YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 119

119
देवाचे उत्कृष्ट नियमशास्त्र आलेफ1
1जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य!
2जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य!
3ते काही अनीतीचे आचरण करत नाहीत, तर त्याच्या मार्गाने चालतात.
4तुझे विधी आम्ही मनःपूर्वक पाळावेत म्हणून तू ते आम्हांला लावून दिले आहेत.
5तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे.
6मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरवले तर मी फजीत होणार नाही.
7तुझे न्याय्य निर्णय मी शिकेन तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करीन.
8मी तुझे नियम पाळीन; माझा सर्वस्वी त्याग करू नकोस.
बेथ
9तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने.
10अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.
11मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे.
12हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; तुझे नियम मला शिकव.
13मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयांचे निवेदन करतो.
14तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा, असे मानून मी अत्यानंद करतो.
15मी तुझ्या विधींचे मनन करीन, तुझ्या मार्गांकडे लक्ष देईन.
16मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरणार नाही.
गीमेल
17आपल्या दासाला औदार्य दाखव, म्हणजे मी जिवंत राहून तुझे वचन पाळीन.
18तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
19मी ह्या जगात केवळ उपरा आहे; तुझ्या आज्ञा माझ्यापासून गुप्त ठेवू नकोस.
20तुझ्या निर्णयांची सर्वदा उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव कासावीस झाला आहे.
21गर्विष्ठांना तू धमकावतोस, तुझ्या आज्ञांपासून बहकणारे शापित आहेत.
22निंदा व तिरस्कार माझ्यापासून दूर कर; कारण मी तुझे निर्बंध पाळतो.
23अधिपतीही बसून आपसांत माझ्याविरुद्ध बोलतात; पण तुझा दास तुझ्या नियमांचे मनन करतो.
24तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत. ते माझे मंत्री आहेत.
दालेथ
25माझा जीव धुळीस मिळाला आहे; तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
26मी आपला वर्तनक्रम तुझ्यापुढे मांडला आणि तू मला उत्तर दिलेस; तू आपले नियम मला शिकव.
27तुझ्या विधींचा मार्ग मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन.
28माझा जीव खेदाने गळून जातो; तू आपल्या वचनाप्रमाणे मला आधार दे.
29असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; करुणा करून तुझे नियमशास्त्र मला दे.
30मी सत्याचा मार्ग निवडला आहे; मी तुझे निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत.
31मी तुझे निर्बंध धरून राहिलो आहे; हे परमेश्वरा, मला फजीत होऊ देऊ नकोस.
32तू माझे मन विकसित करतोस, तेव्हा मी तुझ्या आज्ञांच्या मार्गाने धावतो.
हे
33हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहीन.
34मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन.
35तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालव; त्यांतच मला आनंद आहे.
36माझ्या मनाचा कल अन्याय्य लाभाकडे नको तर तुझ्या निर्बंधाकडे असू दे.
37निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळव. तुझ्या मार्गांत मला नवजीवन दे.
38तू आपले भय धरणार्‍यांना दिलेले वचन आपल्या दासासंबंधाने खरे कर.
39मला निंदेचे भय आहे म्हणून ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत.
40पाहा, मला तुझ्या विधींचा ध्यास लागून राहिला आहे; तू आपल्या न्याय्यत्वाने मला नवजीवन दे.
वाव
41हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य मला लाभो. तुझ्या वचनाप्रमाणे तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त होवो;
42म्हणजे माझी निंदा करणार्‍याला मला उत्तर देता येईल, कारण तुझ्या वचनावर माझा भरवसा आहे.
43तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून सर्वथा नाहीसे होऊ देऊ नकोस, कारण मी तुझ्या निर्णयांची आशा धरली आहे.
44म्हणजे मी तुझे नियमशास्त्र सदासर्वकाळ पाळत राहीन.
45मी मोकळेपणाने चालेन, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे.
46मी राजांसमोरसुद्धा तुझे निर्बंध सांगेन, मला संकोच वाटणार नाही.
47मी तुझ्या आज्ञांत आनंद मानीन, त्या मला प्रिय आहेत.
48तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत म्हणून मी आपले हात उभारीन. आणि तुझ्या नियमांचे मनन करीन.
जायिन
49तू आपल्या दासाला दिलेले वचन आठव, कारण तू मला आशा लावली आहेस.
50माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते.
51गर्विष्ठांनी माझा फार उपहास केला, तरी मी तुझ्या नियमशास्त्रापासून बहकलो नाही.
52हे परमेश्वरा, तुझे पुरातन निर्णय आठवून माझे समाधान झाले आहे.
53दुर्जन तुझ्या नियमशास्त्राचा त्याग करतात, म्हणून मला फार संताप येतो.
54माझ्या संसारयात्रेत तुझे नियम मला गीतरूप झाले आहेत.
55हे परमेश्वरा, मी रात्री तुझ्या नावाचे स्मरण केले आहे. आणि तुझे नियमशास्त्र पाळले आहे.
56मी तुझे विधी आचरले आहेत म्हणून मला हे प्राप्त झाले आहे.
खेथ
57परमेश्वर माझा वाटा आहे. तुझी वचने पाळण्याचा मी निश्‍चय केला आहे.
58मी अगदी मनापासून तुझ्या आशीर्वादाची याचना केली आहे. आपल्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर.
59आपल्या वर्तनक्रमाविषयी विचार करून मी तुझ्या निर्बंधांकडे पावले वळवली.
60मी तुझ्या आज्ञा पाळण्याची त्वरा केली, मी विलंब लावला नाही.
61दुर्जनांच्या पाशांनी मला वेष्टले, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
62तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुझे उपकारस्मरण करण्यास मी मध्यरात्री उठतो.
63तुझे भय धरणार्‍या सर्वांचा, तुझे विधी पाळणार्‍यांचा, मी सोबती आहे.
64हे परमेश्वरा, तुझ्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे; तू आपले नियम मला शिकव.
ठेथ
65हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे हित केले आहेस.
66विवेक व ज्ञान मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझी निष्ठा आहे.
67मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, पण आता मी तुझे वचन पाळत आहे.
68तू चांगला आहेस, तू चांगले करतोस. तुझे नियम मला शिकव.
69गर्विष्ठांनी माझ्यावर आळ घेतला आहे; तरी मी अगदी मनापासून तुझे विधी पाळीन.
70त्यांचे मन कठीण झाले आहे; मी तर तुझ्या नियमशास्त्रात रमून गेलो आहे.
71मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले; कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो.
72सोन्यारुप्याच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे.
योद
73तुझ्या हातांनी मला निर्माण केले व घडवले; तुझ्या आज्ञा शिकण्यास मला बुद्धी दे.
74तुझे भय धरणारे मला पाहून हर्ष करतील; कारण मी तुझ्या वचनाची आशा धरली आहे.
75हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत, आणि सत्यतेने तू मला पिडले आहेस हे मी जाणतो.
76तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार तुझ्या वात्सल्याने मला सांत्वन प्राप्त होऊ दे.
77माझ्यावर करुणा कर म्हणजे मी जगेन; कारण तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे.
78गर्विष्ठ फजीत होवोत, कारण त्यांनी लबाडीने माझ्यावर अन्याय केला आहे; मी तर तुझ्या विधींचे मनन करीन.
79तुझे भय धरणारे माझ्याकडे पाहोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील.
80मी लज्जित होऊ नये म्हणून माझे चित्त तुझ्या नियमांकडे पूर्णपणे लागू दे.
काफ
81तू सिद्ध केलेल्या तारणाची उत्कंठा धरून माझा जीव व्याकूळ झाला आहे, पण मी तुझ्या वचनाची आशा धरतो.
82तुझ्या वचनाचा ध्यास लागून माझे डोळे शिणले आहेत; “तू माझे सांत्वन केव्हा करशील” असे मी म्हणत आहे.
83धुरात ठेवलेल्या बुधल्यासारखा मी झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही.
84तुझ्या सेवकाचे दिवस कितीसे उरले आहेत? माझ्या पाठीस लागणार्‍यांना तू कधी शासन करशील?
85गर्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेवल्या आहेत; ते तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे चालत नाहीत.
86तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत; ते खोटेपणाने माझ्या पाठीस लागले आहेत, तू मला साहाय्य कर.
87त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ नायनाट केला; तरी मी तुझे विधी सोडले नाहीत.
88तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन.
लामेद
89हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे.
90तुझी सत्यता पिढ्यानपिढ्या आहे; तू पृथ्वी स्थापली व ती तशीच कायम आहे.
91तुझ्या निर्णयांविषयी म्हणावे तर ते आजपर्यंत टिकून आहेत, कारण सर्व पदार्थ तुझे सेवक आहेत.
92तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता.
93तुझे विधी मी कधीही विसरणार नाही, कारण तू त्यांच्या योगे मला नवजीवन दिले आहेस.
94मी तुझा आहे, माझे तारण कर, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे.
95दुर्जन माझा नाश करण्यास टपले आहेत; तरी मी तुझे निर्बंध ध्यानात धरीन.
96सर्व पूर्णतेला मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझी आज्ञा अत्यंत व्यापक आहे.
मेम
97अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो.
98तुझ्या आज्ञा मला आपल्या वैर्‍यांपेक्षा अधिक सुज्ञ करतात; कारण त्या सदोदित माझ्याजवळच आहेत.
99माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे. कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करतो.
100वयोवृद्धांपेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधी पाळतो.
101तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरतो.
102तुझ्या निर्णयांपासून मी ढळलो नाही, कारण तू मला शिकवले आहेस.
103तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात! माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात.
104तुझ्या विधींच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो.
नून
105तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
106तुझे न्याय्य निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे, व ती निश्‍चित केली आहे.
107मी फार पिडलो आहे; हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
108हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर; तुझे निर्णय मला शिकव.
109मी आपला जीव नेहमी मुठीत धरून आहे, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
110दुर्जनांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे, तरी तुझ्या विधींपासून मी बहकलो नाही.
111तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो.
112तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लावले आहे.
सामेख
113मी दुटप्पी मनुष्यांचा द्वेष करतो, तथापि तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे.
114तू माझा आश्रय व माझी ढाल आहेस; मी तुझ्या वचनाची आशा धरतो.
115अहो दुष्कर्म्यांनो, माझ्यापासून दूर व्हा म्हणजे मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन.
116तू आपल्या वचनानुसार मला सांभाळ, म्हणजे मी जगेन; माझ्या आशेसंबंधाने मला फजीत होऊ देऊ नकोस.
117मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन, आणि तुझ्या नियमांकडे निरंतर लक्ष ठेवीन.
118तुझ्या नियमांपासून बहकणार्‍या सर्वांचा तू धिक्कार करतोस; त्यांचे कपट निरर्थक आहे.
119पृथ्वीवरील सर्व दुर्जनांस तू गाळासारखे दूर करतोस; म्हणून तुझे निर्बंध मला प्रिय आहेत.
120तुझ्या भयाने माझ्या अंगावर काटा उभा राहतो; तुझ्या निर्णयांना मी भितो.
ऐन
121मी न्याय व नीती आचरली आहे; माझा छळ करणार्‍यांच्या हाती मला सोडून देऊ नकोस.
122तू आपल्या दासाच्या हितासाठी जामीन हो; गर्विष्ठांना माझा छळ करू देऊ नकोस.
123तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतीक्षा करून करून माझे डोळे शिणले आहेत.
124तू आपल्या वात्सल्यास अनुसरून आपल्या दासाला वागवून घे, आणि तू आपले नियम मला शिकव.
125मी तुझा दास आहे, मला तुझ्या निर्बंधांचे ज्ञान व्हावे म्हणून तू मला बुद्धी दे.
126परमेश्वराची कार्य करण्याची वेळ आली आहे, कारण त्यांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे;
127ह्यामुळे मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो.
128ह्यामुळे सर्व बाबीसंबंधाने तुझे सर्व विधी यथायोग्य आहेत असे मी मानतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा मी द्वेष करतो.
पे
129तुझे निर्बंध आश्‍चर्यकारक आहेत, म्हणून माझा जीव ते पाळतो.
130तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते.
131मी तोंड उघडून धापा टाकल्या, कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला.
132तू माझ्याकडे वळ आणि आपल्या नावाची आवड धरणार्‍यांवर करतोस तशी कृपा माझ्यावर कर.
133तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर, आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नकोस.
134मनुष्याच्या जुलमापासून मला मुक्त कर, म्हणजे मी तुझे विधी पाळीन.
135तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड; आणि तुझे नियम मला शिकव.
136लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह वाहतात.
त्सादे
137हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस; तुझे निर्णय सरळ आहेत.
138तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत.
139माझ्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, कारण माझे शत्रू तुझी वचने विसरले आहेत.
140तुझे वचन अगदी शुद्ध आहे; ते तुझ्या दासाला प्रिय आहे;
141मी क्षुद्र व तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही.
142तुझे न्याय्यत्व हे सनातन न्याय्यत्व आहे, आणि तुझे नियमशास्त्र सत्य आहे.
143संकट व क्लेश ह्यांनी मला घेरले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे.
144तुझे निर्बंध निरंतर न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन.
कोफ
145मी अगदी मनापासून तुझा धावा करतो; हे परमेश्वरा, माझे ऐक; मी तुझे नियम पाळीन.
146मी तुझा धावा करतो; तू मला तार, म्हणजे मी तुझे निर्बंध पाळीन.
147उजाडण्यापूर्वी उठून मी आरोळी मारतो; मी तुझ्या वचनांची आशा धरतो.
148तुझ्या वचनाचे चिंतन करायला रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात.
149तू आपल्या वात्सल्यास अनुसरून माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे.
150दुष्कर्म योजणारे माझ्याजवळ आले आहेत; ते तुझ्या नियमशास्त्रापासून दूर आहेत.
151हे परमेश्वरा, तू जवळ आहेस; तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत.
152तुझ्या निर्बंधांवरून मला पूर्वीपासून ठाऊक आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापले आहेत.
रेश
153माझे दुःख पाहा, त्यापासून मला सोडव; कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
154माझा वाद तू चालव, मला मुक्त कर; तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
155तारण दुर्जनांपासून दूर आहे; कारण ते तुझ्या नियमांचा आश्रय करीत नाहीत.
156हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे; तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे.
157माझ्या पाठीस लागणारे व माझे शत्रू पुष्कळ आहेत. तरी मी तुझ्या निर्बंधांपासून ढळलो नाही.
158विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे, कारण ते तुझे वचन पाळत नाहीत.
159तुझे विधी मी किती प्रिय मानतो ते पाहा; हे परमेश्वरा, तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे.
160तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे; तुझे सर्व न्याय्य निर्णय सनातन आहेत.
शीन
161अधिपती माझ्या पाठीस विनाकारण लागले आहेत; परंतु माझे हृदय तुझ्या वचनांचे भय धरते.
162मोठी लूट सापडलेल्या मनुष्याला जसा आनंद होतो तसा तुझ्या वचनाविषयी मला आनंद होतो.
163मी असत्याचा द्वेष करतो व त्याचा वीट मानतो; परंतु तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे.
164तुझ्या न्याय्य निर्णयांसाठी मी दिवसातून सात वेळा तुझे स्तवन करतो.
165तुझे नियमशास्त्र प्रिय मानणार्‍यांना फार शांती असते. त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही.
166हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी प्रतीक्षा करीत आहे; तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत.
167माझा जीव तुझे निर्बंध पाळतो; व ते मला अत्यंत प्रिय आहेत.
168मी तुझे विधी व तुझे निर्बंध पाळतो; कारण माझा सर्व वर्तनक्रम तुझ्यापुढे आहे.
ताव
169हे परमेश्वरा, माझी आरोळी तुझ्यापर्यंत पोहचो; तू आपल्या वचनानुसार मला बुद्धी दे.
170माझी विनंती तुझ्यापुढे येवो; तू आपल्या वचनानुसार मला मुक्त कर.
171तू मला आपले नियम शिकवतोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो.
172माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत.
173तुझा हात मला साहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण मी तुझे विधी स्वीकारले आहेत.
174हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी उत्कंठा धरली आहे; तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे.
175माझा जीव वाचो, म्हणजे तो तुझी स्तुती करील; तुझे निर्णय मला साहाय्य करोत.
176हरवलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे; तू आपल्या दासाचा शोध कर; कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in