YouVersion Logo
Search Icon

अनुवाद 24

24
1कोणा पुरुषाने एखाद्या स्त्रीसोबत विवाह केला, परंतु नंतर तो तिच्यासोबत संतुष्ट होत नाही आणि त्याला तिच्यात काही दोष आढळला, तर त्याने सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला आपल्या घरातून घालवून द्यावे, 2आणि त्याचे घर सोडल्यानंतर ती दुसर्‍या पुरुषाची पत्नी होते, 3आणि तिच्या दुसर्‍या पतीलाही ती आवडली नाही व त्यानेही तिच्या हाती सूटपत्रे देऊन तिला घालवून दिले किंवा तो मरण पावला, 4तर तिच्या पहिल्या पतीने तिला पत्नी म्हणून पुन्हा स्वीकारू नये, कारण ती भ्रष्ट झालेली आहे. अशा स्त्रीशी विवाह करणे ही गोष्ट याहवेहच्या दृष्टीने अमंगळ अशी आहे. याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतन म्हणून देत असलेल्या देशावर पाप आणू नका.
5नुकतेच विवाह झालेल्या पुरुषाला सैन्याबरोबर मोहिमेवर पाठवू नये किंवा त्याच्यावर इतर कुठलीही जबाबदारी टाकू नये. त्याला वर्षभर घरी राहण्याची मोकळीक असावी आणि त्याने घरी राहून आपल्या विवाहित पत्नीला आनंदित करावे.
6तुम्ही एखाद्या मनुष्याला काही उसने देता—तेव्हा जाते किंवा जात्याची तळी गहाण म्हणून ठेवून घेऊ नये—कारण अशी वस्तू गहाण ठेवणे म्हणजे त्या मनुष्याचे जीवितच गहाण ठेवणे होय.
7जर एखाद्याने आपल्याच इस्राएली बांधवाचे अपहरण केले आणि त्याला एखाद्या गुलामाप्रमाणे वागविले किंवा तो विकून टाकताना त्याला धरण्यात आले, तर अपहरण करणार्‍याला अवश्य जिवे मारावे. अशा रीतीने तुमच्यातील दुष्कर्म तुम्ही दूर करावे.
8कुष्ठरोगाच्या बाबतीत लेवी याजकाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वागण्याची काळजी घ्या. मी त्यांना दिलेल्या आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळा. 9इजिप्तमधून येताना याहवेह तुमच्या परमेश्वराने मिर्यामचे काय केले, याची तुम्ही आठवण ठेवावी.
10जेव्हा तुम्ही आपल्या शेजार्‍याला काही उसने देता, तर तारण घेण्यासाठी तुम्ही त्याच्या घरात शिरू नये, 11तुम्ही बाहेर उभे राहावे आणि ज्या शेजार्‍याला तुम्ही कर्ज देत आहात त्याने तुम्हाला बाहेर तारण आणून द्यावे. 12जर शेजारी गरीब असेल, तर तुम्ही त्याने तारण म्हणून दिलेले पांघरूण अंगावर घेऊन झोपू नका. 13गहाणादाखल त्याने आपले पांघरूण दिले असेल व तर सूर्यास्तसमयी ते त्याला परत करावे म्हणजे ते पांघरूण अंगावर घेऊन तो झोपेल. तो तुमचे आभार मानेल आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने तुमचे हे कृत्य नीतिमत्व असे ठरेल.
14गरीब व गरजवंत मजुराचा तुम्ही गैरफायदा घेऊ नये, मग तो तुमचा इस्राएली बांधव असो किंवा तुमच्या गावात राहणारा परदेशी असो. 15त्यांना दररोज सूर्य मावळण्यापूर्वीच त्यांची मजुरी द्यावी, कारण ते गरीब आहेत आणि ते त्या मजुरीवर अवलंबून आहेत. नाहीतर ते तुमच्याविरुद्ध याहवेहकडे गार्‍हाणे करतील व मग ते तुमच्याविरुद्ध पाप असे मोजण्यात येईल.
16आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या कारणामुळे जिवे मारू नये, तसेच आईवडिलांच्या कारणामुळे त्यांच्या मुलांना जिवे मारू नये. प्रत्येकजण स्वतःच्या पापासाठी मरतील.
17परदेशी आणि अनाथांना यथायोग्य न्याय दिला पाहिजे, किंवा विधवेची वस्त्रे गहाण म्हणून कधीही घेतली जाऊ नये. 18तुम्ही इजिप्त देशात गुलाम होता आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यातून तुमची सुटका केली, याची तुम्ही सतत आठवण ठेवावी. म्हणूनच मी तुम्हाला हे करण्याची आज्ञा देत आहे.
19पिकांची कापणी करीत असताना तुम्ही बांधून ठेवलेली एखादी पेंढी शेतातून आणावयाचे विसरलात, तर ती आणण्यासाठी तुम्ही माघारी जाऊ नये, तर परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी ती तिथेच राहू द्यावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या हाताच्या सर्व कार्यात आशीर्वाद देतील. 20तुम्ही तुमच्या जैतून वृक्षांवरील फळे काढण्याकरिता झोडपणी कराल, तेव्हा तुम्ही एकाच फांदीवर दोनदा प्रहार करू नये. त्या फांदीवर जी काही फळे राहतील ती परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी राहू द्यावी. 21जेव्हा तुम्ही तुमच्या द्राक्षमळ्यातील द्राक्षे काढता तेव्हा परत वेलींवर जाऊ नका. तर राहिलेली द्राक्षे परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी तशीच राहू द्यावीत. 22इजिप्त देशामध्ये तुम्ही गुलाम होता याची आठवण ठेवावी म्हणून मी तुम्हाला हे करण्याची आज्ञा देत आहे.

Currently Selected:

अनुवाद 24: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in