YouVersion Logo
Search Icon

ईयोब 4

4
अलीफज ईयोबाला धमकावतो
1मग अलीफज तेमानी म्हणाला,
2“तुझ्याशी मी काही बोललो तर तुला वाईट नाही ना वाटणार? तरी बोलल्यावाचून कोणाच्याने राहवेल?
3पाहा, तू बहुत जनांस शिक्षण दिले आहेस, आणि दुर्बळ हात सबळ केले आहेत.
4तुझ्या शब्दांनी ठेचाळत असलेल्यास धीर दिला आहेस, लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहेत;
5पण तुझ्यावर प्रसंग आला असता तू कष्टी होतोस; तुला दुःखस्पर्श झाला म्हणजे तू घाबरतोस,
6तुझ्या देवभक्तीचा तुला आश्रय आहे ना? तुझ्या सात्त्विक आचरणावर तुझी आशा आहे ना?
7कोणी निरपराध असून कधी नाश पावला आहे काय? नीतिमान कधी विलयास गेले आहेत काय? ह्याचा विचार कर.
8माझ्या पाहण्यात तर असे आहे की, जे अधर्माची नांगरणी करतात व दुःखाची पेरणी करतात, ते तशीच कापणी करतात.
9देवाच्या श्वासाने ते विलय पावतात, त्याच्या क्रोधाच्या फुंकराने ते नाहीतसे होतात.
10सिंहाची गर्जना खुंटते, विक्राळ सिंहाचा नाद खुंटतो, तरुण सिंहाचे दात उपटले जातात.
11वृद्ध सिंह भक्ष्य न मिळाल्यामुळे मरतो, सिंहिणीचे छावे चोहोकडे पांगतात.
12एक गुप्त गोष्ट मला कळली, माझ्या कानी तिची गुणगुण आली;
13रात्री माणसे निद्रावश होतात अशा समयी मला दृष्टान्त होऊन मी विचारलहरींत मग्न झालो असता,
14मला भीती प्राप्त होऊन मी थरथरा कापू लागलो, माझी हाडे लटलटू लागली;
15माझ्या तोंडाजवळून वायुस्वरूपी1 असा कोणी गेला; तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.
16तो तेथे उभा राहिला, पण त्याचा आकार मला नीट दिसला नाही; तरी माझ्यासमोर काही आकृती होती; मी मंद वाणी ऐकली की,
17‘मर्त्य मानव ईश्वरापुढे नीतिमान ठरेल काय? मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्यापुढे शुद्ध ठरेल काय?
18पाहा, तो तर आपल्या सेवकांचाही भरवसा धरत नाही; तो आपल्या दिव्यदूतांना प्रमाद केल्याचा दोष लावतो;
19तर मृत्तिकागृहात जे राहतात, ज्यांचा पाय मातीत घातला आहे, त्यांचा त्याच्यापुढे काय पाड! ते पतंगासारखे चिरडले जातात.
20सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या अवकाशात ते छिन्नभिन्न होतात; त्यांचा कायमचा नाश होतो व कोणी त्यांची पर्वा करीत नाही.
21त्यांच्या राहुटीचा तणावा कापला जात नाही काय? ज्ञानप्राप्तीविना ते मरून जातात.”’

Currently Selected:

ईयोब 4: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in