चयाने प्रभूला बिलगून राहा.’
24तो चांगला मनुष्य होता, आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले.
25नंतर तो शौलाचा शोध करण्यास तार्सास गेला.
26त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्युखियास आणले. मग असे झाले की, त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळूनमिसळून बर्‍याच लोकांना शिकवले; आणि शिष्यांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा अंत्युखियात मिळाले.
बर्णबा व शौल यरुशलेमेस जातात
27त्या दिवसांत यरुशलेमेहून अंत्युखियास संदेष्टे आले.
28तेव्हा त्यांच्यातील अगब नावाच्या मनुष्याने उठून आत्म्याच्या योगे सुचवले की, सर्व जगात मोठा दुष्काळ पडणार आहे. हा दुष्काळ क्लौद्याच्या वेळेस पडला.
29तेव्हा प्रत्येक शिष्याने निश्‍चय केला की, यहूदीयात राहणार्‍या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ती काही पाठवावे;
30त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे ते बर्णबा व शौल ह्यांच्या हाती वडीलवर्गाकडे1 पाठवून दिले.

Highlight

Copy

Compare

Share

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for प्रेषितांची कृत्ये 11