YouVersion Logo
Search Icon

यहोशुआ 8

8
आय शहराचा विध्वंस
1तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “भिऊ नकोस किंवा निराश होऊ नकोस; सर्व सैन्य बरोबर घे आणि आय शहरावर हल्ला कर, कारण जिंकून घेण्यासाठी मी आय शहराचा राजा, त्याचे लोक, त्याचे नगर व त्याची भूमी तुझ्या हाती दिली आहे. 2यरीहो शहर आणि त्याच्या राजाचे तू केलेस तसेच आय शहर आणि त्याच्या राजाचे कर; परंतु यावेळी हाती लागेल ती लूट व गुरे तुम्ही स्वतःसाठी ठेवू शकाल. शहराच्या मागील बाजूस तुझ्या लोकांना दबा धरून बसव.”
3तेव्हा यहोशुआ आणि सर्व सैन्य आय नगरावर हल्ला करण्यासाठी बाहेर पडले. त्याने सर्वोत्कृष्ट तीस हजार योद्धे निवडले आणि त्यांना रात्री पाठवून दिले, 4त्यांना आज्ञा दिली: “लक्षपूर्वक ऐका. शहराच्या मागील बाजूस तुम्ही दबा धरून बसावे. त्या ठिकाणापासून फार दूर जाऊ नका. तुम्ही सर्वजण सावध असा. 5मी आणि माझ्याबरोबर असलेले सर्वजण या नगरावर हल्ला करतील आणि जेव्हा त्यांनी आधी केल्याप्रमाणे ती माणसे बाहेर आमच्यावर चालून येतील तेव्हा आम्ही त्यांच्यापासून पळून जाऊ. 6जोपर्यंत आम्ही त्यांना फसवून शहरापासून दूर घेऊन जाऊ, ते आमचा पाठलाग करतील. कारण ते म्हणतील, ‘आधी केले तसेच ते आमच्यापासून पळून जात आहेत.’ जेव्हा आम्ही त्यांच्यापासून पळून जाऊ, 7तेव्हा तुम्ही दबा धरून बसलेले ठिकाण सोडून आय शहराचा ताबा घ्यावा. याहवेह तुमचे परमेश्वर ते शहर तुमच्या हाती देतील. 8जेव्हा ते शहर तुम्ही हाती घ्याल, तेव्हा याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे तुम्ही त्या शहरास आग लावून द्यावी. लक्षात घ्या; तुम्हाला मी आज्ञा दिलेल्या आहेत.”
9नंतर यहोशुआने त्यांना पाठवून दिले आणि ते आयच्या पश्चिमेकडे बेथेल आणि आयच्यामध्ये दबा धरून बसण्याच्या ठिकाणाकडे गेले आणि वाट पहात राहिले; परंतु यहोशुआने ती रात्र लोकांबरोबर घालविली.
10दुसर्‍या दिवशी पहाटेच यहोशुआने त्याच्या सैन्याला जमविले आणि तो आणि इस्राएलचे पुढारी त्यांच्यापुढे आयच्या दिशेने चालत निघाले. 11संपूर्ण सैन्यदल जे त्याच्याबरोबर होते ते निघाले आणि शहरापर्यंत पोहोचले आणि त्या शहरासमोर आले. त्यांनी आयच्या उत्तरेकडे छावणी उभी केली त्यांच्यामध्ये आणि आय शहराच्यामध्ये खोरे होते. 12यहोशुआने त्याच्याबरोबर सुमारे पाच हजार पुरुष घेतले आणि त्यांना बेथेल आणि आय शहराच्यामध्ये पश्चिमेकडे दबा धरून बसविले होते. 13मुख्य छावणी शहराच्या उत्तरेकडे व दबा धरून बसलेले पश्चिमेकडे, याप्रमाणे सैन्याने आपआपले स्थान घेतले. त्या रात्री यहोशुआ खोर्‍यात गेला.
14जेव्हा आय शहराच्या राजाने हे पाहिले, तेव्हा तो आणि त्या शहराचे सर्व पुरुष पहाटेस घाई करून अराबासमोर एका विशिष्ट ठिकाणी इस्राएलशी युद्ध करण्यास निघाले. परंतु त्याला माहीत नव्हते की शहराच्या मागील बाजूस शत्रुसैन्य दबा धरून बसले आहे. 15नंतर यहोशुआ आणि सर्व इस्राएली सैन्याने त्यांना मागे येऊ दिले आणि त्यांच्यापुढे ते रानाच्या दिशेने पळाले. 16आय शहरातील सर्व पुरुषांना त्यांचा पाठलाग करण्यासाठी बोलाविण्यात आले. ते यहोशुआचा पाठलाग करीत शहरापासून लांब गेले. 17इस्राएली लोकांच्या मागे गेला नाही असा एकही पुरुष आय शहरात किंवा बेथेल येथे मागे राहिला नाही. त्यांनी आय शहराच्या वेशी उघड्याच टाकल्या आणि इस्राएलचा पाठलाग करण्यास गेले.
18तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “तुझा भाला आय शहराकडे उंच कर कारण ते शहर मी तुझ्या हाती देणार आहे.” तेव्हा यहोशुआने त्याच्या हातात असलेला भाला त्या शहराच्या दिशेने उंच केला. 19त्याने तसे केले त्याच क्षणाला दबा धरून बसलेले पुरुष त्यांच्या जागेतून बाहेर आले आणि पुढे पळत निघाले. त्यांनी त्या शहरात प्रवेश केला आणि ते ताब्यात घेतले आणि लगेच ते शहर पेटवून दिले.
20आयच्या पुरुषांनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांना दिसले की त्यांच्या शहरातून धूर निघून वर आकाशात जात आहे, परंतु आता कोणत्याही दिशेकडे पळून जाणे त्यांना शक्य नव्हते; जे इस्राएली लोक रानाकडे पळत चालले होते ते आता मागे वळून त्यांचा पाठलाग करणार्‍यांवर चालून आले. 21कारण जेव्हा यहोशुआ आणि सर्व इस्राएली लोकांनी पाहिले की दबा धरून बसलेल्या सैन्याने शहराचा ताबा घेतला आहे आणि तिथून धूर निघून वर जात आहे तेव्हा ते मागे फिरले आणि त्यांनी आयच्या पुरुषांवर हल्ला केला. 22दबा धरून बसलेले सैन्यसुद्धा शहरातून बाहेर पडून त्यांच्या विरोधात आले तेव्हा ते दोन्ही बाजूंनी इस्राएली लोकांमध्ये सापडले. इस्राएली लोकांनी त्या सर्वांना मारून टाकले, त्यातील कोणीही जिवंत ठेवला नाही किंवा निसटूनही गेला नाही. 23परंतु त्यांनी आय शहराच्या राजाला जिवंत ताब्यात घेतले आणि त्याला यहोशुआकडे आणले.
24आय नगरात राहणारे जे मैदानात आणि रानात त्यांचा पाठलाग करीत आले होते त्यांच्यातील प्रत्येकाला इस्राएलने तलवारीने मारून संपविल्यानंतर सर्व इस्राएली लोक आय शहराकडे परत आले आणि तिथे असलेल्या सर्व लोकांना त्यांनी मारून टाकले. 25आय शहराचे सर्व रहिवासी; जे पुरुष आणि स्त्रिया त्या दिवशी मारले गेले, त्यांची संख्या बारा हजार होती. 26कारण यहोशुआने आपल्या भाल्याचे टोक आय शहरातील सर्व लोकांचा नाश होईपर्यंत, मागे घेतले नाही. 27परंतु याहवेहने यहोशुआला सूचना दिली त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी त्यांच्यासाठी शहराची गुरे आणि लूट जिंकून आणली.
28अशा रीतीने यहोशुआने आय#8:28 म्हणजे विध्वंस शहर जाळून टाकले आणि ते नाश झालेल्या अवशेषांचा ढिगारा असे केले, आजपर्यंत ते ठिकाण असेच ओसाड पडलेले आहे. 29यहोशुआने आय शहराच्या राजाचे शव एका झाडाला टांगून ठेवले आणि संध्याकाळपर्यंत ते तसेच सोडून दिले. सूर्यास्ताच्या वेळेस यहोशुआने त्यांना हुकूम केला की, त्याचे शरीर झाडावरून काढा आणि ते खाली नगरवेशीच्या प्रवेशमार्गात फेकून द्यावे. नंतर त्यांनी त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास रचून ठेवली, ती आजपर्यंत राहिली आहे.
एबाल पर्वतावर कराराचे नूतनीकरण
30मग यहोशुआने याहवेह इस्राएलच्या परमेश्वरासाठी एबाल पर्वतावर वेदी बांधली, 31जी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने इस्राएली लोकांना दिली होती. मोशेच्या नियमशास्त्रात जसे लिहिले होते त्याप्रमाणे ज्या दगडांवर कोणतेही लोखंडी अवजार वापरलेले नाही, अशा न घडविलेल्या दगडांची त्याने वेदी बांधली. त्या वेदीवर त्यांनी याहवेहसाठी होमार्पणे व शांत्यर्पणे केली. 32तिथेच इस्राएली लोकांच्या उपस्थितीत यहोशुआने मोशेच्या नियमशास्त्राची एक प्रत दगडांवर लिहिली. 33सर्व इस्राएली लोक, त्यांच्या वडीलजनांसह, अधिकारी आणि न्यायाधीश हे सर्व याहवेहच्या कराराच्या कोशाच्या दोन्ही बाजूंना उभे होते, ज्या लेवीय याजकांनी तो वाहून आणला त्यांच्यासमोर ते होते. त्यांच्यामध्ये राहणारे परदेशी आणि तिथे जन्मलेले लोक तिथे होते. जशी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने पूर्वी दिली होती, त्याप्रमाणे अर्धे लोक गरिज्जीम पर्वतासमोर आणि अर्धे लोक एबाल पर्वतासमोर उभे राहिले, इस्राएली लोकांना आशीर्वाद देण्यासाठी त्याने या सूचना दिल्या होत्या.
34मग यहोशुआने त्या सर्व लोकांस नियमशास्त्राच्या पुस्तकात जशी लिहिलेली होती तशीच आशीर्वादांची आणि शापांची वचने वाचून दाखविली. 35यहोशुआने संपूर्ण इस्राएली मंडळी, स्त्रिया आणि मुलेबाळे आणि जे परदेशीय त्यांच्यामध्ये राहत होते यांना, मोशेने दिलेल्या सर्व आज्ञातील वाचून दाखविण्यात आल्या, एकही शब्द न वाचता सोडला नाही.

Currently Selected:

यहोशुआ 8: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in