YouVersion Logo
Search Icon

मलाखी 2

2
1आता याजकहो, तुम्हांला ही आज्ञा होत आहे;
2सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या नावाचा महिमा व्हावा ह्यासाठी तुम्ही ऐकून मन लावले नाही, तर मी तुमच्यावर शाप पाठवीन व तुमचे आशीर्वाद शाप करीन; तुम्ही लक्ष पुरवत नाही म्हणून मी त्यांना शापरूप करून चुकलो आहे.
3पाहा, मी तुमच्या शेतातले बी निर्जीव करीन,1 तुमच्या यज्ञपशूची विष्ठा तुमच्या मुखांना फाशीन; लोक विष्ठेबरोबर तुम्हांलाही फेकून देतील.
4लेव्यांबरोबर माझा करार कायम होण्यासाठी ही आज्ञा मी तुमच्याकडे पाठवली आहे हे तुम्हांला समजेल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
5मी त्यांच्याबरोबर केलेला करार जीवनाचा व शांतीचा होता; त्याने भय धरावे म्हणून मी ती त्याला दिली होती आणि त्याला माझी भीती वाटली व माझ्या नावाचा त्याला धाक वाटला.
6त्याच्या मुखात सत्याचे नियमशास्त्र होते, त्याच्या वाणीत कुटिलता आढळली नाही; तो माझ्याबरोबर शांतीने व सरळतेने वागला, व त्याने अनेकांना अधर्मापासून वळवले.
7कारण याजकाच्या वाणीच्या ठायी ज्ञान असावे, त्याच्या तोंडून नियमशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे; कारण तो सेनाधीश परमेश्वराचा निरोप्या आहे;
8पण तुम्ही मार्ग सोडून गेला आहात, नियमशास्त्राच्या मार्गात पुष्कळांना तुम्ही ठोकर खायला लावले आहे; तुम्ही लेव्यांचा करार बिघडवला आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
9ह्यास्तव मी तुम्हांला सर्व लोकांपुढे तुच्छ व नीच केले आहे, कारण तुम्ही माझ्या मार्गांनी चालत नाही व माणसांची भीड धरून न्याय करता.”
बेइमानीबद्दल इस्राएलला खडसावणी
10आम्हा सर्वांचा एकच पिता नाही काय? एकाच देवाने आम्हांला उत्पन्न केले नाही काय? असे असताना आम्ही आपापल्या बंधूचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडतो बरे?
11यहूदा विश्वासघात करत आहे, इस्राएलमध्ये व यरुशलेमेत एक अमंगळ प्रकार घडला आहे; म्हणजे यहूदाने परमेश्वराला प्रिय असलेले त्याचे पवित्रस्थान भ्रष्ट केले आहे, व परक्या दैवताच्या कन्येबरोबर विवाह केला आहे.
12जो मनुष्य असे करतो तो हाक मारणारा असो, उत्तर देणारा असो, किंवा सेनाधीश परमेश्वराला यज्ञार्पण करणारा असो, त्याला परमेश्वर याकोबाच्या डेर्‍यातून नाहीसे करील.
13तसेच आसवे गाळणे, रडणे व उसासे टाकणे ह्यांनी परमेश्वराच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकले आहे की तो यज्ञार्पणाकडे ढुंकून पाहत नाही; तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही.
14तुम्ही म्हणता “असे का?” कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षी आहे; ती तर तुझी सहचारिणी व तुझी कराराची पत्नी असून तिच्याबरोबर तू विश्वासघाताने वागला आहेस.
15ज्याच्या ठायी आत्म्याचा थोडातरी अंश आहे अशा कोणीही असे कधी केले नाही; देवाला अनुसरणार्‍या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? ह्याकरता आपल्या आत्म्याला जपावे; व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये.
16परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, मला सूटपत्राचा तिटकारा आहे; म्हणून सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नीबरोबर2 क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करतो; तुम्ही आपल्या आत्म्याला जपा, विश्वासघाताने वागू नका.”
न्यायाचा दिवस समीप
17तुम्ही आपल्या भाषणाने परमेश्वराला कंटाळा आणला आहे, तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही कशाने त्याला कंटाळा आणला?’ तुम्ही म्हणता, ‘प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे व तो त्याच्यासंबंधाने संतुष्ट असतो, नाहीतर न्याय करणारा देव आहे कुठे?’ अशाने तुम्ही त्याला कंटाळा आणला आहे.

Currently Selected:

मलाखी 2: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in