YouVersion Logo
Search Icon

यशया 47

47
बाबेलसंबंधी न्याय
1अगे बाबेलच्या कुमारिके, खाली उतरून धुळीत बस; खास्द्यांच्या कन्ये, सिंहासन सोडून भूमीवर बस, कारण तुला ह्यापुढे नाजूक व सुकुमार म्हणणार नाहीत.
2जाते घेऊन धान्य दळ, आपला बुरखा मागे सार, वस्त्राचा घोळ उचलून धर, मांड्या उघड्या करून नदीनाल्यांतून पार चालत जा.
3तुझी काया उघडी पडू दे; तुझी लज्जा दिसू दे; मी सूड घेईन, कोणाची गय करणार नाही.
4आमच्या उद्धारकर्त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू असे आहे.
5अगे खास्द्यांच्या कन्ये, गप्प बस, अंधारात जाऊन लप; कारण लोक ह्यापुढे तुला राज्यांची स्वामिनी म्हणणार नाहीत.
6मी आपल्या लोकांवर रुष्ट झालो, मी आपले वतन अपवित्र केले; त्यांना तुझ्या हाती दिले. तू त्यांच्यावर किमपि दया केली नाहीस, वृद्धांवर तू आपले भारी जू लादलेस.
7तू म्हणालीस, “मी सर्वकाळ स्वामिनी राहीन,” म्हणून तू ह्या गोष्टी ध्यानात धरल्या नाहीत, त्यांचा परिणाम लक्षात आणला नाही.
8अगे विलासिनी, जी तू निश्‍चिंत बसतेस व मनात म्हणतेस, “मीच आहे, माझ्यावेगळी कोणी नाही, मी विधवा होणार नाही, अपत्यहीनतेचा अनुभव मला घडणार नाही,” ती तू हे ऐक :
9अपत्यहीनता व वैधव्य ही दोन्ही एकाच दिवशी, एकाच क्षणी तुला प्राप्त होतील; तुझे बहुविध मंत्रतंत्र व तुझी विपुल चेटके ह्यांना न जुमानता ती तुझ्यावर पूर्णपणे गुदरतील.
10कारण तू आपल्या दुष्टतेवर भिस्त ठेवलीस; तू म्हणालीस, “कोणी मला पाहत नाही;” तुझे शहाणपण व तुझे ज्ञान ह्यांनी तुला बहकवले म्हणून तू आपल्या मनात म्हणालीस, “मीच आहे, माझ्यावेगळी कोणी नाही.”
11ह्यामुळे मंत्रतंत्रांनी निवारता येणार नाही अशी विपत्ती तुझ्यावर येईल; खंडणी देऊन टाळता येणार नाही असे अरिष्ट तुझ्यावर येईल; तुझ्या ध्यानीमनी नाही असा नाश तुला एकाएकी गाठील.
12तर तुझे मंत्रतंत्र व बहुविध चेटके, ज्यांचा जप तू तरुणपणापासून करून थकलीस, ती आता चालव; कदाचित त्याचा तुला उपयोग होईल, त्यांनी कदाचित तुझा धाक बसेल.
13तू पुष्कळ मसलती करता करता थकलीस; तर तुझ्यावर काय काय येणार हे तुला दर चंद्रदर्शनाच्या वेळी कळवणारे ज्योतिषी व नक्षत्र पाहणारे पुढे येवोत; त्यांच्याने तुझा बचाव होईल तर ते करोत.
14पाहा, ते धसकटासारखे झाले आहेत, अग्नीने त्यांना भस्म केले आहे; ज्वालेच्या तडाख्यातून त्यांना स्वत:चा बचाव करता येईना. हा शेकत बसण्याचा विस्तव नव्हे, भोवती बसण्याच्या शेगडीचा अग्नी नव्हे.
15तू ज्यांच्यासाठी शिणलीस त्या तुझ्या लोकांची अशी गत झाली आहे; तुझ्या तारुण्यापासून तुझ्याबरोबर व्यापार करणारे भटकत भटकत आपापल्या स्थानी जात आहेत; तुझा बचाव करणारा कोणी नाही.

Currently Selected:

यशया 47: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for यशया 47