YouVersion Logo
Search Icon

रोमकरांस पत्र 7

7
विवाहावरून केलेला बोध
1बंधुजनहो, (नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे) मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राची सत्ता त्याच्यावर चालते, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय?
2पती जिवंत आहे तोपर्यंत त्याची विवाहित स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते; पण पती मरण पावल्यावर तिची पतिबंधनातून सुटका होते.
3म्हणून पती जिवंत असताना ती परपुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी म्हणतील, पण पती मरण पावल्यास ती त्या बंधनातून मुक्त होते; नंतर ती दुसर्‍या पुरुषाची पत्नी झाली असताही व्यभिचारिणी होत नाही.
4त्याप्रमाणे, माझ्या बंधूंनो, तुम्हीही ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्रासंबंधाने मृत झालात; अशासाठी की, तुम्ही दुसर्‍याचे म्हणजे मेलेल्यांतून जो उठला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फळ द्यावे.
5कारण आपण देहस्वभावाच्या अधीन होतो, तेव्हा नियमशास्त्राच्या द्वारे चेतवलेल्या पापवासना आपल्या अवयवांत मरणाला फळ देण्यासाठी कार्य करत होत्या.
6पण आता ज्याने आपण बद्ध होतो त्याच्यासंबंधाने मृत झाल्यामुळे आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत; म्हणून जुन्या शास्त्रलेखास धरून नव्हे तर आत्म्याच्या नावीन्याने आपण सेवा करतो.
नियमशास्त्र व पाप
7तर मग आपण काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे? कधीच नाही! तरीही पापाची ओळख मला नियमशास्त्रावाचून कशानेच झाली नसती. “लोभ धरू नकोस,” असे नियमशास्त्रात सांगितले नसते तर मला लोभाचे ज्ञान झाले नसते.
8पापाने संधी साधून ह्या आज्ञेच्या योगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला होता; कारण नियमशास्त्रावाचून पाप निर्जीव आहे.
9मी नियमशास्त्राविरहित होतो तेव्हा जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो.
10ह्याप्रमाणे ज्या आज्ञेचा परिणाम जीवन व्हायचा तिचाच परिणाम मरण आहे असे माझ्या अनुभवास आले.
11कारण पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसवले व तिच्या योगे मला ठार केले.
12तरीपण नियमशास्त्र पवित्र आहे, आणि आज्ञा पवित्र, यथान्याय व उत्तम आहे.
13तर मग जे उत्तम ते मला मरण असे झाले काय? कधीच नाही! पाप ते पापच दिसावे, म्हणून जे उत्तम त्याच्या योगे ते माझ्या ठायी मरण घडवणारे असे झाले, आणि आज्ञेच्या योगे पाप पराकाष्ठेचे पापिष्ट व्हावे म्हणून असे झाले.
मनुष्याच्या दैहिक व आध्यात्मिक भावनांचा लढा
14कारण आपल्याला ठाऊक आहे की, नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे; मी तर दैहिक, पापाला विकलेला असा आहे.
15कारण मी काय करतो ते माझे मलाच कळत नाही; म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर जे मला द्वेष्य वाटते तेच करतो.
16जे मी इच्छीत नाही ते जर मी करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो.
17तर आता ह्यापुढे ते कर्म मीच करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप ते करते.
18कारण मला ठाऊक आहे की, माझ्या ठायी म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही; कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही.
19कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करत नाही; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो.
20जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो, तर ते कर्म मी करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप ते करते.
21तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो.
22माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो;
23तरी माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.
24किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?
25आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो. तर मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for रोमकरांस पत्र 7