YouVersion Logo
Search Icon

उपदेशक 6

6
1सूर्याखाली आढळणारी आणखी एक वाईट गोष्ट मला दिसली, जी मानवावर अतिशय भारी आहे: 2परमेश्वर काही माणसांना भरपूर संपत्ती, मान सन्मान देतात; त्यांचे हृदय इच्छिते अशा कशाचीही त्यांना वाण पडत नाही. मात्र त्याचा उपभोग घेण्याची क्षमता त्याला देत नाहीत आणि परके त्याचा आनंद उपभोगतात. हे निरर्थक आहे, फार वाईट आहे.
3एखाद्या व्यक्तीला शंभर लेकरे असतील आणि तो दीर्घायुषी जगला; तरी तो आपल्या समृद्धीचा आनंद उपभोगू शकत नसेल आणि त्याला योग्य रीतीने मूठमाती मिळत नाही, तर मी असे म्हणतो की, त्याच्यापेक्षा मृत जन्मलेला गर्भ बरा. 4ते बाळ व्यर्थच जन्मते आणि अंधारात विलीन होते आणि अंधारातच त्याचे नाव नाहीसे होऊन जाते. 5जरी त्याने न कधी सूर्याला बघितले ना त्याविषयी काही जाणले, त्या मनुष्यापेक्षा त्याला अधिक विसावा आहे. 6जरी तो हजार किंवा दोन हजार वर्षे जगला व त्याला संपत्तीसुखाचा आनंद लाभला नाही. सर्वजण एकाच ठिकाणी जात नाही काय?
7प्रत्येक मनुष्य आपल्या पोटासाठी कष्ट करतो,
परंतु त्यांची भूक कधीही तृप्त होत नाही.
8शहाण्या लोकांना मूर्ख लोकांपेक्षा काय फायदा?
दुसर्‍या लोकांसमोर कसे वागावे हे जाणून
गरिबांना काय फायदा?
9ज्यागोष्टी निरर्थक
वार्‍याचा पाठलाग करण्यासारख्या आहेत,
वासनेमागे धावण्यापेक्षा, आपल्या दृष्टीसमोर आहे,
त्यात संतुष्ट असणे बरे.
10जे काही अस्तित्वात आहेत त्याला आधी नाव दिलेले आहे,
आणि मानवता तर ओळखीची होती;
कोणीही जो आपल्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे
त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही.
11जेवढे जास्त शब्द
तेवढा अर्थ कमी होतो,
मग उगाच बोलण्याने मनुष्यास काय लाभ?
12वायफळ सावलीसारख्या अल्पकाळच्या जीवनात उत्तम काय आहे हे कोणा मनुष्याला सांगता येईल काय? मेल्यानंतर सूर्याच्या खाली काय होईल, हे कोणाला सांगता येईल?

Currently Selected:

उपदेशक 6: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in