मलाखी 3
3
1पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो; ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पाहा, करार घेऊन येणार्या निरोप्याची3 तुम्ही अपेक्षा करत आहात, तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
2त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. “कारण तो धातू गाळणार्याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे;
3रुपे गाळून शुद्ध करणार्यासारखा तो बसेल, व लेवीच्या वंशजांना शुद्ध करील; त्यांना सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील. मग ते नीतिमत्तेने परमेश्वराला बली अर्पण करतील.
4पूर्वीच्या दिवसांप्रमाणे, प्राचीन वर्षांप्रमाणे यहूदा व यरुशलेम ह्यांचे यज्ञार्पण परमेश्वराला आवडेल.
5मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.
दशमांशाचे देणे
6कारण मी परमेश्वर आहे, मी बदलणारा नाही; म्हणून याकोबवंशजहो, तुम्ही नष्ट झाला नाहीत.
7तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून माझे विधी तुम्ही मोडले, ते पाळले नाहीत. माझ्याकडे वळा, म्हणजे मी तुमच्याकडे वळेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही म्हणता, ‘आम्ही कोणत्या बाबतीत वळावे?’
8मनुष्य देवाला ठकवील काय? तुम्ही तर मला ठकवले आहे; असे असून तुम्ही म्हणता, ‘आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे?’ दशमांश व अर्पणे ह्यासंबंधाने.
9तुम्ही शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवले आहे.
10सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा म्हणजे मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादांचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही ह्याविषयी माझी प्रचिती पाहा.
11तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणार्यास मी तुमच्यासाठी धमकावीन; तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे फळ अकाली गळणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
12सर्व राष्ट्रे तुम्हांला धन्य म्हणतील; कारण तुमची भूमी मनोरम होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
नीतिमान व दुष्ट ह्यांच्यातला भेद
13परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझ्याबरोबर कठोर भाषण केले आहे; तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही तुझ्याविरुद्ध काय बोललो?’
14तुम्ही म्हणालात, ‘देवाची सेवा करणे व्यर्थ आहे; त्याने आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही केले व सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोकवस्त्रे धारण करून चाललो ह्यांपासून लाभ काय?
15आता आम्ही गर्विष्ठांना सुखी म्हणतो; दुराचारी संपन्न झाले आहेत; त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तरी त्यांचा निभाव लागला आहे.”’
16तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांशी बोलले; ते परमेश्वराने कान देऊन ऐकले आणि परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे ह्यांची एक स्मरणवही त्याच्यासमोर लिहिण्यात आली.
17सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील; जसा कोणी आपली सेवाचाकरी करणार्या पुत्रावर दया करतो तसा मी त्यांच्यावर दया करीन.
18मग तुम्ही वळाल, आणि नीतिमान व दुष्ट ह्यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा ह्यांच्यातला भेद तुम्हांला कळेल.
Currently Selected:
मलाखी 3: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.