YouVersion Logo
Search Icon

प्रेषित 24

24
फेलिक्स राज्यपालापुढे पौलाची चौकशी
1पाच दिवसानंतर महायाजक हनन्याह काही वडीलजनांसह तिर्तुल्लस नावाच्या वकीलास बरोबर घेऊन कैसरीयाला गेले आणि त्यांनी पौलाविरुद्ध केलेले त्यांचे आरोप राज्यपालापुढे सादर केले. 2पौलाला आत बोलाविण्यात आले, तेव्हा तिर्तुल्लसाने त्याचे आरोपपत्र फेलिक्ससमोर सादर केले: “आपल्या कारकिर्दीत आम्हास: दीर्घकाल शांती लाभलेली आहे आणि तुमच्या दूरदृष्टीमुळे आमच्या देशात समाज सुधारणा झाल्या आहेत. 3यामुळे आम्ही सर्वठिकाणी आणि प्रत्येक प्रकारे कृतज्ञतेने व मनापासून स्वागत करतो आणि श्रेष्ठ फेलिक्स आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. 4आपणास कंटाळा येणार नाही अशा रीतीने, मी माझे म्हणणे आपणापुढे मांडणार आहे, तेव्हा कृपा करून आपण माझे भाषण ऐकून घ्यावे, अशी आपणास विनंती आहे.
5“हा मनुष्य त्रासदायक असल्याचे आम्हास आढळून आले आहे तो अवघ्या जगातील सर्व यहूदीयांना बंड करण्यास चिथावीत असतो. नासरेथकर पंथाचा हा पुढारी आहे 6हा मंदिर अपवित्र करण्याचा प्रयत्न करीत होता; म्हणून आम्ही त्याला अटक केली. आम्ही आमच्या नियमानुसार त्याचा न्याय करणार होतो 7परंतु यरुशलेम येथील पलटणीचे सेनापती लुसिया आले आणि त्यांनी जबरदस्ती करून त्याला आमच्या हातातून काढून घेतले#24:7 हे सर्वात जुन्या मूळ हस्तलिखितांमध्ये सापडत नाही. 8व आज्ञा केली की त्याच्यावर आरोप करणार्‍यांनी तुमच्यासमोर यावे. आता या माणसाची आपण स्वतः तपासणी करून या आरोपात तथ्य आहे की नाही, हे समजून घ्यावे.”
9त्याचे बोलणे संपताच सर्व यहूद्यांनी एकसुरात अनुमोदन दिले की सांगण्यात आलेली प्रत्येक गोष्ट सत्य आहे.
10राज्यपालाने त्याला बोलण्यास खुणावले, पौलाने उत्तर दिले: “महाराज, आपण अनेक वर्षे या देशात न्यायाधीश म्हणून आहात; त्यामुळेच मी आनंदाने माझे बचावाचे भाषण आपणापुढे करीत आहे. 11मंदिरामध्ये उपासना करण्यासाठी मी यरुशलेममध्ये आलो याला बारा दिवसांहून अधिक कालावधी लोटला नाही, हे आपण सहज पडताळून पाहू शकाल. 12आणि मंदिरात, सभागृहामध्ये किंवा शहरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा लोकात अशांती माजविताना मजवर आरोप करणार्‍यांना मी आढळलो नाही. 13त्यांनी जे आरोप मजवर केले आहेत ते तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकत नाहीत. 14तरी एक गोष्ट कबूल करतो की मी आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराची उपासना करतो व त्या मार्गाचा अनुयायी आहे ज्याला हे लोक पंथ असे म्हणतात. त्याबरोबरच जे नियमशास्त्राला धरून आहे त्या प्रत्येक गोष्‍टीवर व संदेष्ट्यांच्या लिखाणात जे लिहिले आहे, त्या प्रत्येक वचनावर माझा विश्वास आहे, 15परमेश्वरामध्ये या लोकांची जी आशा आहे तीच माझीसुद्धा आहे, ती ही की नीतिमान व अनीतिमान या दोघांचेही पुनरुत्थान होईल. 16यामुळेच मी परमेश्वरासमोर आणि मनुष्यासमोर माझी विवेकबुद्धी सतत स्वच्छ ठेवण्यासाठी खूप कष्ट घेतो.
17“अनेक वर्षे बाहेर राहिल्यानंतर, मी गरीब लोकांना साहाय्य करण्यासाठी देणग्या व अर्पण वाहण्यासाठी यरुशलेमला परतलो. 18यांनी मला मंदिराच्या अंगणात शुद्धीकरणाचा विधी पूर्ण करताना पाहिले. तिथे माझ्याभोवती जमाव नव्हता आणि मी कोणत्याही गोंधळात सहभागी झालो नव्हतो. 19परंतु आशिया प्रांतातील काही यहूदीयांची माझ्याविरुद्ध काही तक्रार असेल तर त्यांनी येथे हजर राहणे आवश्यक होते. 20येथे प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या या लोकांना विचारा की त्यांच्या न्यायसभेपुढे मी उभा होतो तेव्हा त्यांना मजमध्ये कोणता अपराध आढळून आला, 21ही केवळ एक गोष्ट सोडून मी त्यांच्यासमोर उच्च आवाजाने ओरडलो: ‘मृतांचे पुनरुत्थान यामुळे मी आज आपणापुढे चौकशीसाठी उभा आहे.’ ”
22फेलिक्सला या मार्गाबद्दल चांगली माहिती होती, त्याने सुनावणी तात्पुरती थांबविली. “जेव्हा सेनापती लुसिया येईल, तेव्हा आपण या प्रकरणाचा निकाल लावू,” असे त्याने म्हटले. 23त्याने शताधिपतीला हुकूम केला की, पौलावर पहारा ठेवावे परंतु त्याला थोडीफार स्वतंत्रता दिली जावी आणि त्याच्या मित्रांना त्याची सेवा करण्याची अधिकृत परवानगी द्यावी.
24मग काही दिवसानंतर आपली यहूदी पत्नी द्रुसिल्लासह फेलिक्स आला. पौलाला बोलविल्यानंतर तो येशू ख्रिस्तावरील विश्वासासंबंधी जे बोलला ते त्यांनी ऐकले. 25तो जेव्हा नीतिमत्व, इंद्रियदमन आणि भावी न्याय या गोष्टीसंबंधाने बोलत होता, तेव्हा फेलिक्स भयभीत झाला आणि म्हणाला, “आतासाठी हे पुरे आहे! तू जाऊ शकतोस. मला पुढे अधिक सवड लाभली, तर मी तुला पुन्हा बोलावेन.” 26त्याचवेळेस त्याने अशीही आशा बाळगली होती की पौल त्याला लाच देईल आणि म्हणून तो त्याला वारंवार बोलावून घेत होता व त्याच्याबरोबर बोलणे करीत होता.
27दोन वर्षे निघून गेल्यानंतर, पुढे पुर्क्य फेस्त हा राज्यपाल म्हणून फेलिक्सच्या जागेवर आला. परंतु फेलिक्सला यहूदीयावर कृपादृष्टी दाखवायची होती म्हणून तो पौलाला कैदेतच ठेऊन निघून गेला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for प्रेषित 24