YouVersion Logo
Search Icon

उपदेशक 7

7
सुज्ञान
1सन्माननीय नाव हे सुवासिक अत्तरापेक्षा उत्तम आहे,
आणि मृत्युदिन जन्म दिवसापेक्षा उत्तम आहे.
2मेजवानीच्या घरी जाण्यापेक्षा
शोकाकुल घरात जाणे हे अधिक उत्तम आहे,
प्रत्येक मनुष्याने#7:2 प्रत्येक मनुष्याने अर्थात् जीवितांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी;
मृत्यू हे सर्वांचे विधिलिखित आहे.
3विलाप करणे हे हसण्यापेक्षा बरे,
कारण दुःखी चेहरा हृदयासाठी बरा आहे.
4सुज्ञानी मनुष्याचे हृदय शोकाकुल घरात असते,
परंतु मूर्खांचे हृदय सुखाच्या घरात असते.
5सुज्ञानी व्यक्तीच्या निषेधाकडे लक्ष देणे
मूर्खाचे गीत ऐकण्यापेक्षा उत्तम आहे.
6मूर्खाचे हसणे हे
पात्राखालील अग्नीतील तडतडणाऱ्या काट्यांप्रमाणे आहे,
हे सुद्धा व्यर्थ आहे.
7पिळवणूक सुज्ञानी मनुष्याला मूर्ख बनविते,
आणि लाच हृदयाला भ्रष्ट करते.
8एखाद्या कामाचा शेवट त्याच्या आरंभापेक्षा बरा,
आणि गर्वापेक्षा सहनशीलता बरी.
9क्रोधित होण्यास तुझ्या अंतःकरणात घाई करू नकोस,
क्रोध तर मूर्खाच्या मांडीवर वास करतो.
10असे म्हणू नको, “जुने दिवस सध्याच्या दिवसांपेक्षा अधिक चांगले का होते?”
कारण असे प्रश्न विचारणे हे सुज्ञान नव्हे.
11सुज्ञान, हे वतन प्राप्तीप्रमाणे चांगले आहे,
आणि ज्यांना सूर्य दिसतो#7:11 अर्थात् जे जिवंत आहेत त्यांच्यासाठी ते लाभदायक आहे.
12जसे धन तसेच
सुज्ञान हे एक आश्रयस्थान आहे,
परंतु सुज्ञानाचा फायदा हा आहे:
ज्ञान ज्यांच्या मालकीचे आहे, त्यांचे रक्षण करते.
13परमेश्वराच्या कामावर मनन करा:
त्यांनी जे वाकडे केले आहे
ते कोण सरळ करू शकतो?
14जेव्हा वेळ अनुकूल असते तेव्हा आनंद करा;
परंतु जेव्हा वेळ प्रतिकूल असते, तेव्हा हे लक्षात घ्या:
परमेश्वराने जशी अनुकूल वेळ निर्माण केली
तशी प्रतिकूल वेळही त्यांनीच निर्माण केली,
म्हणून कोणा व्यक्तीला आपल्या भविष्याबद्दल
जाणून घेता येत नाही.
15या व्यर्थ जीवनामध्ये मी दोन्ही गोष्टी पाहिल्या आहेत:
नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्वात नाहीसे होतात,
आणि दुष्ट त्यांच्या दुष्टपणात दीर्घायुष्य जगतात.
16अति नीतिमान होऊ नका,
किंवा अति सुज्ञानीही असू नका—
तुम्ही स्वतःचा नाश का करून घ्यावा?
17अति दुष्ट होऊ नका,
आणि मूर्खही असू नका—
तुमची वेळ येण्यापूर्वी का मरावे?
18पहिल्याला घट्ट धरून ठेवणे,
आणि दुसर्‍यालाही सोडून न देणे हे बरे.
जे परमेश्वराचे भय धरतात ते अतिरेक टाळतील.#7:18 किंवा त्या दोन्हीना अनुसरतील
19सुज्ञान एखाद्या बुद्धिमान व्यक्तीला
एका शहराच्या दहा शासकांपेक्षा अधिक शक्तिशाली बनवते.
20खरोखर, या पृथ्वीवर नीतिमान असा कोणीही नाही,
असा एकही व्यक्ती नाही जो चांगलेच करतो आणि कधीच पाप करीत नाही.
21लोकांच्या प्रत्येक शब्दांकडे लक्ष देऊ नका,
नाहीतर तुमचा चाकरसुद्धा तुम्हाला शाप देताना तुम्ही ऐकाल—
22कारण तुम्ही इतरांना कितीदा शाप दिला
हे तुम्हाला तुमच्या मनातच ठाऊक आहे.
23सुज्ञानाने मी या सर्व गोष्टी तपासून पाहिल्या आणि म्हटले,
“मी सुज्ञानी होण्याचे ठरविले आहे”—
परंतु हे माझ्या शक्तीच्या पलीकडे होते.
24जे काही अस्तित्वात आहे ते खूपच दूर आणि सखोल आहे,
त्याचा शोध कोणाला घेता येईल?
25ज्ञान व रचनेच्या पध्दती जाणून व त्याच शोध घेण्यासाठी
आणि दुष्टतेची मूर्खता
व मूर्खतेचा वेडेपणा समजण्यासाठी
मी माझे मन वळविले.
26मरणापेक्षाही अति कटू गोष्ट मला दिसून आली की,
एक स्त्री जी एक पाश आहे,
जिचे हृदय एक सापळा आहे
जिचे हात साखळीप्रमाणे आहेत.
जे परमेश्वराला प्रसन्न करतात ते तिच्यापासून निसटतील,
परंतु पापींना ती पाशात अडकवेल.
27“पाहा,” शिक्षक#7:27 किंवा मंडळीचा उपदेशक असे म्हणतो, “या गोष्टींचा मी शोध लावला आहे:
“रचनेच्या पध्दती समजण्यासाठी मी एक गोष्ट दुसरीत मिळविली—
28जेव्हा मी शोध घेत होतो
मला काही निष्पन्न झाले नाही—
हजारांमध्ये एक नीतिमान मनुष्य होता.
परंतु त्या सर्वांमध्ये एकही स्त्री नीतिमान नव्हती.
29एकच गोष्ट माझ्या लक्षात आली:
परमेश्वराने मानवजात नीतिमान अशी निर्माण केली,
परंतु ते अनेक योजनांचा शोधच करीत राहिले.”

Currently Selected:

उपदेशक 7: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in