YouVersion Logo
Search Icon

रोमकरांस पत्र 8

8
पवित्र आत्म्याप्रमाणे चालणे
1म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. [ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.]
2कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे.
3कारण नियमशास्त्र देहस्वभावामुळे दुर्बळ झाल्याकारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली;
4ह्यात उद्देश हा की, जे आपण देहस्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपल्यामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे.
5कारण जे देहस्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात; आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात.
6कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण; पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे.
7कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे; ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही, आणि त्याला तसे होता येत नाही.
8जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही.
9परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वसती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही.
10पण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे, तरी आत्मा नीतिमत्त्वामुळे जिवंत आहे.
11ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वसती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवले तो तुमच्यामध्ये वसती करणार्‍या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील.
12तर मग बंधुजनहो, आपण ऋणी आहोत खरे, तरी देहस्वभावाप्रमाणे जगायला देहस्वभावाचे ऋणी नाही;
13कारण जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात; परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल.
देवाचे पुत्र
14कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत.
15कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण “अब्बा! बापा!” अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे.
16तो आत्मा स्वत: आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहोत;
17आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत; आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दु:ख भोगत असलो तरच.
प्रकट होणारे वैभव
18कारण आपल्यासाठी1 जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो.
19कारण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे.
20कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणार्‍यामुळे.
21सृष्टीही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते.
22कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगत आहे.
23इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथमफळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठायी कण्हत आहोत.
24कारण आपण अशी आशा धरून तरलो; जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील?
25पण जे अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो.
पवित्र आत्म्याचे साहाय्य
26तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वत: अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो.
27आणि अंतर्यामे पारखणार्‍याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो.
28परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.
29कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले; ह्यात हेतू हा की, तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा.
30ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले; आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला.
ख्रिस्ताची व देवाची प्रीती
31तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?
32ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्वकाही कसे देणार नाही?
33देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे.
34तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे.
35ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय?
36शास्त्रात लिहिल्याप्रमाणे,
“तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे;
कापायच्या मेंढरासारखे आम्हांला गणले आहे.”
37उलटपक्षी, ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो.
38कारण माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले,
39उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for रोमकरांस पत्र 8