इफिसकरांस 6
6
1मुलांनो, प्रभुमध्ये तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे. 2“तुमच्या आई आणि वडिलांचा मान राखा” अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे. 3“यासाठी की तुमचे कल्याण व्हावे आणि तुम्हाला पृथ्वीवर दीर्घायुष्याचा लाभ घेता यावा.”#6:3 अनु 5:16
4बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडवू नका; याउलट प्रभुच्या शिक्षणात व बोधवचनात त्यांना वाढवा.
5दासांनो, जसे आपण ख्रिस्ताचे आज्ञापालन करतो, तसेच खर्या मनाने आपल्या ऐहिक धन्याचा मान राखा व भय धरा व त्यांच्या आज्ञा पाळा 6केवळ त्यांच्या नजरेसमोर, त्यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून त्यांचे आज्ञापालन करू नका, तर मनापासून परमेश्वराची इच्छा पूर्ण करणारे ख्रिस्ताचे दास असे व्हा. 7ही सेवा लोकांची म्हणून नाही परंतु पूर्ण मनाने आपण जशी प्रभुची करतो अशी समजून करा. 8तुम्ही दास किंवा स्वतंत्र असला, तरी प्रत्येक चांगल्या गोष्टीचे वेतन प्रभू तुम्हा प्रत्येकाला देईल, हे लक्षात ठेवा.
9आणि धन्यांनो, तुमच्या दासांशी तसेच वागा. त्यांना धमक्या देऊ नका. कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमचा व त्यांचा दोघांचाही एकच धनी जे स्वर्गात असून त्यांच्याजवळ पक्षपात नाही.
परमेश्वराची शस्त्रसामुग्री
10सर्वात शेवटी प्रभुच्या बळामध्ये आणि त्यांच्या पराक्रमी सामर्थ्याने सज्ज व्हा. 11परमेश्वराची सर्व शस्त्रास्त्रे धारण करा, म्हणजे तुम्हाला सैतानाच्या योजनेविरुद्ध उभे राहता येईल. 12कारण आपले युद्ध मांस आणि रक्त यांच्याविरुद्ध नाही, तर सत्ताधारी, अधिपतींविरुद्ध, अंधकाराच्या शक्तीविरुद्ध, आणि आकाशमंडळातील दुष्ट आत्मे यांच्याविरुद्ध आहे. 13यास्तव वाईट दिवसांमध्ये तुम्हाला खंबीरपणे उभे राहता यावे आणि सर्वकाही केल्यानंतर टिकाव धरता यावा म्हणून परमेश्वराची शस्त्रसामुग्री धारण करा. 14म्हणून सत्यरूपी कमरबंदाने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे उरस्त्राण घेऊन स्थिर उभे राहा. 15परमेश्वराच्या शांतीची शुभवार्ता गाजविण्याची तत्परता ही पादत्राणे घालून तयार राहा. 16या सर्व व्यतिरिक्त विश्वासरूपी ढाल घ्या, जिच्याद्वारे तुम्ही त्या दुष्टाचे अग्निबाण विझवू शकाल. 17तारणाचे शिरस्त्राण, आणि आत्म्याची तरवार म्हणजे परमेश्वराचे वचन हेही घ्या.
18सर्वदा प्रार्थना करा. पवित्र आत्म्यामध्ये प्रत्येक प्रसंगी, सर्वप्रकारच्या प्रार्थनेने आणि विनवणीने, प्रभुच्या लोकांसाठी जागृत राहून अगत्याने प्रार्थना करीत राहा. 19माझ्यासाठी सुद्धा प्रार्थना करा, की जेव्हाही मी बोलेन तेव्हा मला शब्द सुचावेत, व मी निर्भयपणे शुभवार्तेचे रहस्य स्पष्ट करून सांगावे. 20त्यासाठीच मी साखळदंड धारण केलेला राजदूत आहे. प्रार्थना करा की निर्भयतेने सांगावयास हवे तसे मी ते जाहीर करावे.
शेवटच्या शुभेच्छा
21येथे मी कसा आहे व काय करीत आहे, यासंबंधीची सर्व हकिकत माझा प्रिय बंधू आणि प्रभुच्या कार्यातील प्रामाणिक सहकारी तुखिक तुम्हाला सांगेल. 22आमची खुशाली तुम्हाला समजावी व त्याने तुम्हाला प्रोत्साहित करावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे पाठवीत आहे.
23बंधू व भगिनींना शांती असो आणि परमेश्वर जो पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हाला विश्वासाबरोबर प्रीती प्राप्त होवो!
24आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर शाश्वत प्रीती करणार्या तुम्हा सर्वांवर कृपा असो.
Currently Selected:
इफिसकरांस 6: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.