YouVersion Logo
Search Icon

गणना 34

34
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“इस्राएल लोकांना आज्ञा कर की, जो कनान देश पुढील चतुःसीमांप्रमाणे तुमचे वतन व्हायचा आहे, त्या कनान देशात तुम्ही प्रवेश कराल,
3तेव्हा तुमचा दक्षिण विभाग त्सीन रानापासून अदोम देशाच्या सरहद्दीपर्यंत असावा, आणि तुमची दक्षिण सीमा क्षार समुद्राच्या टोकाच्या पूर्वेपासून सुरू व्हावी;
4तेथून तुमची सरहद्द अक्रब्बीम चढावाच्या दक्षिणेस पोचून तेथून वळून त्सीनापर्यंत असावी, आणि ती तशीच कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस जावी, आणि हसर-अद्दारापर्यंत जाऊन असमोनास पोचावी;
5मग ती सरहद्द असमोनापासून वळून मिसर देशाच्या नाल्यापर्यंत पोचावी, आणि तेथून थेट समुद्रकिनार्‍यापर्यंत जावी.
6तुमची पश्‍चिम सीमा महासमुद्र व त्याचा किनारा राहील; तीच तुमची पश्‍चिम सीमा होय.
7तुमची उत्तर सीमा ही असावी : महासमुद्रापासून होर पर्वतापर्यंत एक रेषा आखावी;
8आणि होर पर्वतापासून हमाथाच्या वाटेपर्यंत रेषा आखून ती सदादापर्यंत न्यावी.
9मग ती सीमारेषा जिप्रोनास पोचून तिचा शेवट हसर-एनान येथे व्हावा; हीच तुमची उत्तर सीमा.
10तुमची पूर्व सीमा हसर-एनान येथून शफामापर्यंत आखावी;
11व ती शफामापासून अईनाच्या पूर्वेस रिब्ला आहे तेथपर्यंत उतरत उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनार्‍याच्या उतरणीपर्यंत जावी.
12मग ती सीमा यार्देनेपर्यंत उतरून खाली थेट क्षार-समुद्रापर्यंत जावी; तुमच्या देशाच्या चतुःसीमा ह्याच होत.”
13तेव्हा मोशेने इस्राएल लोकांना आज्ञा केली की, “चिठ्ठ्या टाकून ज्या देशाचे वतन तुम्हांला मिळणार आहे, म्हणजे साडेनऊ वंशांना जो देश देण्याचे परमेश्वराने ठरवले आहे तो हाच;
14कारण रऊबेनाच्या मुलांच्या वंशाला त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे आणि गादाच्या मुलांच्या वंशाला त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे वतन मिळून चुकले आहे; आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशालाही त्यांचे वतन मिळाले आहे.
15ह्याप्रमाणे यरीहोसमोर यार्देनेच्या अलीकडे पूर्व दिशेस म्हणजे उगवतीस अडीच वंशांना त्यांचे वतन मिळाले आहे.”
16परमेश्वर मोशेला म्हणाला,
17“जे पुरुष हा देश तुम्हांला वतन म्हणून वाटून देणार आहेत त्यांची नावे ही : एलाजार याजक व नूनाचा मुलगा यहोशवा.
18वतन म्हणून देशाची वाटणी करण्यासाठी प्रत्येक वंशाचा एक सरदार घ्यावा.
19त्या पुरुषांची नावे ही : यहूदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब;
20शिमोनाच्या मुलांच्या वंशातला, अम्मीहूदाचा मुलगा शमुवेल;
21बन्यामीनाच्या वंशातला, किसलोनाचा मुलगा अलीदाद;
22दानी वंशातला सरदार, यागलीचा मुलगा बुक्की;
23योसेफाच्या संततीपैकी मनश्शे वंशातला सरदार, एफोदाचा मुलगा हन्नीएल;
24एफ्राइमी वंशातला सरदार, शिफटानाचा मुलगा कमुवेल;
25जबुलूनी वंशातला सरदार, पनीकाचा मुलगा अलीसाफान;
26इस्साखारी वंशातला सरदार, अज्जानाचा मुलगा पलटीयेल;
27आशेरी वंशातला सरदार, शलोमीचा मुलगा अहीहूद;
28आणि नफताली वंशातला सरदार, अम्मीहूदाचा मुलगा पदाहेल.
29परमेश्वराने कनान देश इस्राएल लोकांना वतनादाखल वाटून देण्याची आज्ञा ज्यांना केली होती ते हे.”

Currently Selected:

गणना 34: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in