YouVersion Logo
Search Icon

रोमकरांस पत्र 6

6
ख्रिस्ताशी एक असणे व पाप करत राहणे हे परस्परविरोधी आहे
1तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय?
2कधीच नाही! जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार?
3किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय?
4तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो; ह्यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यांतून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे.
5कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ.
6हे आपल्याला ठाऊक आहे की, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला.
7कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे.
8आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे.
9आपल्याला ठाऊक आहे की, मेलेल्यांतून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही; त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही.
10कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला, तो जगतो तो देवासाठीच जगतो.
11तसे तुम्हीही ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्याद्वारे स्वत:स पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले, असे माना.
12ह्यास्तव तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये;
13आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका; तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करा.
14तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही.
गुलामगिरीवरून केलेला बोध
15तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? कधीच नाही!
16आज्ञापालनाकरता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्त्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात, हे तुम्हांला ठाऊक नाही काय?
17तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हांला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले,
18आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्त्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाची स्तुती असो.
19तुमच्या देहस्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्यव्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे; कारण जसे तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरता अमंगळपण व स्वैराचार ह्यांस गुलाम असे समर्पण केले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरता नीतिमत्त्वाला गुलाम असे समर्पण करा.
20तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्त्वासंबंधाने बंधमुक्त होता.
21तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे? त्यांचा शेवट तर मरण आहे.
22परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हांला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे.
23कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for रोमकरांस पत्र 6