प्रेषित 23
23
1मग न्यायसभेकडे निरखून पाहत पौल म्हणाला, “माझ्या बंधूंनो, मी आजपर्यंत माझे परमेश्वरा संबंधीचे कर्तव्य पूर्ण सदसद्विवेकबुद्धीने करीत आलो आहे.” 2यावेळी महायाजक हनन्याहने पौलाच्याजवळ असलेल्या लोकांना त्याच्या तोंडावर चापट मारण्याचा हुकूम केला. 3तेव्हा पौल त्याला म्हणाला, “हे चुन्याचा लेप लावलेल्या भिंती, परमेश्वर तुझ्यावर वार करतील! तू येथे नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करतो, परंतु तू स्वतः नियमशास्त्राचा भंग करून माझ्यावर वार करण्याची आज्ञा देतोस काय!”
4पौलाच्या शेजारी जे उभे होते ते त्याला म्हणाले, “तू परमेश्वराच्या महायाजकाचा अपमान करण्याचे धैर्य कसे केले!”
5पौलाने उत्तर केले, “बंधूंनो, तो महायाजक आहे, हे मला माहीत नव्हते; असे लिहिले आहे: ‘तुमच्या लोकांच्या पुढार्यांपैकी कोणाला कधीही वाईट बोलू नकोस.’ ”#23:5 निर्ग 22:28
6नंतर पौलाला, समजले की तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये काही सदूकी आहेत आणि इतर परूशी आहेत, तेव्हा पौल न्यायसभेच्या समोर म्हणाला, “बंधूंनो, माझे पूर्वज परूशी होते, त्यांच्याप्रमाणे मी परूशी आहे आणि माझी आशा व मृतांचे पुनरुत्थान यामुळे माझी चौकशी होत आहे.” 7तो हे बोलला तेव्हा परूशी व सदूकी यांच्यात कलह होऊन सभेत फूट पडली. 8कारण सदूकी लोक म्हणत की पुनरुत्थान नाही, देवदूत नाहीत आणि आत्मेही नाहीत, परंतु परूश्यांचा या सर्वांवर विश्वास होता.
9तेव्हा मोठा गोंधळ सुरू झाला, काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परूशी होते ते उठून उभे राहिले आणि जोरजोराने वादविवाद करू लागले. “आम्हाला या मनुष्यात काही अयोग्य असे आढळत नाही, ते म्हणाले, जर त्याच्याशी कदाचित एखादा आत्मा किंवा देवदूत बोलला असेल तर कसे समजावे?” 10वादाने उग्र स्वरूप धारण केले, सरतेशेवटी सेनापतीला भीती वाटली की ते पौलाचे फाडून तुकडे करतील. तेव्हा त्याने त्याच्या सैनिकांना हुकूम दिला की, त्यांनी खाली जाऊन त्याला त्यांच्यापासून जबरदस्तीने दूर करावे आणि पुन्हा बराकीत घेऊन यावे.
11त्याच रात्री प्रभू पौलाजवळ उभा राहिले आणि त्याला म्हणाले, “धैर्य धर! येथे यरुशलेममध्ये तू माझ्याविषयी लोकांना जशी साक्ष दिलीस, तशीच साक्ष तुला रोममध्येही द्यावीच लागणार आहे.”
पौलाला मारण्याचा कट
12मग दुसर्या दिवशी सकाळी काही यहूद्यांनी कट करून शपथ घेतली की पौलाचा वध करेपर्यंत ते अन्न व पाणी सेवन करणार नाहीत. 13चाळीस किंवा त्याहून अधिक यहूदी या कटकारस्थानामध्ये सामील झाले. 14नंतर ते महायाजक व वडीलजनांकडे गेले आणि म्हणाले, “पौलाचा वध करेपर्यंत आम्ही अन्न सेवन करणार नाही, अशी कडक शपथ आम्ही घेतली आहे. 15तर आता, त्याच्याविषयी आणखी काही विचारपूस बारकाईने करावयाची आहे, या निमित्ताने त्याला आपणाकडे आणावे असे तुम्ही व न्यायसभेने सेनापतीला सुचवावे. तो येथे येण्यापूर्वी त्याला ठार करण्याच्या तयारीत आम्ही आहोत.”
16परंतु पौलाच्या बहिणीच्या मुलाला त्यांचा हा कट समजला, तेव्हा बराकीत जाऊन त्याने पौलाला तसे कळविले.
17तेव्हा पौलाने शताधिपतींपैकी एकाला बोलाविले व त्याला म्हणाला, “या तरुणाला सेनापतीकडे ने; या तरुणाला काहीतरी सांगावयाचे आहे.” 18म्हणून त्याला सेनापतीकडे नेले.
शताधिपती म्हणाला, “बंदिवान पौलाने, या मुलाला आपणास काही महत्त्वाचे सांगावयाचे आहे म्हणून आपणाकडे आणावे, अशी विनंती केली.”
19तेव्हा सेनापतीने त्या तरुण मुलाचा हात धरून त्यास बाजूला नेऊन विचारले, “तुला मला काय सांगावयाचे आहे?”
20तो म्हणाला: “पौलाकडून आणखी अधिक माहिती हवी आहे असे निमित्त सांगून उद्या आपण त्याला न्यायसभेपुढे आणावे, अशी विनंती काही यहूदी आपल्याला करणार आहेत. 21परंतु आपण त्याकडे कृपया लक्ष देऊ नका, कारण चाळिसांहून अधिक जण त्याला ठार करण्यासाठी वाटेवर टपून बसलेली आहेत. त्याचा वध करेपर्यंत अन्न आणि पाणी सेवन करावयाचे नाही असा त्यांनी निर्णय घेतला आहे व आपण त्यांची विनंती मान्य कराल, ही त्यांची आशा आहे.”
22तेव्हा सेनापतीने, “तू मला हे सांगितले आहेस हे कोणालाही कळू देऊ नकोस.” असा इशारा देऊन त्या तरुणाला पाठवून दिले.
पौलाला कैसरीयास पाठवितात
23त्यानंतर त्याने आपल्या दोन शताधिपतींना बोलाविले व त्यांना हुकूम दिला, “आज रात्री नऊ वाजता कैसरीयास जाण्यासाठी दोनशे सैनिक, सत्तर घोडेस्वार आणि दोनशे भालेकरी तयार ठेव. 24पौलाला प्रवासासाठी घोडे द्या व त्याला राज्यपाल फेलिक्स यांच्याकडे बंदोबस्ताने सुरक्षित न्या.”
25मग त्याने असे पत्र लिहिले:
26महाराज, राज्यपाल फेलिक्स यास:
क्लौडियस लुसियाचा:
सलाम.
27या मनुष्याला यहूदी लोकांनी पकडले होते व ते त्याला ठार मारणार होते, तेव्हा तो रोमी नागरिक आहे हे समजल्यानंतर त्याला सोडविण्यासाठी मी सैनिक पाठविले. 28त्यांनी काय दोषारोप केला आहे हे समजून घ्यावयाचे होते म्हणून मी त्याला न्यायसभेपुढे आणले. 29मला लवकरच समजून आले की त्यांच्यातील वाद हा नियमांविषयी होता आणि त्याबद्दल त्याला तुरुंगवास अथवा मरणाची शिक्षा देता येणार नाही. 30परंतु या माणसाविरुद्ध कट रचण्यात येऊन तो अंमलात येण्याची शक्यता आहे असे मला समजले, तेव्हा त्याला ताबडतोब आपणाकडे पाठविले. त्याच्यावर आरोप करणार्यांनी ते तुमच्यासमोर मांडावेत असा मी त्यांना हुकूम केला.
31म्हणून सैनिकांनी, हुकुमाप्रमाणे पौलाला घेऊन त्याच रात्री अंतिपत्रिसापर्यंत पोहोचविले. 32दुसर्या दिवशी त्याच्याबरोबर पुढे जाण्यास घोडदळाला त्याच्याबरोबर ठेऊन ते आपल्या बराकीत परतले. 33ते घोडदळ कैसरीयास पोहोचले, तेव्हा त्यांनी ते पत्र राज्यपालांपुढे सादर केले आणि पौलाला त्याच्या स्वाधीन केले. 34राज्यपालांनी पत्र वाचले आणि तो कोणत्या प्रांताचा आहे, असे विचारले. तो किलिकियाचा आहे, असे त्यास समजल्यावर, 35राज्यपालांनी पौलाला सांगितले, “तुझ्यावर आरोप करणारे येथे आले की मी तुझे हे प्रकरण ऐकून घेईन.” नंतर राज्यपालांनी पौलाला हेरोदाच्या राजवाड्यातील पहार्यात ठेवण्याचा हुकूम दिला.
Currently Selected:
प्रेषित 23: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.