YouVersion Logo
Search Icon

योहान 11

11
मृत लाजरला जीवनदान
1बेथानी ह्या गावी लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण मार्था ह्यांचे हे गाव होते. 2हा आजारी पडलेला लाजर ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेलाचा अभिषेक केला होता व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले होते, तिचा भाऊ होता. 3त्या बहिणींनी येशूकडे निरोप पाठवला, “प्रभो, तुमचा प्रिय मित्र आजारी आहे.”
4ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नव्हे, तर देवाच्या गौरवासाठी आहे, म्हणजे त्यामुळे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा.”
5मार्था, तिची बहीण व लाजर ह्यांच्यावर येशूची प्रीती होती. 6तो आजारी आहे, हे येशूने ऐकले, तरी तो होता त्याच ठिकाणी आणखी दोन दिवस राहिला. 7त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण पुन्हा यहुदियात जाऊ या.”
8शिष्य त्याला म्हणाले, “गुरुजी, तेथील लोक अलीकडेच तुमच्यावर दगडमार करू पहात होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाणार का?”
9येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास असतात की नाही? जो दिवसा चालतो त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला ह्या पृथ्वीवरचा उजेड दिसतो. 10परंतु तो रात्री चालला तर त्याला ठेच लागते, कारण तेव्हा उजेड नसतो.” 11हे बोलल्यावर तो त्यांना पुढे म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवायला जाणार आहे.”
12शिष्य त्याला म्हणाले, “प्रभो, त्याला झोप लागली असेल, तर त्याला बरे वाटेल.”
13येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, परंतु तो झोपेत विसावा घेण्याविषयी बोलत आहे, असे त्यांना वाटले. 14म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, “लाजर मरण पावला आहे.” 15तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून मी तेथे नव्हतो, ह्याचा मला आनंद वाटतो. चला, आपण त्याच्याकडे जाऊ.”
16तेव्हा ज्याला दिदुम म्हणजे जुऴा म्हणत तो थोमा आपल्या जोडीदार शिष्यांना म्हणाला, “आपणही त्याच्याबरोबर मरायला जाऊ!”
17येशू बेथानीला आला तेव्हा त्याला कळले की, लाजरला कबरीत ठेवून चार दिवस झाले होते. 18बेथानी यरूशलेमपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर होते 19आणि पुष्कळ यहुदी लोक मार्था व मरिया ह्यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यासाठी तेथे आले होते.
20येशू येत आहे, हे ऐकताच मार्था बाहेर जाऊन त्याला भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. 21मार्था येशूला म्हणाली, “प्रभो, तुम्ही येथे असता, तर माझा भाऊ मरण पावला नसता. 22परंतु आतादेखील जे काही आपण देवाकडून मागाल, ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.”
23येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”
24मार्था त्याला म्हणाली, “तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या वेळी पुन्हा उठेल, हे मला ठाऊक आहे.”
25येशूने तिला म्हटले, “मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला तरी जगेल. 26आणि जिवंत असलेला जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, तो कधीही मरणार नाही, असा तुझा विश्‍वास आहे का?”
27ती त्याला म्हणाली, “हो प्रभो, माझा विश्‍वास आहे की, जो जगात येणारा देवाचा पुत्र आहे तो ख्रिस्त तुम्ही आहात.”
28असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरिया हिला एकीकडे बोलावून म्हणाली, “गुरुजी आले आहेत आणि ते तुला बोलावत आहेत.” 29हे ऐकताच ती लगेच उठून त्याच्याकडे गेली. 30येशू अजून गावात आला नव्हता पण मार्था त्याला भेटली त्या ठिकाणीच तो होता. 31जे लोक मरियेजवळ घरात होते व तिचे सांत्वन करत होते, त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिले आणि ती शोक करायला कबरीकडे जात आहे, असे समजून ते तिच्या मागे गेले.
32येशू होता तेथे मरिया गेली आणि त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभो, तुम्ही येथे असता, तर माझा भाऊ आम्हांला सोडून गेला नसता.”
33येशूने तिला व तिच्याबरोबर आलेल्या लोकांना रडताना पाहिले तेव्हा तो आत्म्यात कळवळला व व्याकूळ होऊन म्हणाला, 34“तुम्ही त्याला कुठे ठेवले आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभो, येऊन पाहा.”
35येशू रडला. 36हे पाहून लोक म्हणाले, “पाहा, ह्याची त्याच्यावर किती प्रीती होती!”
37परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला ह्याचे मरण टाळता आले नसते काय?”
38येशू पुन्हा मनात कळवळून कबरीकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर शिळा ठेवलेली होती. 39येशूने म्हटले, “शिळा बाजूला सारा.” मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, “प्रभो, एव्हाना दुर्गंधी येत असेल कारण त्याला थडग्यात ठेवून चार दिवस झाले आहेत.”
40येशूने म्हटले, “तू विश्वास ठेवलास तर देवाचे वैभव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते का?” 41हे ऐकून त्यांनी शिळा बाजूला सारली. येशूने दृष्टी वर करून म्हटले, “हे पित्या, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. 42मला माहीत आहे की, तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी पण जे लोक सभोवती उभे आहेत त्यांचा तू मला पाठवले आहेस ह्यावर विश्वास बसावा, म्हणून मी हे बोललो.” 43असे बोलून झाल्यावर त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, “लाजर, बाहेर ये!” 44तेव्हा मृत मनुष्य बाहेर आला. त्याचे हातपाय कापडाने बांधलेले व तोंड रुमालाने गुंडाळलेले होते. येशूने लोकांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.”
45मरियेकडे आलेल्या यहुदी लोकांपैकी पुष्कळ जणांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवली. 46परंतु काही लोकांनी परुश्यांकडे जाऊन येशूने काय केले ते सांगितले.
येशूला ठार मारण्याचा बेत
47तेव्हा मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवली आणि म्हटले, “आपण काय करणारआहोत? पाहा, तो मनुष्य पुष्कळ चिन्हे करीत आहे! 48आपण त्याला असेच सोडले, तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमन लोक येऊन आपले पवित्र स्थान व राष्ट्रही बळकावतील.”
49त्यांच्यापैकी कयफा नावाचा एक मनुष्य जो त्या वर्षी उच्च याजक होता, त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच कळत नाही. 50प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश टळावा, हे तुमच्या हिताचे आहे, हेदेखील तुमच्या लक्षात येत नाही का?” 51खरे म्हणजे हे तो आपल्या मनातले बोलला नाही, तर त्या वर्षी तो उच्च याजक होता म्हणून त्याने भाकीत केले की, येशू राष्ट्राकरता मरणार होता 52आणि केवळ त्या राष्ट्रासाठीच नव्हे तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांना जमवून एकत्र करावे ह्याकरता तो मरणार होता.
53त्या दिवसापासून यहुदी अधिकाऱ्यांनी त्याला ठार मारण्याचा आपसात बेत रचला. 54म्हणूनच येशू तेव्हापासून यहुदियामध्ये उघडपणे फिरला नाही, तर तेथून रानाजवळच्या प्रांतातील एफ्राईम नावाच्या नगरात गेला आणि तेथे आपल्या शिष्यांसह राहिला.
55त्या वेळी यहुदी लोकांचा ओलांडण सण जवळ आला होता आणि पुष्कळ लोक ओलांडण सणाच्या आधी आपल्याला शुद्ध करून घेण्यासाठी बाहेरगावाहून यरुशलेमला गेले. 56ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे असताना एकमेकांना म्हणत होते, “तुम्हांला काय वाटते? तो सणासाठी येणार नाही का?” 57मुख्य याजकांनी व परुश्यांनी तर त्याला अटक करण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की, तो कुठे आहे, हे कोणाला कळल्यास त्याने त्यांना खबर द्यावी.

Currently Selected:

योहान 11: MACLBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in