YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 118

118
परमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल उपकारस्तुती
1परमेश्वराचे उपकारस्मरण करा कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सनातन आहे.
2आता इस्राएलाने म्हणावे की, “त्याची दया सनातन आहे.”
3अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की, “त्याची दया सनातन आहे.”
4परमेश्वराचे भय धरणार्‍यांनी म्हणावे की, “त्याची दया सनातन आहे.”
5अडचणीत असताना मी परमेशाचा धावा केला; तो ऐकून परमेशाने मला प्रशस्त स्थळी नेले.
6परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?
7माझा साहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे; माझा द्वेष करणार्‍यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहीन.
8मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे.
9अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे.
10सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन.
11त्यांनी मला घेरले आहे; खरोखर मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन.
12त्यांनी मला मधमाश्यांप्रमाणे घेरले आहे; काट्याकुट्यांच्या आगीप्रमाणे ते विझून जातील, परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन.
13मी पडावे म्हणून तू मला जोराने धक्का दिलास, पण परमेश्वराने मला सावरले.
14परमेश माझे बल व माझे गीत आहे; तो माझे तारण झाला आहे.
15उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे; “परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो.
16परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे; परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो.”
17मी मरणार नाही, तर जगेन, आणि परमेशाच्या कृत्यांचे वर्णन करीन.
18परमेशाने मला जबर शासन केले; तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही.
19माझ्यासाठी नीतिमत्त्वाची द्वारे उघडा म्हणजे मी त्यांतून प्रवेश करून परमेशाचे उपकारस्मरण करीन.
20हे परमेश्वराचे द्वार आहे; ह्यातून नीतिमान प्रवेश करोत
21तू माझे ऐकले आहे, तू माझे तारण झाला आहेस, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो.
22बांधणार्‍यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे.
23ही परमेश्वराची करणी आहे; ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे.
24परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे. ह्यात आपण उल्लास व आनंद करू.
25हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की, आमचे तारण कर. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की, आमचा उत्कर्ष कर.
26परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हांला आशीर्वाद देतो.
27परमेश्वर देव आहे, त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे. उत्सवाचा यज्ञपशू वेदीच्या शिंगांना दोर्‍यांनी बांधा.
28तू माझा देव आहेस; मी तुझे उपकारस्मरण करीन; हे माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन.
29परमेश्वराचे उपकारस्मरण करा; कारण तो चांगला आहे. कारण त्याची दया सनातन आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in