YouVersion Logo
Search Icon

1 योहान 2

2
1माझ्या प्रिय मुलांनो, मी तुम्हासाठी हे लिहित आहे यासाठी की तुम्ही पाप करू नये, परंतु जर कोणी पाप करतो, तर आपल्यासाठी एक कैवारी येशू ख्रिस्त, जे नीतिमान आहेत आणि ते पित्याजवळ आहेत. 2तेच आपल्या पापांसाठी प्रायश्चिताचा यज्ञ आहेत आणि केवळ आपल्यासाठीच नाही तर सर्व जगाच्या पापांसाठीसुद्धा आहेत.
सहविश्वासणार्‍यांचे प्रेम आणि द्वेष
3आपल्याला हे माहीत आहे की, जर आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळतो तर आपल्याला त्यांची ओळख झाली आहे. 4जो कोणी असे म्हणतो, “मी त्यांना ओळखतो,” परंतु त्यांच्या आज्ञांचे पालन करीत नाही तर तो लबाड आहे आणि सत्य त्या व्यक्तीमध्ये नाही. 5परंतु जर कोणी त्यांचे वचन पाळतो, तर परमेश्वरासाठी त्याची प्रीती खरोखर त्यांच्यामध्ये पूर्ण झाली आहे. यावरून आपणास समजते की आपण त्यांच्यामध्ये आहोत. 6जो कोणी असा दावा करतो की तो त्यांच्यामध्ये राहतो, त्याने जसे येशू राहिले तसे राहिले पाहिजे.
7प्रिय बंधूंनो, मी काही तुम्हाला नवीन आज्ञा लिहून देत आहे असे नाही, तर ही जुनीच आहे, जी सुरुवातीपासून दिलेली आहे. ही जुनी आज्ञा जो एक संदेश आहे तो तुम्ही ऐकलेला आहे, 8तरी मी तुम्हास एक नवी आज्ञा लिहित आहे; तिचे सत्य त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये दिसून येत आहे, कारण अंधकार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आताच प्रज्वलित झाला आहे.
9जर कोणी प्रकाशामध्ये आहे असा दावा करतो, परंतु आपल्या बंधू किंवा भगिनीचा द्वेष करतो तर तो अजूनही अंधकारातच आहे. 10जो कोणी आपल्या बंधू आणि भगिनीवर प्रीती करतो तो प्रकाशात राहतो आणि त्याच्यामध्ये असे काहीच नाही की ज्यामुळे ते अडखळतील. 11परंतु जर कोणी आपल्या बंधू व भगिनीचा द्वेष करतो, तो अंधकारात राहतो आणि अंधारात चालतो. ते कुठे जातात हे त्यांना कळत नाही, कारण अंधाराने त्यांना आंधळे केले आहे.
लिहिण्याची कारणे
12माझ्या प्रिय मुलांनो, मी तुम्हाला लिहित आहे,
कारण येशूंच्या नावामुळे तुमच्या पातकांची क्षमा झाली आहे.
13पित्यांनो मी तुम्हाला लिहित आहे,
कारण जे आरंभापासून आहेत त्यांना तुम्ही ओळखता.
तरुणांनो, मी तुम्हाला लिहित आहे,
कारण तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळविला आहे.
14प्रिय मुलांनो मी तुम्हाला लिहितो,
कारण तुम्ही पित्याला ओळखता.
वडिलांनो मी तुम्हाला लिहितो,
कारण तुम्ही त्यांना ओळखता जे सुरुवातीपासून आहेत.
तरुणांनो मी तुम्हाला लिहितो,
कारण तुम्ही सशक्त आहात
आणि परमेश्वराचे वचन तुम्हामध्ये राहते,
आणि तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळविला आहे.
जगावर प्रेम करू नये यासाठी
15जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करतात तर त्यांच्यामध्ये पित्यासाठी प्रीती वसत नाही. 16कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे, देहाची वासना, डोळ्याची वासना व जीवनाचा गर्व या सर्वगोष्टी पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. 17जग आणि त्याच्या सर्व वासना नाहीशा होतील, परंतु जी व्यक्ती परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करते, ती सदासर्वकाळ जगते.
ख्रिस्तविरोधकापासून सावध राहणे
18प्रिय मुलांनो, ही शेवटची घटका आहे; आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधक येत आहे आणि आतासुद्धा अनेक ख्रिस्तविरोधक आलेले आहेत. यावरूनच आपणास समजते की ही शेवटची घटका आहे. 19ते आपल्यामधूनच बाहेर पडले आहेत, परंतु ते खरोखर आपले नव्हतेच. कारण ते जर आपल्यातील असते तर ते आपल्याबरोबर राहिले असते; परंतु ते गेल्याने हे सिद्ध झाले की त्यांच्यापैकी कोणीही आपल्यातील नव्हता.
20परंतु जे पवित्र ख्रिस्त येशू आहेत, त्यांच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे आणि तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे. 21तुम्हाला सत्य माहीत नाही म्हणून मी तुम्हास लिहितो असे नाही, परंतु ते तुम्हाला माहीत आहे आणि सत्याचा उगम असत्यापासून होत नाही. 22लबाड कोण आहे? जो कोणी येशू हे ख्रिस्त आहे हे नाकारतो तो. असा मनुष्य ख्रिस्तविरोधक आहे, पिता आणि पुत्र यांना तो नाकारतो. 23जो पुत्राला स्वीकारीत नाही त्याच्याजवळ पिता नाही; जो कोणी पुत्राला स्वीकारतो त्याच्याजवळ पितासुद्धा आहे.
24तुम्ही तर हे लक्षात ठेवा की, तुम्ही जे काही सुरुवातीपासून ऐकले आहे ते तुम्हामध्ये राहते. ते जर तुम्हामध्ये राहते, तर तुम्ही सुद्धा पुत्र आणि पित्यामध्ये स्थिर राहाल. 25त्यांनी आपल्याला सार्वकालिक जीवन देण्याचे अभिवचन दिले आहे.
26तुम्हाला भ्रमात पाडून बहकविण्याचा जे प्रयत्न करीत आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हास लिहित आहे. 27प्रभूपासून जो अभिषेक तुम्हाला मिळाला आहे तो तुम्हावर राहतो; आणि तुम्हाला कोणी शिकविण्याची गरज नाही. त्यांचा अभिषेक तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवेल. त्यांचा अभिषेक खोटा नाही तर सत्य आहे, जसे त्यांनी तुम्हाला शिकविले आहे तसे त्यांच्यामध्ये राहा.
परमेश्वराची मुले आणि पाप
28आता प्रिय मुलांनो, सतत त्यांच्यामध्ये राहा, म्हणजे ते प्रकट होतील त्यावेळी आपण आत्मविश्वासपूर्वक असावे आणि त्यांच्या येण्याच्या दिवशी त्यांच्यासमोर आपणास लज्जित व्हावे लागणार नाही.
29जर तुम्हाला माहीत आहे की ते नीतिमान आहेत, तर तुम्हाला हे माहीत आहे की, प्रत्येकजण जे काही चांगले करतात तो त्यांच्यापासून जन्मला आहे.

Currently Selected:

1 योहान 2: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in