YouVersion Logo
Search Icon

यशया 48

48
नव्या गोष्टींसंबंधी भाकीत
1हे याकोबाच्या घराण्या, ऐक, तुला इस्राएल हे नाव आहे, तू यहूदाच्या झर्‍यातून निघाला आहेस; तू परमेश्वराच्या नामाची शपथ वाहतोस व इस्राएलाच्या देवाचे स्तवन करतोस, पण सत्याने व नीतिमत्तेने नव्हे.
2ते तर आपणांस पवित्र नगराचे म्हणवतात व इस्राएलाच्या देवाचा आश्रय करतात; त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे.
3“मी मागेच पूर्वीच्या गोष्टी सांगितल्या, माझ्या मुखातून त्या निघाल्या, मी त्या कळवल्या; मी त्या अकस्मात करू लागलो, आणि त्या घडून आल्या.
4तू हट्टी आहेस, तुझ्या मानेचे स्नायू जसे काय लोखंड व तुझे कपाळ जसे काय पितळ आहे हे मला ठाऊक होते.
5म्हणून हे बहुत काळापूर्वीच तुला कळवले. ते घडण्यापूर्वीच तुला विदित केले; नाहीतर तू म्हणाला असतास की ‘माझ्या मूर्तीने ते केले; माझ्या कोरीव मूर्तीच्या आज्ञेने व माझ्या ओतीव मूर्तीच्या आज्ञेने ते झाले.’
6तू हे ऐकले आहेस, हे सर्व पाहा, तुम्हांला हे कबूल करायला नको काय? आतापासून मी नव्या गोष्टी, गुप्त गोष्टी, तुला माहीत नाहीत अशा गोष्टी तुला ऐकवतो.
7त्या आताच उद्भवल्या, फार मागे नाहीत; त्या तुला आजपर्यंत ठाऊक नव्हत्या, नाही तर तू म्हणतास, ‘पाहा, त्या मला आधीच ठाऊक होत्या.’
8तू त्या ऐकल्या नव्हत्या, जाणल्या नव्हत्या; प्राचीन काळापासून तुझे कान उघडले नव्हते, कारण तू विश्वासघातकी आहेस; गर्भवासापासून तुला फितुरी हे नाव पडले आहे, हे मला ठाऊक होते.
9माझ्या नामाप्रीत्यर्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकला; तुझा उच्छेद करू नये म्हणून माझ्या प्रशंसेप्रीत्यर्थ मी स्वतःला आवरले.
10मी तुला गाळले आहे, पण रुप्याप्रमाणे नव्हे; मी दु:खरूप भट्टीत तुला कसोटीस लावले आहे.
11माझ्या, केवळ माझ्याचप्रीत्यर्थ हे मी करतो; माझ्या नामाची अप्रतिष्ठा का व्हावी? माझा गौरव मी इतरांना देत नाही.
परमेश्वर इस्राएलास मुक्त करील
12हे याकोबा, मी बोलवलेल्या इस्राएला, माझे ऐक; मी तोच आहे; मी आदि आहे व अंतही आहे.
13माझ्याच हाताने पृथ्वीचा पाया घातला; माझ्या उजव्या हाताने आकाश विस्तारले; मी हाक मारताच ती माझ्यापुढे एकत्र उभी राहतात.
14तुम्ही सर्व जमा व्हा, ऐका; त्या मूर्तींपैकी कोणी ह्या गोष्टी कळवल्या? परमेश्वराला प्रिय असलेला मनुष्य आपल्या इच्छेप्रमाणे बाबेलचे करील; तो आपले भुजबल खास्द्यांवर चालवील.
15मी, केवळ मीच बोललो आहे; मी त्याला बोलावले आहे, त्याला आणले आहे. त्याचा आयुष्यक्रम सफल होईल.
16तुम्ही माझ्याजवळ या, हे ऐका; प्रारंभापासून मी गुप्तपणे बोललो नाही; ते होऊ लागल्यापासून तेथे मी आहेच.” आणि आता प्रभू परमेश्वराने मला व आपल्या आत्म्याला पाठवले आहे.
17परमेश्वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू, म्हणतो : “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.
18तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांती नदीसारखी, तुझी नीतिमत्ता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती;
19तुझा वंश रेतीइतका, तुझ्या पोटचे संतान रेतीच्या कणांइतके असते; त्याचे नाव माझ्यासमोरून उच्छेद पावले नसते, ते नष्ट झाले नसते.”
20तुम्ही बाबेलातून निघा, खास्दी लोकांमधून जयजयकार करीत पळत सुटा; हे कळवा, ऐकवा, दिगंतापर्यंत असे पुकारा की, “परमेश्वराने आपला सेवक याकोब ह्याचा उद्धार केला आहे.”
21त्यांना त्याने रुक्ष भूमीवरून नेले, तेथे त्यांना तहान लागली नाही; त्यांच्यासाठी त्याने खडकातून पाणी वाहवले; त्याने खडक फोडला तो पाणी खळखळा वाहिले.
22परमेश्वर म्हणतो, “दुर्जनांना शांती नसते.”

Currently Selected:

यशया 48: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for यशया 48