गणना 35
35
लेव्यांची शहरे
1परमेश्वर मवाबाच्या मैदानात यरीहोसमोर यार्देनेतीरी मोशेला म्हणाला, 2“इस्राएल लोकांना अशी आज्ञा कर की, तुम्ही आपल्या ताब्यात मिळणार्या वतनातून लेव्यांना राहण्यासाठी नगरे द्यावीत आणि त्या नगरांच्या आसपासची शिवारेही त्यांना द्यावीत.
3नगरे त्यांच्या वस्तीसाठी असावीत आणि शिवारे त्यांची गुरेढोरे, शेरडेमेंढरे आणि त्यांच्या सर्व जनावरांसाठी असावीत.
4लेव्यांना जी शिवारे द्याल ती नगराच्या तटाबाहेर दक्षिण बाजूस दोन हजार हात सभोवार असावीत.
5आणि नगराच्या बाहेर पूर्व बाजूस दोन हजार हात, दक्षिण बाजूस दोन हजार हात, पश्चिम बाजूस दोन हजार हात, उत्तर बाजूस दोन हजार हात मोजावेत आणि नगर मध्ये असावे, हेच त्यांच्या नगराचे शिवार असावे.
6लेव्यांना जी नगरे द्याल त्यांपैकी सहा शरणपुरे असावीत, मनुष्यवध करणार्यांना तेथे पळून जाऊ द्यावे; त्या सहांखेरीज आणखी बेचाळीस नगरे त्यांना द्यावीत.
7अशी एकंदर अठ्ठेचाळीस नगरे व त्यांची शिवारे लेव्यांना द्यावीत.
8इस्राएल लोकांच्या वतनातून जी नगरे लेव्यांना द्यायची ती मोठ्या वतनातून अधिक व लहान वतनातून कमी अशी द्यावीत; प्रत्येक वंशाने आपापल्या वतनाच्या मानाने लेव्यांना नगरे द्यावीत.”
शरणपुरे
(अनु. 19:1-13; यहो. 20:1-9)
9परमेश्वर मोशेला म्हणाला,
10“इस्राएल लोकांना सांग : यार्देन ओलांडून तुम्ही कनान देशात पोहचाल,
11तेव्हा तुमच्याकरता शरणपुरे म्हणून काही नगरे ठरवा; म्हणजे कोणाच्या हातून चुकून मनुष्यवध झाला तर त्याने तेथे पळून जावे.
12सूड उगवणार्यापासून आश्रयस्थानादाखल ही नगरे तुमच्या उपयोगी पडतील, आणि खुनी मनुष्याचा मंडळीसमोर न्याय होईपर्यंत त्याला कोणी मारून टाकू नये.
13जी नगरे तुम्ही द्याल त्यांपैकी सहा तुमची शरणपुरे असावीत.
14तीन नगरे यार्देनेच्या पूर्वेस द्यावीत आणि तीन नगरे कनान देशात द्यावीत, ही शरणपुरे होत.
15ही सहा नगरे इस्राएल लोकांसाठी, त्यांच्यातल्या परक्यासाठी व उपर्यासाठी आश्रयस्थाने म्हणून नेमली आहेत; एखाद्याने चुकून मनुष्यवध केला तर त्याने तिकडे पळून जावे.
16तथापि एखाद्याने लोखंडी शस्त्राने कोणावर प्रहार केला आणि तो मेला तर त्याला खुनी समजावे; अशा खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.
17ज्याकडून मृत्यू घडेल असा धोंडा एखाद्याने हातात घेऊन कोणाला मारले आणि तो मरण पावला तर त्याला खुनी समजावे; अशा मनुष्याला अवश्य जिवे मारावे.
18ज्याकडून मृत्यू घडेल असे लाकडी शस्त्र एखाद्याने हातात घेऊन कोणाला मारले आणि तो मरण पावला तर त्याला खुनी समजावे; अशा खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.
19रक्तपाताबद्दल सूड घेणार्याने स्वत: त्या खुनी मनुष्याला जिवे मारावे; तो सापडेल तेथे त्याने त्याला जिवे मारावे.
20कोणी एखाद्याला द्वेषबुद्धीने ढकलून दिले, किंवा टपून बसून त्याला काही फेकून मारले आणि त्यामुळे तो मेला;
21अथवा कोणी वैरभावाने त्याला ठोसा मारल्यामुळे तो मेला, तर मारणार्याला अवश्य जिवे मारावे; तो खुनी होय; रक्तपाताबद्दल सूड घेणार्याने खुनी सापडेल तेथे त्याला जिवे मारावे.
22तथापि कोणी वैरभावाने नव्हे पण अचानक एखाद्याला ढकलले किंवा टपून न बसता त्याच्यावर एखादे शस्त्र फेकले, किंवा ज्याकडून मृत्यू घडेल असा धोंडा हातात घेऊन नकळत कोणावर फेकला,
23आणि त्यामुळे तो मेला, आणि तो त्याचा शत्रू नसला अथवा त्याने त्याची हानी करू पाहिली नसली,
24तर मंडळीने मारणार्याचा आणि रक्तपाताबद्दल सूड घेणार्याचा न्याय ह्या नियमानुसार करावा.
25मग मनुष्यवध करणार्या त्या मनुष्याला, रक्तपाताबद्दल सूड घेणार्याच्या हातून सोडवून ज्या शरणपुरात तो पळून गेला होता तेथे त्याला मंडळीने पुन्हा पोचते करावे; आणि पवित्र तेलाने अभिषेक केलेला मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्याने तेथेच राहावे.
26पण मनुष्यवध करणारा ज्या शरणपुरात पळून गेला असेल त्याच्या सीमेबाहेर जर तो कधी गेला,
27आणि रक्तपाताबद्दल सूड घेणार्याने त्या शरणपुराच्या सीमेबाहेर त्याला गाठले, आणि रक्तपाताबद्दल सूड घेणार्याने त्याला जिवे मारले तर त्या रक्तपाताचा दोष त्याला लागायचा नाही.
28कारण मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्यवध करणार्याने शरणपुरातच राहायचे होते; पण मुख्य याजक मेल्यावर पाहिजे तर त्याने आपल्या वतनात परत जावे.
साक्षीदार आणि प्राणाबद्दल खंडणी ह्यांविषयी नियम
29तुमच्या पिढ्यानपिढ्यासाठी तुमच्या सर्व वस्तीच्या ठिकाणी ह्या गोष्टी तुमच्या न्यायाचे विधी म्हणून नेमलेल्या आहेत.
30कोणी एखाद्या मनुष्याचा खून केला तर साक्षीदारांच्या साक्षीवरून त्या खून करणार्याला जिवे मारावे; पण एकाच साक्षीदाराच्या साक्षीवरून कोणाला जिवे मारू नये.
31मनुष्यवध करणारा देहान्त शासनास पात्र ठरला तर त्याच्या प्राणाबद्दल खंडणी घेऊन त्याला सोडून देऊ नये, पण त्याला अवश्य जिवे मारावे.
32त्याचप्रमाणे शरणपुरात पळून गेलेल्या मनुष्याबद्दल काही खंडणी घेऊन त्याला याजक मरण्यापूर्वी आपल्या वतनात राहण्यास परत जाऊ देऊ नये.
33ज्या देशात तुम्ही राहाल तो भ्रष्ट करू नका; कारण खुनाने देश भ्रष्ट होतो, आणि रक्तपात करणार्या मनुष्याचा रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्चित्त होऊ शकत नाही.
34ज्या देशात तुम्ही वस्ती कराल त्यामध्ये मी राहीन म्हणून तो देश अशुद्ध करू नका, कारण मी परमेश्वर इस्राएल लोकांमध्ये वसत आहे.”
Currently Selected:
गणना 35: MARVBSI
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.