योहान 12
12
येशूला तेलाचा अभिषेक
1ओलांडण सणाच्या सहा दिवस आधी येशू बेथानीस आला. ज्या लाजरला येशूने मेलेल्यांतून उठवले होते, तो तेथे राहत होता. 2म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी भोजन आयोजित केले. मार्था वाढत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता. 3मरियेने अर्धा लिटर शुद्ध जटामांसीचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि स्वतःच्या केसांनी त्याचे चरण पुसले, तेव्हा त्या तेलाचा सुगंध घरभर दरवळला. 4मात्र जो त्याचा विश्वासघात करणार होता, तो म्हणजे त्याच्या शिष्यांपैकी यहुदा इस्कर्योत म्हणाला, 5“हे सुगंधी तेल तीनशे चांदीच्या नाण्यांना विकून ती रक्कम गरिबांना का दिली नाही?” 6त्याला गरिबांविषयी कळवळा होता म्हणून तो हे म्हणाला असे नव्हे तर तो चोर होता आणि त्याच्याजवळ पैशाची थैली होती व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे म्हणाला.
7परंतु येशूने म्हटले, “तिच्याजवळ जे आहे, ते तिला माझ्या अंत्यसंस्काराच्या दिवसासाठी ठेवू द्या. 8कारण गरीब नेहमी तुमच्याबरोबर आहेत. परंतु मी तुमच्याबरोबर नेहमी असेन असे नाही.”
9तो तेथे आहे, असे पुष्कळ यहुदी लोकांना कळले आणि केवळ येशूकरता नव्हे, तर ज्या लाजरला त्याने मेलेल्यांतून उठवले होते, त्याला पाहण्याकरता लोक तेथे आले. 10म्हणून मुख्य याजकांनी लाजरलाही ठार मारण्याचा निश्चय केला; 11कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून गेले आणि येशूवर विश्वास ठेवू लागले.
यरुशलेममध्ये येशूचा जयोत्सवाने प्रवेश
12सणास आलेल्या पुष्कळ लोकांनी येशू यरुशलेममध्ये येत आहे, असे दुसऱ्या दिवशी ऐकले. 13ते खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करत म्हणाले, “होसान्ना! देवाचा गौरव असो! प्रभूच्या नावाने येणारा इस्राएलचा राजा धन्य असो!”
14येशूला शिंगरू मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला कारण धर्मशास्त्रलेख असा आहे:
15हे सीयोनकन्ये, भिऊ नकोस.
पाहा, तुझा राजा
गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.
16प्रथम ह्या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नाहीत. परंतु येशूचा गौरव झाल्यावर त्यांना आठवले की, हे त्याच्याविषयी लिहिले होते आणि त्याप्रमाणे लोकांनी त्याच्यासाठी हे केले.
17येशूने लाजरला कबरीतून बोलावून मेलेल्यांतून उठवले, त्या वेळी जे लोक त्याच्याबरोबर होते, त्यांनी त्याबद्दल साक्ष दिली होती. 18ह्यामुळेही लोक त्याला भेटायला गेले कारण त्याने हे चिन्ह केले होते, असे त्यांनी ऐकले. 19परुशी एकमेकांना म्हणाले, “आपले काही चालत नाही, हे लक्षात घ्या. पाहा, सगळे जग त्याच्यामागे चालले आहे.”
ग्रीक लोकांची विनंती
20सणात उपासना करायला आलेल्या लोकांपैकी काही ग्रीक होते. 21त्यांनी गालीलमधील बेथसैदा येथील फिलिप ह्याच्याजवळ येऊन विनंती केली, “महाशय, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे.”
22फिलिपने येऊन अंद्रियाला सांगितले आणि अंद्रिया व फिलिप ह्यांनी येऊन येशूला सांगितले.
येशूच्या गौरवाची वेळ
23येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे. 24मी तुम्हांला खातरी पूर्वक सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. 25जो आपल्या जिवावर प्रेम करतो, तो त्याला मुकेल आणि जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो, तो त्याला शाश्वत जीवनासाठी राखील. 26जर कोणाला माझी सेवा करायची असेल, तर त्याने मला अनुसरणे आवश्यक आहे. म्हणजे जेथे मी आहे, तेथे माझा सेवकही असेल. जो कोणी माझी सेवा करतो, त्याचा सन्मान माझा पिता करील.
27आता माझा जीव व्याकूळ झाला आहे. मी काय बोलू? हे पित्या, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर, असे म्हणू काय? परंतु या घटकेला सामोरे जाण्यासाठीच तर मी आलो आहे. 28हे पित्या, तू स्वतःच्या नावाचा गौरव कर.” तेव्हा अशी आकाशवाणी झाली, “मी त्याचा गौरव केला आहे आणि पुन्हाही करीन.”
29तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, “मेघगर्जना झाली.” दुसरे म्हणाले, “त्याच्याबरोबर देवदूत बोलला.”
30परंतु येशूने उत्तर दिले, “ही वाणी माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी झाली आहे. 31आता ह्या जगाचा न्याय होत आहे. आता ह्या जगाचा सत्ताधीश बाहेर फेकला जाईल. 32मला पृथ्वीपासून उंच केले, तर मी सर्वांना माझ्याकडे ओढून घेईन.” 33कोणत्या मरणाने आपण मरणार हे सुचवण्याकरता तो असे बोलला.
34लोकांनी त्याला विचारले, “ख्रिस्त सर्वकाळ राहील, असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे. तर मग मनुष्याच्या पुत्राला उंच केले गेले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?”
35येशूने त्यांना उत्तर दिले, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश असेल, तुम्हांला अंधकाराने गाठू नये म्हणून तुमच्याकडे प्रकाश आहे तोपर्यंत चालत राहा. जो अंधकारात चालतो त्याला आपण कुठे जातो, हे कळत नाही. 36तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुमच्याजवळ प्रकाश असताना प्रकाशावर विश्वास ठेवा.” येशू ह्या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला.
37त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असतानाही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. 38हे ह्यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते, ते पूर्ण व्हावे, ते असे:
प्रभो, आम्ही सांगितलेल्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे?
परमेश्वराचे सामर्थ्य
कोणाला प्रकट झाले आहे?
39तसेच त्यांना विश्वास ठेवता आला नाही, कारण यशया आणखी म्हणाला:
40त्यांनी डोळ्यांनी पाहू नये,
अंतःकरणाने समजू नये,
माझ्याकडे वळू नये
व मी त्यांना बरे करू नये,
म्हणून देवाने त्यांचे डोळे आंधळे
व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे.
41यशयाने येशूचे वैभव पाहिले म्हणून त्याच्याविषयी तो असे बोलला.
42असे असूनही अधिकाऱ्यांपैकीदेखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तरी पण आपण सभास्थानातून बहिष्कृत होऊ नये म्हणून परुश्यांमुळे ते तसे उघडपणे कबूल करत नव्हते. 43त्यांना देवाकडून मिळणाऱ्या प्रशंसेपेक्षा मनुष्यांकडून मिळणारी प्रशंसा अधिक प्रिय वाटत होती.
येशूच्या सार्वजनिक प्रबोधनाचा सारांश
44येशू आवर्जून म्हणाला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो, तो केवळ माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर ज्याने मला पाठवले त्याच्यावरही ठेवतो, 45जो मला पाहतो, तो ज्याने मला पाठवले त्यालाही पाहतो. 46जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याने अंधकारात राहू नये ह्यासाठी मी जगात प्रकाश म्हणून आलो आहे. 47जो माझी वचने ऐकतो पण ती पाळत नाही, त्याचा न्याय मी करत नाही; कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. 48जो माझा अव्हेर करतो व माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही, त्याचा न्याय करणारा कोणी तरी आहे. जे वचन मी सांगितले, तेच शेवटच्या दिवशी त्याचा न्याय करील. 49कारण मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे ह्याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे 50आणि त्याची आज्ञा शाश्वत जीवन आहे, हे मला ठाऊक आहे, म्हणून जे काही मी बोलतो, ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”
Currently Selected:
योहान 12: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.