YouVersion Logo
Search Icon

यहोशुआ 6

6
1इस्राएली लोकांमुळे यरीहोच्या वेशी आता कडक बंदोबस्ताने बंद करून टाकल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही आणि कोणीही आत आला नाही.
2तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “पाहा, मी यरीहो शहर, त्याचबरोबर त्यांचा राजा आणि त्यांचे योद्धे पुरुष देखील तुझ्या हाती दिले आहे. 3सर्व सशस्त्र माणसांना घेऊन शहराभोवती एक प्रदक्षिणा घाला. सहा दिवस असेच करा. 4मेंढ्याच्या शिंगापासून केलेली रणशिंगे घेऊन सात याजक कोशाच्या पुढे ठेवा. सातव्या दिवशी याजक रणशिंगे वाजवित शहराभोवती सात वेळेस प्रदक्षिणा घालतील. 5जेव्हा त्यांच्या रणशिंगाचा मोठा व दीर्घ आवाज तुम्ही ऐकाल, त्यावेळी संपूर्ण सैन्याने मोठा जयघोष करावा. तेव्हा शहराचा तट कोसळेल आणि सैन्य पुढे जाईल, नंतर प्रत्येकजण सरळ आत प्रवेश करेल.”
6तेव्हा नूनाचा पुत्र यहोशुआने याजकांना बोलाविले आणि त्यांना सांगितले, “याहवेहच्या कराराचा कोश घ्या आणि त्यासमोर सात याजक रणशिंगे घेऊन जातील.” 7त्याने सैनिकांना हुकूम दिला, “पुढे चला! सशस्त्र सुरक्षा सैनिकांना याहवेहच्या कोशापुढे ठेऊन शहराच्या सर्व बाजूने प्रदक्षिणा घाला.”
8जेव्हा यहोशुआने लोकांबरोबर बोलणे केले, तेव्हा सात याजक याहवेहच्या पुढे त्यांची सात रणशिंगे वाजवित पुढे निघाले आणि याहवेहच्या कराराचा कोश त्यांच्यामागे गेला. 9सशस्त्र शिपाई रणशिंगे वाजविणार्‍या याजकांच्या पुढे चालू लागले आणि मागून येणारे शिपाई कोशाच्या मागे चालत राहिले. या सर्व वेळेपर्यंत रणशिंगे वाजविली जात होती. 10परंतु यहोशुआने सैन्याला आज्ञा दिली होती, “युद्धाची घोषणा करू नका, तुम्ही मोठ्याने जयघोष करू नका, तुमचा आवाज उंचावू नका, जयघोष करा असे मी तुम्हाला सांगेन त्या दिवसापर्यंत एकही शब्द बोलू नका.” 11तेव्हा त्यांनी याहवेहचा कोश घेऊन शहराभोवती एक प्रदक्षिणा घातली. त्यानंतर सैन्य परत छावणीत आले आणि तिथे त्यांनी रात्री मुक्काम केला.
12दुसर्‍या दिवशी सकाळीच यहोशुआ उठला आणि याजकांनी याहवेहचा कोश उचलून घेतला. 13सात याजक सात रणशिंगे फुंकत याहवेहच्या कोशाच्या पुढे निघाले. सशस्त्र सैनिक त्यांच्या पुढे गेले आणि रणशिंगे फुंकली जात असताना मागे जाणारे सुरक्षा सैनिक याहवेहच्या कोशाच्या मागे गेले. 14तेव्हा दुसर्‍या दिवशी त्यांनी शहराभोवती एक वेळेस प्रदक्षिणा घातली आणि ते छावणीकडे परत आले. सहा दिवस त्यांनी असेच केले.
15सातव्या दिवशी ते पहाटेच उठले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे त्या शहराला प्रदक्षिणा घातल्या, फक्त त्या दिवशी त्यांनी सात प्रदक्षिणा घातल्या. 16सातव्या प्रदक्षिणेच्या वेळी जेव्हा याजकांनी रणशिंगांचा दीर्घ निनाद केला, तेव्हा यहोशुआने सैन्याला आज्ञा केली, “जयघोष करा! कारण याहवेहनी हे शहर तुम्हाला दिले आहे! 17हे शहर आणि त्यातील सर्वकाही याहवेहला समर्पित करावे. राहाब वेश्या आणि जी कोणी माणसे तिच्या घरात असतील त्यांना वाचविले जावे, कारण आपण पाठविलेल्या हेरांना तिने लपवून ठेवले होते. 18परंतु अर्पण केलेल्या सर्व वस्तूंपासून दूर राहा, म्हणजे त्यातील काहीही घेतल्याने तुम्ही स्वतःवर नाश ओढवून घेणार नाही. नाहीतर तुम्ही इस्राएलच्या छावणीच्या नाशासाठी जबाबदार ठराल आणि तिच्यावर संकट आणाल. प्रत्येक वस्तूचा तुम्ही नाश केला नाही, तर संपूर्ण इस्राएली राष्ट्रावर अनर्थ कोसळेल. 19सर्व चांदी आणि सोने, तसेच मिश्र धातूची वेगवेगळी पात्रे आणि लोखंडाची पात्रे याहवेहला समर्पित आहेत आणि ती त्यांच्या भांडारात आणली पाहिजे.”
20जेव्हा रणशिंगांनी निनाद केला, तेव्हा सैन्याने मोठा जयघोष केला आणि रणशिंगाच्या आवाजामुळे जेव्हा पुरुषांनी मोठ्याने आवाज केला, तेव्हा तेथील भिंत कोसळून पडली; तेव्हा प्रत्येकजण सहजपणे आत गेला आणि त्यांनी ते शहर हस्तगत केले. 21त्यांनी ते शहर याहवेहला समर्पित केले आणि त्या शहरात जिवंत असलेल्या प्रत्येकाचा संहार केला: पुरुष, स्त्रिया, तरुण आणि वृद्ध, बैल, मेंढरे आणि गाढवे या सर्वांचा नाश केला.
22ज्यांनी तो देश हेरला होता त्या दोन हेरांना यहोशुआ म्हणाला, “त्या वेश्येच्या घरी जा आणि तिला व तिच्याबरोबर असलेल्या तिच्या नातेवाईकांना तुम्ही वचन दिल्याप्रमाणे बाहेर काढा.” 23तेव्हा ज्या तरुण पुरुषांनी तो देश हेरला होता, ते आत गेले आणि त्यांनी राहाब, तिचे वडील आणि आई, तिचे भाऊ आणि बहिणी आणि तिच्याबरोबर असलेल्या तिच्या सर्व नातेवाईकांना बाहेर काढले. त्यांनी तिच्या संपूर्ण कुटुंबाला बाहेर काढले आणि इस्राएलच्या छावणीबाहेरील जागेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली.
24इस्राएली लोकांनी ते शहर व त्यातील प्रत्येक गोष्ट जाळून टाकली. फक्त चांदी व सोने, कास्य व लोखंडाची पात्रे याहवेहच्या भांडारासाठी राखून ठेवण्यात आली. 25परंतु यहोशुआने राहाब वेश्येस आणि तिच्याबरोबर असलेल्या तिच्या सर्व नातेवाईकांना वाचविले, कारण यहोशुआने यरीहोत पाठविलेल्या हेरांना तिने लपवून ठेवले होते आणि इस्राएली लोकांमध्ये ते आजपर्यंत राहत आहेत.
26तेव्हा यहोशुआने गंभीरपणाने शपथ घेतली: “जो कोणी यरीहो शहर पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करेल, तो याहवेहसमोर शापित ठरेल:
“जो कोणी या शहराचा पाया घालेल;
त्याचा प्रथमपुत्र मरण पावेल,
आणि जो कोणी या शहराच्या वेशी उभारेल,
त्याचा धाकटा पुत्र मरण पावेल.”
27याप्रमाणे याहवेह यहोशुआबरोबर होते आणि त्याच्या नावाची सर्वत्र किर्ती पसरली.

Currently Selected:

यहोशुआ 6: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in