YouVersion Logo
Search Icon

ईयोब 3

3
ईयोब आपल्या जन्मदिवसाला शाप देतो
1नंतर ईयोबाने तोंड उघडून आपल्या जन्मदिवसाला शाप दिला.
2ईयोब म्हणाला,
3“मी जन्मलो तो दिवस जळो! ‘पुरुषगर्भ राहिला’ असे जी रात्र म्हणाली ती जळो!
4तो दिवस अंधार होवो; ईश्वर त्या दिवसाची निगा न करो; त्यावर प्रकाश न पडो.
5अंधकार व मृत्युच्छाया ही त्याला आपला आप्त लेखोत; तो दिवस अभ्राच्छादित होवो; दिवसास जे काळोखी आणते ते सर्व त्याला भयभीत करो.
6काय ती रात्र! काळोख तिला पछाडो! वर्षाच्या दिनमालिकेत ती आनंद न करो; महिन्याच्या तिथीत तिची गणना न होवो.
7पाहा! ती रात्र निष्फळ असो; तिच्यात आनंदघोषाचा प्रवेश न होवो.
8दिवसाला शाप देणारे, लिव्याथानाला1 चेतवण्यात निपुण असणारे तिला शाप देवोत.
9तिच्या प्रभातसमयीचे तारे अंधकारमय होवोत; ती प्रकाशाची अपेक्षा करो, पण तिला तो न मिळो, तिला उषानेत्रांचे दर्शन न घडो;
10कारण तिने माझ्या मातेचे गर्भाशयद्वार बंद केले नाही, दुःख माझ्या डोळ्यांआड ठेवले नाही.
11मी गर्भाशयातच का नाही मेलो? गर्भाशयातून निघताच माझा प्राण का नाही गेला?
12मांड्यांनी माझा स्वीकार का केला? मी चोखावी म्हणून स्तनांनी माझा स्वीकार का केला?
13केला नसता तर मी आज पडून स्वस्थ राहिलो असतो, मी निजलो असतो, मी विसावा पावलो असतो;
14आपणासाठी शून्य मंदिरे बांधणारे भूपती व मंत्री ह्यांच्याबरोबर,
15सोन्याचा संचय करणारे, आपली घरे चांदीने भरून ठेवणारे सरदार ह्यांच्याबरोबर मी विसावा पावलो असतो.
16अकाली पतन पावलेल्या गुप्त गर्भासारखा, प्रकाश कधी न पाहिलेल्या अर्भकासारखा मी असतो.
17तेथे दुर्जन त्रास देण्याचे थांबवतात, श्रांत विश्रांती पावतात.
18तेथे बंदिवान एकत्र निश्‍चिंत राहतात; वेठीस लावणार्‍याचा शब्द त्यांच्या कानी पडत नाही.
19तेथे लहानथोर समान असतात; दास आपल्या धन्यापासून मोकळा असतो.
20विपन्नाला प्रकाश का मिळतो? जे मनाचे दुःखी त्यांना जीवन का प्राप्त होते?
21ते मृत्यूची उत्कट अपेक्षा करतात, पण तो येत नाही; गुप्त निधीसाठी खणणार्‍यांपेक्षा ते मृत्यूच्या प्राप्तीसाठी अधिक खटाटोप करतात;
22त्यांना शवगर्ता प्राप्त झाली म्हणजे ते हर्ष करतात, त्यांना अत्यानंद होतो.
23ज्या पुरुषाचा मार्ग गुप्त आहे, ज्याला देवाने कुंपण करून कोंडले आहे अशाला प्रकाश का प्राप्त होतो?
24मला तर अन्नाऐवजी उसासे प्राप्त होत आहेत, माझा आक्रोश जलधारांप्रमाणे वाहत आहे.
25मला कशाचीही भीती वाटली तर तेच माझ्यावर येते. कशानेही मला थरकाप झाला तर ते माझ्यावर येते.
26मी निश्‍चिंत, स्वस्थ व विश्रांत नाही, तरीदेखील मला आणखी क्लेश प्राप्त होत आहेत.”

Currently Selected:

ईयोब 3: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in