यहोशुआ 7
7
आखानाचे पाप
1परंतु इस्राएली लोक समर्पित केलेल्या वस्तूंबाबतीत अविश्वासू होते; यहूदाह गोत्रातील जेरहाचा पुत्र जब्दी#7:1 काही मूळ प्रतींमध्ये जिम्री याचा पुत्र कर्मी, याचा पुत्र आखानाने त्यातील काही वस्तू घेतल्यामुळे याहवेहचा क्रोध इस्राएल राष्ट्राविरुद्ध भडकला.
2यहोशुआने काही माणसे यरीहोकडून आयकडे पाठविली, जे बेथेलच्या पूर्वेकडे बेथ-आवेनजवळ आहे आणि त्यांना म्हणाला, “जा आणि त्या प्रदेशाला हेरा.” तेव्हा ती माणसे निघाली आणि त्यांनी आय शहर हेरले.
3जेव्हा ते यहोशुआकडे परत आले, त्यांनी सांगितले, “संपूर्ण सैन्याला आय विरुद्ध लढाई करण्यासाठी जावे लागणार नाही. ते जिंकण्यासाठी दोन ते तीन हजार माणसे पाठवा आणि संपूर्ण सैन्याला थकवू नका, कारण फक्त थोडेच लोक तिथे राहतात.” 4तेव्हा सुमारे तीन हजार हल्ला करून गेले; परंतु आयच्या लोकांनी त्यांचा पराभव केला. 5आयच्या लोकांनी त्यांच्यातील छत्तीसजणांना मारून टाकले. त्यांनी इस्राएली सैनिकांचा वेशीपुढे शबारीमपर्यंत#7:5 म्हणजे दगडाच्या खाणी पाठलाग केला; यामुळे लोकांची अंतःकरणे भीतीने वितळून पाण्यासारखी झाली.
6तेव्हा यहोशुआने त्याची वस्त्रे फाडली आणि तो संध्याकाळपर्यंत याहवेहच्या कोशासमोर जमिनीवर तसाच पालथा पडून राहिला. इस्राएलच्या वडीलजनांनी तसेच केले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावर राख शिंपडली. 7आणि यहोशुआ म्हणाला, “हाय, सार्वभौम याहवेह, तुम्ही आम्हाला अमोर्यांच्या हातून ठार करणार होता, तर आम्हाला यार्देन नदी पार करून का आणले? आम्ही यार्देन पलीकडे आमच्याजवळ होते त्यातच आम्ही समाधानी होतो! 8हे प्रभू तुमच्या सेवकाला क्षमा करा. आता इस्राएलचा त्यांच्या शत्रूकडून पराभव झालेला आहे तर मी काय बोलू? 9कारण कनानी लोक आणि आसपासची राष्ट्रे याबद्दल ऐकतील, तेव्हा ते आम्हाला सभोवार घेरतील, आमच्यावर हल्ला करतील आणि आम्हाला नामशेष करून टाकतील. मग तुमच्या महान नावाच्या थोरवीचे काय होईल?”
10याहवेह यहोशुआस म्हणाले, “ऊठ! तू असा पालथा का पडला आहेस? 11इस्राएलने पाप केले आहे; त्यांनी माझा करार भंग केला आहे, ज्याचे पालन करण्यास मी त्यांना सांगितले होते. समर्पित केलेल्या वस्तू ते घेऊन आले आहेत; त्यांनी चोरी केली आहे, त्यांनी लबाडी केली आहे, त्यांनी त्या वस्तू स्वतःच्या मालकीच्या केल्या आहेत. 12यामुळे इस्राएल त्यांच्या शत्रूपुढे उभे राहू शकत नाहीत; ते पाठ फिरवून पळून जात आहेत, कारण त्यांच्या नाशासाठी तेच जबाबदार आहेत. तुमच्यामधून नाशासाठी समर्पित असलेल्या वस्तूंचा तुम्ही नाश करेपर्यंत मी तुम्हाबरोबर असणार नाही.
13“तर ऊठ, लोकांना शुद्ध कर, त्यांना सांग, तुमच्यापैकी प्रत्येकाने उद्यासाठी स्वतःला शुद्ध करून घ्या, कारण याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: अहो इस्राएली लोकहो, तुमच्यामध्ये समर्पित केलेल्या वस्तू आहेत. त्या वस्तू काढून टाकेपर्यंत तुम्ही तुमच्या शत्रूपुढे उभे राहू शकणार नाही.
14“सकाळी तुम्ही तुमच्या गोत्राप्रमाणे याहवेहसमोर उपस्थित व्हावे. जे गोत्र याहवेह निवडतील त्यांनी त्यांच्या कुळाप्रमाणे पुढे यावे; ज्या कुळाची याहवेह निवड करतील, त्यांनी त्यांच्या कुटुंबाप्रमाणे पुढे यावे; आणि ज्या कुटुंबाची याहवेह निवड करतील त्यातील प्रत्येक पुरुषाने पुढे यावे. 15जो कोणी समर्पित केलेल्या वस्तूसह सापडेल त्याला, त्याच्याकडे असलेल्या सर्व वस्तूसह जाळून टाकावे. त्याने याहवेहचा करार मोडला आहे आणि इस्राएलमध्ये घृणास्पद कृत्य केले आहे.”
16दुसर्या दिवशी सकाळ होताच यहोशुआने इस्राएली लोकांना त्यांच्या गोत्रानुसार पुढे बोलाविले आणि यहूदाहचे गोत्र निवडण्यात आले. 17यहूदाहचे गोत्र पुढे आले आणि जेरहाचे कूळ निवडण्यात आले. त्याच्या कुळातील प्रत्येक कुटुंब पुढे आले आणि जब्दीचे घराणे निवडले गेले. 18मग जब्दीच्या घराण्यातील एकाएका पुरुषाला समोर आणण्यात आले आणि यहूदाहच्या वंशातील जेरहाचा पुत्र जब्दीचा पुत्र कर्मीचा पुत्र आखान निवडला गेला.
19तेव्हा यहोशुआ आखानास म्हणाला, “माझ्या मुला, याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचे गौरव कर आणि आपले पाप कबूल कर. तू काय केलेस ते मला सांग; माझ्यापासून काहीही लपवू नकोस.”
20तेव्हा आखानाने यहोशुआला उत्तर दिले, “खचितच मी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. मी जे केले ते हे: 21लुटीमध्ये मी एक सुंदर शिनारी झगा आणि दोनशे शेकेल चांदी,#7:21 अंदाजे 2.3 कि.ग्रॅ. पन्नास शेकेल सोन्याची लगड#7:21 अंदाजे 575 ग्रॅ. या वस्तू पाहिल्या, तेव्हा त्या मला इतक्या हव्याशा वाटल्या की, मी त्या घेतल्या आणि त्या वस्तू माझ्या डेर्यात खाली जमिनीत पुरून ठेवलेल्या आहेत. झगा आणि सोने यांच्याहून चांदी सर्वात खाली पुरलेली आहे.”
22तेव्हा यहोशुआने संदेशवाहकांना पाठविले, त्यांनी तंबूकडे धाव घेतली आणि तिथे तंबूत खाली चांदीबरोबर ते सर्वकाही लपविले होते. 23त्यांनी तंबूतून त्या सर्व वस्तू घेतल्या व यहोशुआ व सर्व इस्राएली लोकांकडे आणल्या आणि याहवेहसमोर पसरवून ठेवल्या.
24मग यहोशुआ आणि सर्व इस्राएली लोकांनी जेरहाचा पुत्र आखान व त्याच्याबरोबर, ती चांदी, तो झगा, ती सोन्याची लगड, त्याचे पुत्र, त्याच्या कन्या, त्याचे बैल, गाढवे, मेंढरे, त्याचा तंबू आणि त्याचे जे काही होते ते सर्व अखोरच्या खोऱ्यात नेले.
25मग यहोशुआ आखानाला म्हणाला, “तू आमच्यावर अरिष्ट का आणलेस? आता याहवेह तुझ्यावर अरिष्ट आणतील.”
मग इस्राएल लोकांनी त्याला धोंडमार केली व त्याच्या बरोबरच्या इतरांनाही धोंडमार केल्यावर त्यांनी त्यांना जाळून टाकले. 26आणि आखानावर दगडांची एक मोठी रास केली, जी आज देखील तिथे आहे. तेव्हा याहवेहचा कोप शांत झाला आणि तेव्हापासून त्या ठिकाणाला अखोरचे खोरे#7:26 म्हणजे संकटाची दरी असे म्हटले जाते.
Currently Selected:
यहोशुआ 7: MRCV
Highlight
Share
Copy
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fen.png&w=128&q=75)
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.