2 करिंथ 11
11
प्रेषित म्हणून पौलाचा हक्व
1माझा थोडासा मूढपणा तुम्ही सहन केला तर बरे, खरे म्हणजे ते तुम्ही करीतच आहात. 2तुमच्याविषयीची माझी ईर्ष्या देवाच्या ईर्ष्येसारखी आहे. मी फक्त एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशा हेतूने की, तुम्हांला शुद्ध कुमारिका म्हणून ख्रिस्ताला सादर करावे. 3सापाने कपट करून ज्याप्रमाणे हव्वेला ठकवले, त्याप्रमाणे तुमची मने बिघडून ख्रिस्ताविषयी तुमची पूर्ण व शुद्ध आस्था भ्रष्ट होईल असे मला भय वाटते; 4कारण तुम्ही आनंदाने असा माणूस खपवून घेता जो, आम्ही ज्याची घोषणा केली नाही, अशा अन्य येशूची घोषणा करतो, किंवा तुम्ही स्वीकारलेल्या आत्म्यापेक्षा निराळा आत्मा तुम्ही स्वीकारता अथवा तुम्ही स्वीकारलेल्या शुभवर्तमानापेक्षा निराळे शुभवर्तमान स्वीकारता व सहजपणे तुम्ही त्याच्या आहारी जाता.
5परमश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नाही, असे मी मानतो. 6कदाचित मी भाषण करण्यात प्रवीण नसलो, तरी ज्ञानात कमी नाही, हे आम्ही तुम्हांला सर्वदा प्रत्येक परिस्थितीत दाखवून दिले आहे.
7तुम्ही महान व्हावे म्हणून मी स्वतःला लीन करून देवाचे वचन विनामूल्य तुम्हाला सांगितले, हे मी पाप केले काय? 8मी तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या ख्रिस्तमंडळ्यांपासून वेतन घेऊन त्यांना जणू काही लुटले 9आणि मी तुमच्याजवळ असता मला उणे पडले, तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही. मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला भासलेली उणीव भरून काढली आणि कोणत्याही प्रकारे तुमच्यावर माझा भार पडू नये म्हणून मी स्वतःला सांभाळले व सांभाळेन! 10माझ्यातील ख्रिस्ताच्या सत्याला स्मरून मी सांगतो की, माझा हा अभिमान संपूर्ण अखया प्रांतात कुठेही नाकारला जाणार नाही. 11मी तुमच्यावर प्रीती करीत आहे म्हणून मी हे बोलत आहे. देवाला ठाऊक आहे की, मी तुमच्यावर प्रीती करतो.
12जे मी आत्ता करतो, ते मी करत राहीन, ज्यामुळे त्या दुसऱ्या प्रेषितांना आम्ही त्यांच्यासारखेच सेवाकार्य करतो अशी बढाई मारण्याची व असे बोलण्याची सबब मिळू नये. 13हे बढाई मारणारे तोतये प्रेषित, फसवेगिरी करणारे कामगार आणि ख्रिस्ताचे प्रेषित असल्याचे सोंग घेणारे आहेत. 14ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूतांचे सोंग घेतो! 15म्हणून त्याच्या हस्तकांनीही नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग घेतले, तर ती फार मोठीशी गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कृत्यांना साजेसा होईल.
पौल व त्याचे विरोधक ह्यांची तुलना
16मी पुन्हा म्हणतो, कोणी मला मूढ समजू नये. जर तुम्ही तसे समजत असाल, तर निदान जसा मूढाचा तसा माझा स्वीकार करा, म्हणजे मीही थोडीशी प्रौढी मिरवीन. 17अर्थात मी जे बोलतो, ते प्रभूला अनुसरून नव्हे, तर प्रौढीला अनुसरून मूढपणाने बोलल्याप्रमाणे बोलतो. 18देहस्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात म्हणून मीही प्रौढी मिरवणार. 19तुम्ही सुज्ञ आहात म्हणून आनंदाने मूढाचे सहन करता! 20कोणी तुमच्यावर सत्ता चालविली किंवा तुमचा गैरफायदा घेतला किंवा कोणी तुमच्याविरुद्ध डावपेच रचले किंवा तुम्हांला हीन लेखले किंवा कोणी तुमच्या थोबाडात मारले, तर ते सगळे तुम्ही सहन करता.
पौलाने सोसलेली संकटे
21ही गोष्ट मान्य करायला मला शरम वाटते की, अशा गोष्टी करायला आम्ही फारच भित्रे होतो! 22ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्राएली आहेत काय? मीही आहे. 23ते अब्राहामचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे! (हे मी वेडगळासारखे बोलतो). मी अधिक कठोर परिश्रम केले आहेत. मी अधिक वेळा तुरुंगवास भोगला आहे. मी अगणित फटके खाल्ले आहेत. मी पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत सापडलो होतो - या सर्वांमुळे मी अधिक प्रमाणात ख्रिस्ताचा सेवक आहे. 24पाच वेळा मी यहुदी लोकांच्या हातून चाबकाचे एकोणचाळीस फटके खाल्ले. 25तीन वेळा रोमन लोकांकडून छड्यांचा मार खाल्ला. एकदा माझ्यावर दगडफेक झाली. तीन वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालविली. 26मी किती तरी प्रवास केला. पुरांमुळे आलेली संकटे, लुटांरूमुळे आलेली संकटे, माझ्या यहुदी देशबांधवांनी आणलेली संकटे, यहुदीतरांनी आणलेली संकटे; 27श्रम व कष्ट, किती तरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, अन्नवस्र व निवारा याविना काढलेले दिवस ह्या सर्वांमुळे मी अधिक प्रमाणात ख्रिस्ताचा सेवक आहे. 28शिवाय ह्या व अशा इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे ओझे, म्हणजे सर्व ख्रिस्तमंडळ्यांविषयी चिंता, ही आहे. 29एखादा दुर्बळ असला, तर मलाही दुर्बलता जाणवते आणि जर एखाद्याला पाप करण्याकरिता प्रवृत्त करण्यात आले, तर मला क्लेश होत नाहीत काय?
30जर मला प्रौढी मिरवणे भाग पडले तर मी माझ्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवीन. 31प्रभू येशूचा देव व पिता, जो युगानुयुगे कृपावंत आहे त्याला ठाऊक आहे की, मी खोटे बोलत नाही. 32मी दिमिष्क येथे होतो, तेव्हा अरीतास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला धरण्याकरता त्या नगरावर रक्षक नेमले होते. 33परंतु मला पाटीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले आणि त्याच्या हातातून मी निसटलो.
Currently Selected:
2 करिंथ 11: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.