प्रेषितांची कृत्ये 13
13
अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळी
1अंत्युखियाच्या मंडळीत बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता तो मनाएन व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते.
2ते प्रभूची सेवा व उपास करत असता पवित्र आत्मा म्हणाला की, “बर्णबा व शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा.”
3तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली.
कुप्र येथे बर्णबा व शौल
4ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकीयात येऊन तारवातून कुप्रास गेले.
5मग ते सलमीनात असता त्यांनी यहूद्यांच्या सभास्थानामध्ये देवाच्या वचनाची घोषणा केली; आणि योहान हाही त्यांचा सहायक होता.
6पुढे ते सबंध बेटातून चालून पफेस गेल्यावर बर्येशू नावाचा कोणीएक यहूदी जादूगार व खोटा संदेष्टा त्यांना आढळला.
7तो तेथील सुभेदार सिर्ग्य पौल ह्या बुद्धिमान मनुष्याच्या पदरी होता. ह्या सुभेदाराने बर्णबा व शौल ह्यांना बोलावून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शवली.
8परंतु अलीम जादूगार (त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे) ह्याने त्यांना अडवून सुभेदाराला विश्वासापासून फितवण्याचा प्रयत्न केला.
9तेव्हा शौल, ज्याला पौलही म्हणत, तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला,
10“अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या नीतिमत्त्वाच्या वैर्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय?
11तर पाहा, आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे, तू आंधळा होशील, व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही.” तत्क्षणीच त्याच्यावर धुके पडल्यासारखे होऊन त्याच्या डोळ्यांना अंधारी आली; तेव्हा आपल्याला कोणीतरी हात धरून न्यावे म्हणून तो इकडे तिकडे माणसांचा शोध करू लागला.
12तेव्हा जे झाले ते पाहून त्या सुभेदाराने प्रभूच्या शिक्षणावरून आश्चर्य करून विश्वास ठेवला.
पिसिदियातील अंत्युखियामध्ये पौलाने यहूद्यांना केलेला उपदेश
13मग पौल व त्याच्या सोबतीचे लोक पफेहून तारवातून पंफुल्यातील पिर्गा येथे गेले, आणि योहान त्यांना सोडून यरुशलेमेस परत गेला.
14नंतर ते पिर्गा येथून निघून फिरत फिरत पिसिदियातील अंत्युखियास पोहचले; आणि शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन बसले.
15तेव्हा नियमशास्त्राचे व संदेष्ट्यांच्या ग्रंथांचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकार्यांनी त्यांना सांगून पाठवले की, “बंधुजनहो, तुमच्याजवळ लोकांकरता काही बोधवचन असेल तर सांगा.”
16तेव्हा पौल उभा राहून हाताने खुणावून म्हणाला : “अहो इस्राएल लोकांनो, व देवाचे भय बाळगणार्यांनो, ऐका.
17ह्या इस्राएल लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडून घेतले, ते लोक मिसर देशात उपरे असताना त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी भुजाने त्यांना तेथून काढले.
18पुढे सुमारे चाळीस वर्षेपर्यंत ते रानात असता त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले.
19नंतर त्याने कनान देशातील सात राष्ट्रांचा विध्वंस करून तेथील भूमी त्यांना सुमारे साडेचारशे वर्षेपर्यंत वतन अशी दिली.
20त्यानंतर त्याने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत त्यांना न्यायाधीश नेमून दिले.
21मग त्यांनी राजा मागितला; तेव्हा देवाने बन्यामिन वंशातील कीशाचा पुत्र शौल हा चाळीस वर्षेपर्यंत त्यांना दिला.
22नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की, ‘इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल.’
23ह्या मनुष्याच्या वंशजांतून देवाने त्याच्या वचनाप्रमाणे इस्राएलासाठी येशू हा तारणारा उदयास आणला.
24तो प्रकट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी सर्व इस्राएल लोकांमध्ये घोषणा केली होती.
25योहान आपले कार्य पूर्ण करत असता म्हणाला, ‘मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते? मी तो नव्हे, तर पाहा, ज्याच्या पायांतील वहाणा सोडण्यास मी योग्य नाही असा कोणी माझ्यामागून येत आहे.’
26अहो बंधुजनहो, अब्राहामाच्या वंशातील पुत्रांनो, व तुमच्यापैकी देवाचे भय बाळगणार्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे.
27कारण यरुशलेमवासीयांनी व त्यांच्या अधिकार्यांनी त्याला न ओळखता आणि दर शब्बाथ दिवशी वाचून दाखवण्यात येणारे संदेष्ट्यांचे शब्दही न समजता, त्याला दोषी ठरवून ते शब्द पूर्ण केले.
28आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलातास विनंती केली.
29मग त्याच्याविषयी लिहिलेले सर्वकाही पूर्ण करून त्यांनी त्याला खांबावरून खाली काढून कबरेमध्ये ठेवले.
30पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले.
31त्याच्याबरोबर जे गालीलाहून यरुशलेमेत आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे; ते आता लोकांना त्याचे साक्षी आहेत.
32आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते त्याची सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो.
33देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन तुमच्याआमच्या मुलाबाळांकरता पूर्ण केले आहे; स्तोत्र दुसरे ह्यातही असे लिहिले आहे की,
‘तू माझा पुत्र आहेस;
आज मी तुला जन्म दिला आहे.’
34शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याने त्याला मेलेल्यांतून उठवले; ह्याविषयी त्याने असे म्हटले आहे की,
‘दाविदाला दिलेले जे पवित्र व विश्वसनीय दान
ते तुम्हांला’ देईन.
35म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो,
‘तू आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा
अनुभव येऊ देणार नाहीस.’
36कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला, आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याला कुजण्याचा अनुभव आला;
37परंतु ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही.
38म्हणून बंधुजनहो, तुम्हांला हे ठाऊक असो की, ह्याच्या द्वारे तुम्हांला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे;
39आणि ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो.
40म्हणून सावध राहा, नाहीतर संदेष्ट्याच्या ग्रंथात जे सांगितलेले आहे ते तुमच्यावर येईल :
41‘अहो धिक्कार करणार्यांनो, पाहा,
आश्चर्य करा व नाहीसे व्हा;
कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो,
ते कार्य असे की, त्याविषयी तुम्हांला कोणी
सविस्तर सांगितले तरी तुम्ही विश्वास
ठेवणारच नाही.”’
42ते बाहेर जात असता लोकांनी विनंती केली की, आम्हांला पुढल्या शब्बाथ दिवशी ह्या गोष्टी सांगाव्यात.
43आणि सभा उठल्यावर, यहूद्यांतील व भक्तिमान यहूदीयमतानुसारी ह्यांच्यातील पुष्कळ जण पौल व बर्णबा ह्यांच्यामागे गेले; त्या दोघांनी त्यांच्याबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्यास त्यांचे मन वळवले.
प्रेषित परराष्ट्रीयांकडे वळतात
44पुढल्या शब्बाथ दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकायला जमले.
45पण लोकसमुदायांना पाहून यहूदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले.
46तेव्हा पौल व बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले, “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगण्याचे अगत्य होते; तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता व आपणांला सार्वकालिक जीवनाकरता अयोग्य ठरवता त्या अर्थी पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो.
47कारण प्रभूने आम्हांला आज्ञा दिली आहे की,
‘मी तुला परराष्ट्रीयांसाठी प्रकाश करून ठेवले आहे,
ह्यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस.”’
48हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णन केला; तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेवला.
49आणि प्रभूचे वचन त्या सर्व प्रांतात पसरत गेले.
50तेव्हा यहूदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले.
51त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकुन्यास गेले.
52इकडे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.
Currently Selected:
प्रेषितांची कृत्ये 13: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.