YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 66

66
देवाच्या महत्कृत्यांबद्दल उपकारस्तुती
मुख्य गवयासाठी; संगीतस्तोत्र.
1अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, देवाचा जयजयकार करा.
2त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची गौरवयुक्त स्तुती करा.
3देवाला म्हणा, “तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत, तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात.
4सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील व तुझी स्तोत्रे गातील; तुझ्या नावाची स्तोत्रे गातील.”
(सेला)
5अहो या, देवाची कृत्ये पाहा; तो आपल्या कृतींनी मानवजातीस धाक बसवतो.
6त्याने समुद्राची कोरडी भूमी केली; ते नदीतून पायी पार गेले, तेव्हा आम्ही त्याच्या ठायी हर्ष पावलो.
7तो आपल्या सामर्थ्याने सर्वकाळ सत्ता चालवतो, त्याचे नेत्र राष्ट्रांना निरखून पाहतात; बंडखोरांनी आपली मान ताठ करू नये.
(सेला)
8अहो लोकांनो, आमच्या देवाचा धन्यवाद करा, त्याच्या स्तुतीचा घोष ऐकू येईल असा करा;
9त्यानेच आमच्या प्राणाचे रक्षण केले, त्याने आमचे पाय ढळू दिले नाहीत.
10कारण हे देवा, तू आम्हांला पारखले आहेस; रुपे गाळतात तसे तू आम्हांला गाळून पाहिले आहेस.
11तू आम्हांला जाळ्यांत गुंतवले; तू आमच्या कंबरेला भारी ओझे बांधले.
12तू मनुष्यांना आमच्या डोक्यांवरून स्वारी करायला लावले; आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो, तरी तू आम्हांला बाहेर काढून समृद्ध स्थळी आणलेस.
13मी होमार्पणे घेऊन तुझ्या मंदिरात येईन, तुला केलेले नवस फेडीन;
14संकटात असता ते मी आपल्या ओठांनी उच्चारले; मी ते आपल्या तोंडाने केले.
15मेंढ्यांच्या धूपासहित पुष्ट पशूंचे होम मी तुला अर्पण करीन; बोकडांसह मी गोर्‍हे अर्पण करीन.
(सेला)
16अहो देवाचे भय धरणारे सर्व जनहो, तुम्ही या, ऐका; त्याने माझ्या जिवासाठी जे केले आहे ते मी सांगतो.
17मी आपल्या मुखाने त्याचा धावा केला, माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते.
18माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता;
19पण देवाने ऐकलेच आहे; माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे.
20देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझी प्रार्थना अवमानली नाही, त्याने आपली माझ्यावरची दया काढून घेतली नाही.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in