YouVersion Logo
Search Icon

अनुवाद 23

23
सभेतून वगळलेले लोक
1जो भग्नांड आहे किंवा ज्याच्या लिंगाचा छेद झाला आहे त्याने याहवेहच्या सभेत प्रवेश करू नये.
2निषिद्ध विवाहबंधनापासून जन्मलेला अथवा त्यांच्या वंशातल्या अगदी दहाव्या पिढीपर्यंत कोणीही याहवेहच्या सभेत प्रवेश करू नये.
3तसेच दहाव्या पिढीनंतर कोणाही अम्मोनी अथवा मोआब्याने याहवेहच्या सभेत कधीही प्रवेश करू नये. 4कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आला, तेव्हा हे मार्गात अन्न व पाणी घेऊन तुम्हाला भेटण्यास आले नाहीत, एवढेच नव्हे तर अराम-नहराईम#23:4 किंवा मेसोपोटेमिया येथील पथोर नगरात राहणारा बौराचा पुत्र बलामास द्रव्य देऊन तुम्हाला शाप देण्यासाठी आणले. 5तरीही याहवेह तुमच्या परमेश्वराने बलामाचे ऐकले नाही, परंतु त्यांनी त्याच्या शापाचे तुमच्यासाठी आशीर्वादात रूपांतर केले, कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हावर प्रीती करतात. 6म्हणून तुम्ही जिवंत असेपर्यंत त्यांच्याशी तहाची मैत्री करण्याचा कधीही प्रयत्न करू नये.
7परंतु एदोमी लोकांना तुच्छ लेखू नका, कारण एदोमी तुमचे भाऊबंद आहेत. इजिप्तच्या लोकांचा तिरस्कार करू नका कारण त्यांच्या देशात तुम्ही परदेशी म्हणून राहिला होता. 8त्यांच्यात जन्मलेल्या तिसर्‍या पिढीच्या संततीस याहवेहच्या सभेत प्रवेश करण्यास हरकत नाही.
छावणीतील अस्वच्छता
9जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूविरुद्ध तळ ठोकाल, तेव्हा सर्व अशुद्ध गोष्टींपासून दूर राहावे. 10एखादा पुरुष स्वप्नावस्थेमुळे रात्रीतून अशुद्ध झाला असेल, तर त्याने छावणीबाहेर जावे आणि बाहेरच राहावे. 11पण जशी संध्याकाळ होईल तसे त्याने स्नान करावे व सूर्यास्तानंतर छावणीत परत यावे.
12नैसर्गिक विधी करण्यासाठी लागणारी जागा छावणीच्या बाहेर असावी. 13तुमच्या हत्यारांमध्ये कुदळ अवश्य असावी आणि बहिर्दिशेच्या वेळी आपल्या मलमूत्रासाठी त्याने खड्डा खोदावा व नंतर झाकून टाकण्यासाठी तिचा वापर करावा. 14तुमचे रक्षण करण्यासाठी आणि तुमच्यापुढे तुमच्या शत्रूंना तुमच्या हाती देण्यासाठी, याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या छावणीमध्ये फिरत असतात. तुमची छावणी पवित्र असली पाहिजे, यासाठी की त्यांच्या दृष्टीस अमंगळता पडल्यास ते तुमच्यापासून दूर निघून जातील.
इतर विविध नियम
15एखादा गुलाम आपल्या धन्यापासून पळून तुमच्याकडे आला असेल, तर तुम्ही त्याला त्याच्या धन्याच्या स्वाधीन करू नका. 16त्यांना जे गाव आवडेल, त्या गावात तुमच्यामध्ये त्यांना राहू द्यावे. तुम्ही त्यांना छळू नये.
17इस्राएलातील कन्या वा पुत्रांनी मंदिरातील देवदासी बनू नये. 18वेश्येच्या कमाईचा अथवा पुमैथुन करणार्‍याच्या मिळकतीचा पैसा याहवेह तुमच्या परमेश्वराच्या मंदिरात नवस फेडण्यासाठी कोणीही आणू नये; कारण हे दान व दान देणारी व्यक्ती या दोन्हीही गोष्टी याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ होत.
19तुमच्या इस्राएली बंधूला दिलेल्या कर्जावर व्याज मागू नका, मग ते कर्ज पैशाच्या, अन्नाच्या अथवा दुसर्‍या कशाच्याही रूपाने दिलेले असो, त्याच्यावर व्याज मागू नका. 20तुम्ही एखाद्या परदेशीकडून व्याज घेऊ शकता, पण कोणाही इस्राएली बांधवाकडून घेऊ नका, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर जेव्हा तुम्हाला वतन म्हणून ज्या देशात आणतील, तेव्हा तुम्ही केलेल्या प्रत्येक कार्याला आशीर्वाद देतील.
21तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराला एखादा नवस करता, तेव्हा तो फेडण्यास विलंब लावू नये, कारण नवसांची फेड तत्परतेने करावी, अशी याहवेह तुमच्या परमेश्वराची अपेक्षा आहे. तसे न केल्याने तुम्ही पापाचे दोषी ठराल. 22परंतु तुम्ही नवस केला नसेल, तर ते मात्र पाप नाही. 23तुमच्या ओठांनी तुम्ही जे काही वचन दिले असेल, त्याप्रमाणे तुम्ही अवश्य केले पाहिजे; कारण तो नवस तुम्ही मुखाने, स्वखुशीने याहवेह तुमच्या परमेश्वराला केला होता.
24तुम्ही तुमच्या शेजार्‍याच्या द्राक्षमळ्यात गेलात, तर हवी तितकी द्राक्षे तुम्ही खावी, परंतु टोपलीत घालून तुम्ही काहीही नेऊ नये. 25आपल्या शेजार्‍याच्या उभ्या पिकात तुम्ही गेलात, तर हवी तेवढी कणसे तुम्ही हाताने मोडून खावी, पण त्याच्या उभ्या पिकास मात्र विळा लावू नये.

Currently Selected:

अनुवाद 23: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in