YouVersion Logo
Search Icon

2 करिंथ 10

10
प्रेषित म्हणून पौलाचा दावा
1मी पौल तुमच्यासमोर असताना तुमच्याशी लीनपणे व सौम्यतेने वागतो, परंतु दूर असताना तुमच्याशी कठोरपणे वागतो, असे म्हटले जाते. मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हांला विनंती करतो. 2माझे मागणे असे आहे: आम्ही देहस्वभावाने चालणारे आहोत, असे कित्येक लोक मानतात. असे लोक माझ्यासमोर आल्यावर त्यांच्याशी मला कडकपणे बोलावेसे वाटण्याचा संभव आहे. तेव्हा कडकपणाने बोलण्याचा प्रसंग माझ्यावर आणू नये. 3कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो. 4आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवाच्या सामर्थ्यशाली शस्त्रांनी तटबंदी जमीनदोस्त करण्यास आम्ही समर्थ आहोत. 5तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले सर्व अडसर पाडून टाकून प्रत्येक कल्पना बंदिस्त करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो 6आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल, तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करावयास आम्ही सिद्ध असू.
7तुम्ही बाह्य स्वरूप तेवढे पाहता. आपण ख्रिस्ताचे आहोत, असा जर कोणाला स्वतःविषयी भरवसा असेल, तर त्याने पुन्हा आमच्याविषयी स्वतःशी विचार करावा की, जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहेत. 8आमचा अधिकार प्रभूने तुमच्या नाशासाठी नव्हे तर उन्नतीसाठी आम्हांला दिला आहे, ह्याविषयी मी काहीशी जास्तच प्रौढी मिरवली आहे, तरी मला संकोच वाटत नाही. 9मी तुम्हांला पत्रांद्वारे भयभीत करून सोडतो, असे मला दाखवायचे नाही. 10कुणी म्हणेल, पौलाची पत्रे गंभीर व कडक आहेत. परंतु तो प्रत्यक्ष आमच्याबरोबर असताना दुर्बल असतो व त्याचे भाषण तिरस्करणीय असते. 11अशा माणसाने हे लक्षात ठेवावे की, आम्ही दूर असताना जे काही पत्रात लिहितो तेच आम्ही जवळ असताना करीत असतो.
12जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्यामध्ये आपली गणना करण्याचे अथवा त्यांच्याशी तुलना करण्याचे धाडस आम्ही करत नाही. ते तर स्वतःच स्वतःचे मोजमाप करतात व आपसांत एकमेकांशी तुलना करतात. हे सुबुद्धपणाचे नाही. 13आम्ही प्रतिष्ठा मिरविली, तर ती आपल्या मर्यादेबाहेर न मिरवता देवाने आम्हांला दिलेल्या सेवाकार्याच्या मर्यादेतच मिरवू. त्यात तुमच्यापर्यंत येऊन पोहचलेल्या आमच्या सेवाकार्याचा समावेश होतो. 14ख्रिस्ताचे शुभवर्तमान घेऊन पहिल्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो, तेव्हा आम्ही ह्या मर्यादेचे उलंघन करीत नव्हतो कारण ती मर्यादा तुमच्यापर्यंत पोहोचत होती. 15आम्ही मर्यादा सोडून म्हणजे दुसऱ्यांच्या श्रमासंबंधाने प्रतिष्ठा मिरवत नाही, तर तुमचा विश्वास वाढत जाईल, तसतसे आमच्या सेवाकार्याचे क्षेत्र तुमच्यामध्ये देवाने घालून दिलेल्या मर्यादेत अधिकाधिक वाढत जाईल, अशी आम्हांला आशा आहे. 16त्यानंतर तुमच्यापलीकडच्या देशांत शुभवर्तमान घोषित करणे आम्हांला शक्य होईल आणि दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात अगोदरच झालेल्या कामाची प्रतिष्ठा मिरवण्याची आम्हांला गरज भासणार नाही.
17परंतु असा धर्मशास्त्रलेख आहे, ‘जो प्रतिष्ठा मिरवतो, त्याने ती प्रभूविषयी मिरवावी’. 18आत्मप्रौढी करणाऱ्यांना मान्यता मिळत नाही, तर ज्यांची प्रभू शिफारस करतो, त्यांना मिळते.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in